आमच्या बद्दल

[full_width]

yashwant-didwagh

[/full_width]
[full_width]

YashwantHo.com – आजवरचा प्रवास…

२०२० च्या फेब्रुवारी महिन्यात एक अशी घटना घडली की ज्यामुळे YashwantHo.com च्या संस्थापकांनी या वेबसाईटच्या माध्यमातून वाचन-लेखन, वाचनकौशल्य आणि मराठी साहित्याबद्दल अधिक जागृती करण्याचा निर्णय घेतला. याआधी आपण २०१६ पासून पुस्तकं, कविता, कथा, आदि विषयांवर माहिती प्रकाशित करत होतो.

नक्की असं काय झालं आणि आम्ही संपूर्ण मोर्चा वाचन-लेखन आणि त्या संदर्भातील विषयांकडे वळवला!?

२०१२ पासून अश्विनी सुर्वे, अनेक सामाजिक संस्थासोबत, आदिवासी पाड्यावरील तसेच अनाथाश्रम व निवासी आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईल लायब्ररी’, अवांतर पुस्तकांचं वाचन व वाटप असे उपक्रम राबवत होत्या.

२०२० च्या फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळांमध्ये नववी – दहावीच्या मुलांसाठी ‘करियर काउन्सेलिंग’ करत असताना त्यांच्या टीमला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, मराठी ही मातृभाषा असलेल्या मराठी माध्यमातील अनेक विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नव्हतं. ही मुलं गणितात हुशार होती पण भाषेच्या बाबतीत मात्र साधे जोडशब्द, सलग वाक्य, मोठा परिच्छेद वाचता न येणं, अनेक शब्दांचा, वाक्यांचा अर्थ न समजणं ही स्थिती होती. मग व्याकरण आणि लेखन तर फार दूरची गोष्ट आणि याचा परिणाम त्यांच्या प्रगतीपुस्तकावर होत होता तो वेगळाच.

शिक्षकांसोबत चर्चा 

या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसोबत बोलल्यावर समजलं की, आठवीपर्यंत ढकलत पुढे आलेली मुलं नववीत त्यांच्या शाळेत येतात आणि मग विद्यार्थ्यांना वाचन-लेखन या गोष्टी मुळातून शिकवणं किंवा सुधारणं शक्य होत नाही. यात तथ्य किती हे नक्की सांगणं शक्य नाही, परंतू ‘स्टोरीटेलिंग’ म्हणजे कथा/गोष्टी सांगण्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावत त्यांचे वाचन-लेखन नक्की सुधारू शकतो हा विश्वास होता.

याच विचाराने अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळेत जाऊन ‘मोबाईल लायब्ररी’ ही संकल्पना नव्याने सुरू करून पुस्तकं देण्यासोबतच त्यावर सामूहिक चर्चा, व्याख्यानं, वकृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा आदि उपक्रम राबवायचं ठरलं. हा प्रोजेक्ट सुरू होऊन काही दिवस होतात तोच तो लॉकडाउनमध्ये थांबवावा लागला. पण हे कार्य थांबू नये आणि त्यात अजून भर पडत राहावी तसेच वाचकांची कम्युनिटी तयार करण्याच्या दृष्टीने YashwantHo.com या वेबसाईटचं मुख्य उद्दिष्ट ‘मराठी साहित्य’ आणि ‘वाचनकौशल्य’ ठरविण्यात आलं.

विविध नव्या-जुन्या पुस्तकांबद्दल, मराठी साहित्य तसेच साहित्यिकांबद्दल आणि मुख्यतः वाचनकौशल्याबद्दल माहिती YashwantHo.com वर तुम्हाला वाचायला मिळेल.

सुरूवातीला म्हंटलं तसं हा एक प्रवास आहे, आणि या प्रवासात तुमच्यासारखे वाचनप्रेमी आमच्यासोबत जोडले जाऊन आपली वाटचाल आपल्या मायमराठीची वृद्धी होण्यासाठीच व्हावी, यासाठी हा एक प्रयत्न!

तुम्हाला आवडेल का आमच्यासोबत या प्रवासात यायला? मग खाली दिलेला सब्स्क्रिप्शन फॉर्म भरा आणि दिलेल्या मेल आयडीवर जाऊन कन्फर्म करा.

चला… जरा मोठं स्वप्न बघूया 🙂 .. आणि जगूया.