टिप

आपल्या रोजच्या जेवणाच्या ठिकाणी वेटरला टिप द्यावी कि नको हा विचार मी करत होतो. गेली १० वर्ष हेच वेटर काका आमची ऑर्डर घेत आलेत. आज टिप द्यावी तर उद्या ती न दिल्याने काकांना खराब वाटेल आणि बर.. रोज टिप देणं आपल्याला परवडणार देखील नाही. १० वर्ष आधी मला हे टिप देण्याचे विचार कधीच आले नव्हते. कदाचित तेव्हा स्वकमायी नव्हती ना म्हणून..

पण काहीही म्हणा ते काका आहेत खूप सही. कधी कधी रुटीन मध्ये बदल झाला आणि ६-७ महिन्याचा gap पडला तर काका मला आवर्जून विचारतील ‘काय रे, दिसला नाहीस बरेच दिवस’. माझी जवळ जवळ प्रत्येक ऑर्डर त्यांना लक्षात असते, मसाला डोसा ‘थोडा कडक’, थाळी मागवली तर ती ‘पुरी थाळी’. किंवा थाळीत येणारी कुठली भाजी मी नको म्हणीन, ते सगळं लक्षात असतं त्यांना.

१२वीला क्लास सुटल्यावर मोठ्या भावाचे जुने टी-शर्ट जीन्स घालून त्या हॉटेलला जाणारा मी, आता ऑफिस सुटल्यावर नवीन शुभ्र कडक इस्त्री असलेल्या फोर्मल कपड्यात तिथे जायला लागलो होतो. कदाचित टीप देण्याचा विचार (वजा अहंकार) मला त्या शुभ्र कपड्यांमुळेच आला असेल. आणि कदाचित ‘काय रे, दिसला नाहीस बरेच दिवस’ ऐवजी ‘काय ओ, दिसला नाहीत बरेच दिवस’ हा त्यांच्या बोलण्यातला झालेला बदल असेल.

पण टिप द्यावी कि नाही ह्या विचारात मी होतोच तेवढ्यात वेटर काका माझ्या बाजूला आले आणि माझ्या पुरी थाळी मधली माझी नावडती भाजी बाजूला करून २ जिलेब्या त्यांनी तिथे ठेवल्या. आणि माझ्याकडे बघून हलकेसे हसले. ‘अजून कुठली भाजी पाहिजे तर बोला हा काय! कसलं टेन्शन घेऊ नका’.

आज मी १० वर्ष जुना हाफ-पेंट घालणारा मी असतो तरी काकांनी मला इतकंच स्पेशिअल ट्रीट केलं असतं. ते हॉटेल त्यांच्या मालकीचं नव्हतं, पण त्यांच्या ह्याच प्रेमळ स्वभावामुळे हॉटेलच्या मालकाने सगळं हॉटेल त्यांच्या हातात कधीच सोपवून दिलं होतं. त्यांचा हा स्वभाव माझ्या ५-१० रुपयांच्या टीपसाठी नव्हताच मूळी. आणि तसही.. ह्या हॉटेलच्या मालकाला १० रुपयाची आमिष दाखवणारा मी कोण!!

मी चूप-चाप काकांनी दिलेली जिलेबी (टीप) खाऊ लागलो.

थोड्या वेळासाठी मी तिथे हाफ-पेंट वरच बसलोय असं वाटलं मला 🙂 .

Facebook Comments

Related Posts

No Comments

Leave a Reply