आत्मचरित्र – ए पी जे अब्दुल कलाम
सहायक – अरुण तिवारी
मूळ इंग्रजी पुस्तक – विंग्स ऑफ फायर
अनुवाद – माधुरी शानभाग
किंमत – २२०/-
जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे. आपण जेव्हा संभ्रमरहित असतो, ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो, तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम देऊ शकतो.
तसं तर ‘अग्निपंख’ या पुस्तकाबद्दल प्रत्येकाला माहिती आहेच; कोणाला शाळेत-कॉलेजमध्ये उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल किंवा वाढदिवसाला भेट म्हणून हे पुस्तक मिळालं असेल. कोणी डॉ. कलमांच्या कार्याने, विचाराने प्रभावित होऊन हे पुस्तक घेतलं असेल. हा लेख त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी पुस्तक घेऊन अद्याप वाचलं नाही किंवा वाचलेलं विस्मरणात गेले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर या पुस्तकाबद्दल कौतुक किंवा आत्मीयता का आहे माहीत आहे? कारण या पुस्तकातून प्रत्येकाला काही न काही घेण्यासारखं आहे, आणि हेच या पुस्तकाच्या यशाचं रहस्य आहे.
साध्या, सर्वसामान्य आणि विनम्र भारतीयांबद्दल डॉ. कलामांना आत्मीयता वाटते आणि म्हणूनच सर्वसामान्य भारतीयांसाठी हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. डॉ. कलामांच्या आयुष्यातून एक गोष्ट प्रकर्षाने शिकता येते, ती म्हणजे
‘आपल्या स्वतःमध्ये सुप्त असलेल्या अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणे, हा जीवनातला खरा आनंदमार्ग आहे’…
एखादी व्यक्ती आणि तिचे विचार आपल्याला आवडतात, प्रेरणा देतात; तेव्हा त्या व्यक्तीची जडणघडण कशी झाली असेल, याबद्दल आपल्याला उत्सुकता वाटणं साहजिकच आहे. त्या व्यक्तीच्या जीवन प्रवासात घडलेल्या घटना, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यावेळची परिस्थिती, त्यांना भेटलेली लोकं, त्यांचे उपदेश हे सर्व वाचताना आपल्याला कळत-नकळतपणे प्रेरणा मिळत राहते.
या पुस्तकामध्ये, डॉ. कलामांचे बालपण, जडणघडण, शाळा-कॉलेजचे दिवस, त्यांचा शास्त्रज्ञ होण्याचा प्रवास, अपयशावर मिळवलेली मात, त्या प्रवासात त्यांना भेटलेल्या प्रेरणादायी व्यक्ती, त्यांचे विचार; तसेच अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या क्षेपणास्त्रांना तयार करण्याची प्रक्रिया, हे सगळं अतिशय सुंदरपणे १. जडणघडण, २. सृजन, ३. आराधन, ४. चिंतन, ५. समारोप या भागांमधून आपल्यापर्यंत पोहचते.
डॉ. कलामांचा साधेपणा आणि आपल्या देशबांधवांप्रती असलेली आत्मीयता पुढील परिच्छेदातुन जाणवते.
‘दहा वर्षांपूर्वी ‘पद्यभूषण’ सन्मान मिळाला होता, त्या वेळच्या आठवणींनी मला घेरून टाकले. मी त्यावेळी होतो, तोच होतो, तसाच राहत होतो. दहा बाय बाराच्या खोलीत पुस्तकांनी भरलेल्या कपाटांच्या संगतीने. त्या खोलीत कागद आणि अत्यावश्यक जुजबी भाड्याचे फर्निचर माझ्या सोबत तिथे होते. त्यावेळी ही खोली त्रिवेंद्रमला होती, आता हैद्राबादला – इतकाच फरक होता. सकाळी मेसचा पोऱ्या इडली आणि ताक असा नाश्ता घेऊन आला. अभिनंदनाचे छानसे बुजरे हास्य मला देऊन गेला. माझ्या देशवासीयांनी माझ्या कामाच्या स्वीकृतीची पावती म्हणून दिलेल्या सन्मानाने मी भारावून गेलो. आपल्या देशातील संशोधक फार मोठ्या संख्येने पहिली संधी पकडून परदेशी जातात, भरपूर पैसा मिळवतात, ऐषआराम खरीदतात. पण मला माझ्या देशवासीयांकडून मिळणारे प्रेम, आदर आणि सन्मान यांची भरपाई कशाने होईल का?’
खरंतर, डॉ. कलामांनी आपल्या देशाला आणि मुख्यतः देशातील तरुणांना जी प्रेरणा दिलेली आहे, जो मार्ग दाखवला आहे, त्याची भरपाई कशानेही होणं शक्य नाही.
हा तर त्यांच्या पुस्तकातला ‘फक्त एक’ परिच्छेद होता. तुम्हाला अंदाजा आला असेलच, ह्या सहज लिहिलेल्या मोजक्या ओळी आपल्या मनाला इतकी शांतात देऊन जातात, तर मग पूर्ण पुस्तक वाचून त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर उभं होताना पाहण याहून मोठं सुख आणि भाग्याची गोष्ट ती कोणती!
-अश्विनी सुर्वे.
अजूनपर्यंत पुस्तक वाचलं नसेल तर हि घ्या लिंक आणि आत्ताच वाचून काढा.
Leave a Reply