डेल कार्निगी एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी लाख्खो लोकांना रोजच्या जगण्यातल्या अशा सवयी सांगितल्या कि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांनी जागतिक स्तरावर सर्वात जास्त खप होणारी बरीच पुस्तकं लिहिली. ‘How To Win Friends & Influence People’ हे देखील त्यातलंच एक पुस्तक. ह्यात त्यांनी लोकांसोबत बोलताना/वावरताना कसं वागावं म्हणजे सगळं काही सुरळीत पार पडतं ह्या संबधित मार्गदर्शन दिले आहे.
पुस्तक वाचता-वाचता मला माझ्यात अजाणतेपणे ह्यात लिहिलेल्या पैकी काही गुण आहेत हे जाणवलं आणि त्यासोबत मला त्यांचा झालेला फायदाही लक्षात आला. किंवा भूतकाळातली एखादी परिस्थिती जी मी माझ्याच हाताने कशी हाताबाहेर घालवली हे सुद्धा लक्षात आलं.
पुस्तकात दिलेले सर्व नियम/ सूत्रे/ प्रिन्सिपल्स एकाच वाचनात लक्षात राहणार नाहीत हे हि ध्यानात आलं. म्हणून त्या सारांश स्वरुपात लिहून ठेवतोय. ह्याचा मला आणि माझ्या सोबत माझ्या वाचकांना सुद्धा उपयोग व्हावा अशी निर्मळ इच्छा! हे वाचून झाल्यावर पूर्ण पुस्तक वाचण्याचा मोह झालाच तर त्यासाठी कोणताही मुहूर्त न शोधता पटकन पुस्तक घ्या आणि वाचायला बसा. ब्लॉगच्या शेवटी पुस्तकाची लिंक दिली आहेच.
पुस्तक ४ भागांत लिहिले आहे. त्यातील मला समजलेला सारांश खालील प्रमाणे-
भाग १ – माणसं हाताळण्याची मुलभूत तंत्र
१. मध हवा असेल तर मधाच्या पोळ्याला लाथ घालू नका
टिका असो, निंदा असो किंवा तक्रार. बऱ्याच लोकांना ती आवडत नाही. तुम्हाला कोणाबद्धल काही नकारार्थी बोलू वाटत असेलंच तर थोडा वेळ जिभेवर ताबा असुद्या. (वाटल्यास जीभ चाऊन धरा हवं तर.) संभाषणात नकारार्थी उद्गार आले तर ते लगेच तिथल्या तिथे तुमच्यावर सुद्धा उलट फिरू शकतात. आणि मग तुमच्या बद्धल काहीतरी वाईट ऐकावं लागतं, आणि मूळ मुद्दा लांबच मग!
२. माणसं हाताळण्यामागचं मोठं रहस्य
दुसऱ्याबद्धल चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा (खरं-खरं). समोरच्या व्यक्तीबद्धल सकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि जमेल तसं ह्या सकारात्मक मुद्यांना बोलण्यात आणा.
३. ज्याला हे करता येईल त्यासोबत सगळ जग असेल. ज्याला जमणार नाही तो एकटाच चालेल
दुसऱ्याला उपयोगी असणाऱ्या गोष्टी त्यांना दिल्या कि त्यांचा तुमच्यातील रस वाढत जातो. जॉब इंटरव्यू असुद्या किंवा लग्नाचा आपण आपल्या चांगल्या गोष्टी सांगतो त्या ह्यासाठीच.
भाग २ – ह्या ६ गोष्टींमुळे लोकांना तुम्ही आवडायला लागाल.
१. हे केल कि सगळीकडेच तुमचं स्वागत होईल.
समोरचा काय बोलतोय ते आवडीने ऐका. आणि तुम्ही आवडीने ऐकत आहात हे त्यांना समजू द्या. त्यासाठी संभाषणात असे प्रश्न विचारा जेणेकरून त्यांनादेखील विषय पुढे नेण्यात मजा येईल. कमी बोलक्या लोकांना हे थोडं अवघड जाईल कदाचित. पण तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. माझ्या बाबतीत तर हे शुअर-शॉट चालतंच!
२. First Impression पाडण्याचा सगळ्यात सोप्पा मार्ग.
तुम्हाला फक्त एक छोटस काम करायचंय. स्मितहास्य. बस्स.. काम झालंच म्हणून समजा. पण हे वाटतं तितकं सोप्पं नाहीय. कारण खोटं-खोटं ‘smile’ करत असाल तर बघणाऱ्याला सुद्धा ते कळून येईल. तुम्ही खरोखर खुश आहात, तर हि गोष्ट इतकी अवघड जाणार नाही.
३. ह्या मुद्यामुळे काम बिघडण्याची शक्यता नक्कीच कमी होईल.
लोकांची नावं तुम्हाला लक्षात राहिली पाहिजेत. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, कोणालाही स्वतःच नाव सर्वात जास्त प्रिय असतं, मग ते तुम्ही कुठल्याही भाषेत घ्या. ह्या धड्यात लेखक डेल कार्निगी नावं लक्षात ठेवण्याच्या युक्त्या सुद्धा सांगतात.
४. चांगल्या प्रकारे संवाद साधण्याचा सोप्पा रस्ता.
समोरचा काय बोलतोय ते फक्त लक्ष पूर्वक ऐका. चांगला संवाद होण्यासाठी तुम्ही त्यात अमुक अमुक वाक्य बोललीच पाहिजेत असं काही नाहीय. आणि बोलण्यापेक्षा तरी ऐकणं नक्कीच सोप्पं आहे कि! पुस्तकात लेखकाने सांगितलेले किस्से तुम्हाला ह्या मुद्द्याच महत्व चांगल्या प्रकारे पटवून देतील.
५. लोकांना नक्की काय आवडतं!
संभाषणात तुम्ही जे काही ऐकाल त्या मुद्द्यांना समोरच्या व्यक्तीला आवडत असणाऱ्या विषयाकडे घेऊन जा. त्यांना आवडतात त्या विषयाच्या आसपास संभाषण असेल तर ऐकणारा निर्धास्त राहतो. अविचाराने मध्येच स्वतःच्या छंदाचा उल्लेख करून विषय बदण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या आवडी बाहेरील विषयाबद्धल ते कदाचित नीट बोलू शकणार नाहीत. आणि हे संभाषण मग त्यांना तितकसं सुखकर वाटणार नाही.
६. लोकांना तुम्ही पटकन कसे आवडू लागता.
समोरच्या सोबत अस्सल bonding बनवायचं असेल तर त्यांना तुमच्या बोलण्यातून समजू द्या कि ‘ते तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत’.
(कोणासोबत पहिल्यांदाच ‘डेट’ला जात असाल तर ह्या ६ मुद्यांची लक्षपूर्वक उजळणी करून जा. :p )
भाग ३ – तुमच्या विचारांना सहमती कशी मिळवता येईल.
१. तुम्ही युक्तिवाद जिंकू शकत नाही.
कुठल्याही वादातून तुम्हाला काही मिळवायचं असेल तर मुळात ‘वाद करण’च टाळा! तुम्हाला वाद विवाद होण्याची चिन्ह दिसू लागली कि हळूच तिथून निसटण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पुस्तकात हा धडा वाचाल तेव्हा तुम्हाला लेखकाला ह्यातून नक्की काय सांगायचं आहे ते समजेल.
२. दुश्मन बनवण्याचा मस्त उपाय – तो टाळता कसा येईल.
दुसऱ्याचा राग अंगावर घेण्याचा सगळ्यात सोप्पा रस्ता म्हणजे त्याला बोलणं कि ‘तू चुकीचा आहेस’. (आ बैल मुझे मार टाइप्स). त्या ऐवजी तुम्ही बोलू शकता कि, ‘मला ते असं कधीच वाटलं नाही.’
३. चुकी केलीय.. तर ती कबूल करा.
चुका लपवायला गेलात तर तुम्ही समोरच्याला उद्धट वाटू लागता. ह्यामुळे समोरच्याच्या मनात तुमच्याबद्धल नकारार्थी विचार येऊ शकतात. चुका नैसर्गिक आहेत, चुकतो तोच माणूस.
४. मधाचा एक थेंब
बऱ्याचदा आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं ज्यात आपल्याला कोणाची तरी तक्रार करणं भाग असतं. बोलण अधिक सोप्पं करण्यासाठी अशा वेळी तुम्ही संभाषणाची सुरवात एखाद्या चांगल्या मुद्याने करू शकता. उदाहरणार्थ :- तुम्ही जेवणासाठी हॉटेलमध्ये गेला आहात, तिथली सर्विस तुम्हाला आवडली नाही. तर तुम्हाला ज्या गोष्टी आवडल्या त्या सांगण्यापासून सुरुवात करा, आणि मग तुम्हाला अडचणीच्या वाटणाऱ्या गोष्टी सांगा, ज्यामुळे हॉटेलची प्रतिष्ठा भविष्यात धोक्यात येऊ शकते. असंही होऊ शकतं कि तुमच्या खऱ्याखूऱ्या प्रतिक्रियेमुळे तुम्हाला हॉटेल मालकाने डिस्काउंट कूपन दिले.
५. Socratesच रहस्य
एखाद्याला तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी सुरुवातीला असे प्रश्न विचारा किंवा असे मुद्दे घ्या ज्यांची ते ‘होकारार्थी’ उत्तर देतील. हळू हळू एक एक पायरी ‘हो’ ‘हो’ अशी उत्तर घेता घेता सर्व होकारांची माळ तुम्हाला तुमच्या मनातल्या अपेक्षित उत्तरापर्यंत घेऊन जाईल.
६. तक्रारींना सुरक्षित रित्या हाताळताना
कोणी तुमच्याकडे तक्रार घेऊन आलं असेल तर त्याला मध्येच तोडून तुमचं बोलणं सुरु करू नका. त्यांच्या गरम डोक्याला थोडा शांत होऊ द्या, त्यांचे सगळे मुद्दे संपू द्या. असे प्रश्न विचारा ज्यामुळे ते अजून बोलतील. अशाने त्यांना पूर्णपणे व्यक्त होण्याची संधी मिळते, ज्याचा उपयोग तुम्हाला संभाषणाच्या शेवटी ती अडचण दूर करताना होतो.
७. सहाय्य कसं घ्यावं.
तुम्हाला जे सांगायचय त्या शेवटच्या मुद्यापर्यंत त्यांना बोलता-बोलता घेऊन जा. सर्व कल्पना त्यांच्या पुढे मांडा, आणि शेवटी ‘तुमचं ह्यावर काय मत आहे?’ असं विचारून त्यांच्या मताला तुमच्या बोलण्यात व्यवस्थित मिक्स करा. शेवटी त्यांना असं वाटू लागेल कि हि पूर्ण कल्पना त्यांचीच आहे. आणि त्या कल्पनेसोबत त्यांना थोडं आपलेपण वाटेल. कामाच्या ठिकाणी अशा संवादाचा खूप फायदा होतो.
८. एक जादुई नुकसा जो काम करतोच करतो.
समोरची व्यक्ती कशा प्रकारच्या वातावरणातून आलीय हे माहित नसेल तर त्याबद्धल थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला त्यांच्या जागी बसवून विचार करा. ह्या व्यक्तीला अमुक-अमुक परिस्थितीत कसं वाटेल, याचा विचार करा. असं केल्यामुळे तुम्हाला त्यांच्या बद्धलच्या कधीच लक्षात न आलेल्या गोष्टी कळतील आणि कदाचित ह्याचाच उपयोग तुम्हाला संभाषण पुढे नेण्यासाठी होईल.
९. सगळ्यांना काय हवं आहे.
शक्यता नाकारता येत नाही कि, तुम्ही पूर्णपणे विरोध कराल असा मुद्दा तुमच्या पुढे कोणीतरी-कधीतरी घेऊन येईलच. अशा वेळी त्यांच्या मताला विरोध असला तरी निदान त्यांच्या विचारांना आणि भावनेला समर्थन द्या.
१०. अशी कळकळीची विनंती जी सगळ्यांना आवडेल.
तुमची मागणी योग्य आहे कि अयोग्य हा पुढचा मुद्दा आहे, तुम्ही ती कळकळीने केलीत तर ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. तुमचं वाक्य अशा साचात बसवा कि ऐकणाऱ्याला तुमची मागणी ‘चूक-किंवा-बरोबर’च्या गणितापलीकडे जाऊन पूर्ण करू वाटेल. (बऱ्याचदा क्युट मुलींना बसायला सीट अशीच तर मिळते!)
११. चित्रपटात हेच चालतं. TV मध्ये पण हेच करतात. मग तुम्ही का करत नाही?
तुमच्याकडे एक भन्नाट कल्पना आहे, तर ती एखाद्या कथेत कशी टाकता येईल याचा जरा विचार करा. लोकांना पटकन कनेक्ट होईल अशा रोजच्या गोष्टींमध्ये तुमची कल्पना व्यवस्थित ओवून ठेवलीत कि त्याचा प्रभाव खूप चांगला पडतो. दंतकथा शतकानूशतकं ऐकल्या जातात, सांगितल्या जातात त्यामागचं हेच मुख्य गमक आहे.
१२. काहीच चालणार नाही, तेव्हा हे करा.
तुमच्या कल्पना किंवा प्रोत्साहनपर केलेली वक्तव्य समोरच्याला पटवण्यात कमी पडत असतील तर त्यांना आवाहन देण योग्य ठरेल. ‘बेट लाव.. तू हे करूच शकत नाहीस…!!’ अशा प्रकारचं आवाहन लेखक करायला सांगत नाहीय. आवाहन देणं म्हणजे, त्यांच्या मनाला ते काम करण्याची ओढ लागेल अशी स्पर्धा निर्माण करणारं. म्हणजेच तुम्हाला ते स्वतःहून काम सुरु होईल असं आव्हान देता आलं पाहिजे.
भाग ४ – नेते बना – लोकांना राग न येऊ देता त्यांनी केलेल्या चुकीला असे बदला.
१. चूक सांगायचीच आहे तर अशी सुरुवात करा
कुठल्या व्यक्तीची किंवा संस्थेची चूक काढताना सुरुवात चांगल्या मुद्द्यांपासून करा. तुम्हाला त्यांच्यातल्या काय काय गोष्टी आवडल्या ते सांगा. एकदा का तुम्ही हे स्पष्ट केलंत कि ह्या-ह्या चांगल्या गोष्टी तुमच्यात आहेत, मग तुम्ही त्यांच्यातल्या गुणदोषांच विवेचन केले तरी ते खपवून घेतात.
२. टीका कशी करावी – तेही त्याबद्धल तिरस्कार न घेता.
कोणाची चूक काढायचीच असेल तर ती अप्रत्यक्ष रित्या दाखवावी, एखादा उलट दिशेचा होकारार्थी प्रस्ताव मांडून हे काम अगदी व्यवस्थित पार पडतं. ‘पण’ आणि ‘आणि’ ह्या दोन शब्दांच्या योग्य वापरणे देखील गुणदोषांची जाणीव करून देता येते.
उदाहरणार्थ – पाहिलं वाक्य – अरे वाह.. ह्या वेळी सगळा होमवर्क केलास, पण पुढल्या वेळी जरा चांगल्या अक्षरात करून ये.
दुसरं वाक्य – अरे वाह.. ह्या वेळी सगळा होमवर्क केलास, आणि पुढल्या वेळी जरा चांगल्या अक्षरात करून ये.
दुसऱ्या वाक्यात ऐकणाऱ्याला त्याची चुकी पण कळेल आणि ती सुधारण्याची इच्छा सुद्धा होईल.
३. स्वतःच्या चुकांबद्धल बोला
तुम्ही काढलेल्या चुकांमुळे समोरच्याला वाटणारी मानहानी क्षमवण्यासाठी संभाषणाची सुरुवात स्वतः केलेल्या चुकांपासून करा. ह्यामुळे चुका करण्यात मानहानी सारखं काही नाही अशी भावना ऐकणाऱ्याच्या मनात रुजायला मदत होते.
४. ऑर्डर सोडल्यात तर ते कोणालाच आवडत नाहीत
एखाद्याला सूचना देताना, मोठ्याने ओरडण्याऐवजी आलेल्या अडचणी बद्धल प्रश्न विचारा आणि पुढील संवादात त्यांना अडचणीवर काय उपाय निघू शकतो ह्या मुद्यापर्यंत घेऊन जा. अडचणीवर उपाय शोधण्यात त्यांचा सुद्धा हातभार आहे अशी भावना त्यांच्या मनात येते. आणि कामाला जोमाने सुरुवात होते.
५. दुसऱ्याला तोंड लपण्यासाठी जागा द्यावी
एखाद्याच्या गुणदोषांचे विश्लेषण तुम्ही केले असेल तर त्यांना तोंड लपवण्यासाठी जागा सुद्धा आपणच करून द्यावी. ते त्यांच्या चुका सुधारू शकतात का, हे पाहण्याची त्यांना संधी द्यावी. अडचण दूर करण्याऐवजी अडचण निर्माण करणाऱ्याला दूर करण थोडं अमानवी वाटू शकतं.
६. सुधारण्यासाठी प्रोत्साहन गरजेचं आहे.
कोणी कामात छोटीशी का होईना सुधारणा दर्शवली तर त्याची प्रशंसा करावी. लहानपणापासून कौतुक होत असेल तर त्या बाळाची वाढ पटापट होते म्हणतात ना.. ते म्हणूनच.
७. कुत्र्याला जरा चांगलं नाव द्या
तुम्ही लोकांपुढे एखाद्याची ओळख करून देत असता तेव्हा, थोडी प्रशंसा करा, असे शब्द वापरा कि ज्यामुळे त्यांना तुमच्या त्या शब्दांना खरं करण्याची इच्छा होईल किंवा कमीत कमी ते शब्द खोटे ठरणार नाहीत ह्याची तरी ते काळजी घेतील. लोकांपुढे त्यांच्याबद्धल वाईट बोललात तर ते तसेच वागणार.
८. चूक दुरुस्त करण सोप्पं आहे हे समजवा.
चूक कशी दुरुस्त करता येईल हे सांगण्याआधी ती दुरुस्त करण सोप्पं आहे हे समोरच्याला पटल पाहिजे. ह्या चुकांची दुरुस्ती त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी करता येण्यासारखी आहे अशी भावना त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजे. हे न करता केवळ चुका कशा दुरुस्त कराव्यात ह्या बद्धल सूचना केल्या तर त्या चुकांची दुरुस्ती अधिक अवघड आहे असं वाटण्याची शक्यता असते.
९. तुम्हाला हवी असलेली गोष्ट करण्यात त्यांना आनंद वाटला पाहिजे.
माणसाला तुम्ही ओळखू लागला कि त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा अभिमान वाटतो हे सुद्धा तुम्हाला समजतं. मग जेव्हा तुम्ही त्यांना काही काम सांगता तेव्हा त्या कामाचं आणि त्यांना अभिमान वाटणाऱ्या गोष्टीचं तुम्हाला कनेक्शन शोधता आलं पाहिजे. त्यांचा अभिमान अजून द्विगुणीत कसा करता येईल अशी ध्येय त्यांना द्या. अशाने लोकं पटकन तुमचं काम ऐकतील कारण ते करण्यात त्यांना मजा येत असेल.
पुस्तकाची लिंक : मराठी आवृत्ती – इंग्रजी आवृत्ती
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
यशवंत दिडवाघ
पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.
Leave a Reply