अग्ग बाई! सलमान!!

सेशन कोर्टात रोजच्यापेक्षा जरा जास्तच गर्दी दिसत होती. कोर्टाच्या इमारतीचा चौथा मजला गर्दीने खच्चून भरून गेला होता. त्यात बहुतेक पोलीस आणि वकीलच होते. आम पब्लिकला क्वचितच उभा राहायला जागा उरली होती.

तरुण मुली आतल्या आत खुश होऊन हसत होत्या. आणि जर का त्यांना कळालच कि मी एकटीच हसतीय हे कुणी तरी बघितलंय तर स्वतःहून मिश्कील हसून त्या वेळ मारून नेत होत्या. पुन्हा दिवसा पडलेल्या स्वप्नात स्वतःला हिरोईन समजून त्या गर्दीत दुपारच्या कडक गर्मिला बर्फ समजून खेळवत होत्या.

‘अग! तो कुठे आहे!’ गर्दीतून एका मुलीचा आवाज माझ्या कानावर आला. स्वतःच्या बॉयफ्रेंडची सुद्धा इतक्या उत्कटतेने विचारपूस केली नसणार हिने उभ्या आयुश्यात. मी घाईघाईत गर्दीतून वाट काढत होतो म्हणून त्यापुढच मला ऐकू आलं नाही. पण काय तरी प्रफुल्लीत होऊन किंचाळल्यासारखा आवाज त्या मुलीने काढला. नॉर्मली आजकालच्या सगळ्याच मुली खुश झाल्यावर काढतात तोच तो आवाज.. जो बाजूच्या पुरुष मंडळींना ‘मी खरच काही केलं नाही’ असे सभ्य भाव चेहेऱ्यावर आणायला भाग पडतो. अगदी तोच तो आवाज. कोर्टाला काय तरी भलतच स्वरूप आलं होतं.

कोर्ट रूम ५४ मध्ये आत शिरायला गेलो तर चक्क एक ३ स्टार पोलीस अधिकाऱ्याने मला हटकले.

‘काय काम आहे आत!’.

रोज १० वेळा कोर्टात ये जा करतो तेव्हा साधा शिपाई पण ढुंकून देखील मला विचारत नाही आणि आज चक्क ३ स्टार साहेब!

‘सलमान भाय है क्या अंदर? ‘ तेवढ्यात एका तरुणाने मला विचारलं. लगेच मी माझी नजर त्या ३ स्टार अधिकार्याच्या डोक्यावरून फिरवली आणि या गर्दी मागच रहस्य उलघडलं. ‘चक्क सलमान खान!!’.

एका शहाण्या सुजाण नागरिकाप्रमाणे तो पाठून तिसऱ्या रांगेत बसला होता. हि सुजाण-शहाण्या बाळाची बुद्धी कदाचित कोर्टाच्या धाकामुळे उसनी आलेली असावी कदाचित. उंच असल्यामुळे मी त्याला व्यवस्थित बघू शकत होतो. पण बाकी गर्दीला सलमानचा चेहेरा तर सोडाच त्याचा नुसता ‘कान’ जरी दिसला तरी खूप झालं असत.

‘महत्वाच काम नसेल त्यांनी नंतर या’ असं बजावण्यात आलं. मग मला तिथून निघावं लागलं.

गावावरून आलेल्या नुकत्याच पोलिसात भरती झालेल्या लेडीज कॉन्स्टेबल पलीकडच्या कोपऱ्यात मघासपासून लाजत मुरडत का उभ्या होत्या ते आता मला समजलं. पंचविशीतल्या लेडी वकिलांची गर्दी ह्याच कोर्टाबाहेर का झालीय हे पण समजल. तिथल्या विवाहित बायका सुद्धा इतक्या खुश झाल्या होत्या कि त्यांच्या नवऱ्याने त्यांची प्रतिक्रिया बघितली असती तर इथे कोर्टातच उद्या किमान १० तरी डिवोर्स पेटीशन फाईल झाले असते. अतिशयोक्ती नाही हि.. खरच..!

आपली पब्लिक सलमानसाठी एवढी वेडी का आहे मला कळत नाही! त्यापैकी किती जणांना माहित होतं कि नक्की सलमान ने काय केलय म्हणून तो इथवर आला आहे !. ‘माणसांवर गाडी चढवून, माणूस असण्याचा (being human) दावा करणारा हा सलमान आणि त्याचे चाहते!’. देवा माझ्या!! एखाद्याचा चाहता वर्ग एवढा वेडा असू शकतो याची मी पहिल्यांदाच अनुभूती घेत होतो. तो कोर्टात का आलाय याची कोणालाच फिकीर नव्हती. तो आलाय हेच त्याच्यासाठी खूप होतं.

not-being-human-salman

पुढच्या दिवशी त्याच कोर्टात मी चार-पाच पोलीस आणि अबू सालेम ला बघितला. नशीब आपली पब्लिक त्याची fan नाहीय…!!!

Related Posts

  • Reply Niranjan Nishigandha Dattatraya Joshi July 8, 2018 at 2:46 pm

    हे आपल्या so called सुशिक्षित पिढीच दर्शनच नव्हे काय!

  • Leave a Reply