गेट वे ऑफ इंडिया

‘मुंबई, एक माया नागरी आहे’. हे वाक्य आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. मी ते प्रत्यक्ष अनुभवलं आणि माझी वकिली सोडून पूर्णपणे लिखाणात घुसण्याचा निर्णय घेतला. हो, हीच आहे मुंबईची ‘माया’. हिला ‘मायावी मुंबई’ म्हणा किंवा ‘मायाळू मुंबई’, जो जसा बघेल त्याला ती तशी दिसेल. मुंबईसाठी स्पेशिअली लिहिलेल्या ह्या लेखांमध्ये मी तुम्हाला मुंबईच्या अशाच काही गिन्या-चुन्या जादुई वास्तूंबद्धल सांगणार आहे, ज्यांची जादू त्या वास्तूच्या डोळ्यात डोळे टाकून बघेल त्यालाच कळते. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या मुंबई सफरी मधला थोडासा वेळ काढून इथे फिरकाव, हाच एक यामागचा उद्देश.

मी कदाचित दुसरीत असीन तेव्हा ह्या भव्य दरवाजाचं मोठेपण मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं. आमच्या शाळेची सहल गेली होती तिथे. आज वयामुळे आलेली प्रगल्भ दृष्टी तेव्हा माझ्याकडे नव्हती, आणि कधी ह्या वास्तू बद्धल हे असं काही इतक्या उत्साहाने लिहित असीन असाही कधी विचार केला नव्हता. तिथे काढलेला तेव्हाच्या जमान्यातला ४० रुपयाचा पटकन तिथल्या तिथे कॅमेऱ्यातून फर्रर्रर्र दिशी बाहेर येणारा फोटो आणि त्यात दिसणारा आमच्या पाठीमागचा हा भव्य दरवाजा अगदी शाळा संपेपर्यंत माझ्यासाठी ‘एक अविस्मरणीय सहली’च्या निबंधात लिहिण्याचा विषय होता.

वर्गशिक्षिका बाईंनी इथली ऐतिहासिक माहिती किती सांगितली आणि किती जणांना ती किती लक्षात राहील कुणास ठाऊक, पण आज मला ह्या विशाल दरवाजाबद्धल बरीच माहिती मिळाली आहे. चला तर बघुयात का बांधला होता हा एवढा मोठा दरवाजा.

स्थापना –

ह्या गेटला बघितल्या बघितल्याच  तुम्हाला Paris च्या Triumphal Roman Arch ची आठवण झाली असेल. अगदी हुबेहूब नाही, पण जवळपास सारखीच बांधणी आहे दोन्हीची. क्वीन मेरी आणि किंग जॉर्ज पाचवा, यांच्या पहिल्या भारत भेटीला ह्या विशाल दरवाजातून अगदी राजेशाही थाटात एन्ट्री करण्याचा प्लान होता, पण डिसेंबर १९११ पर्यंत ह्याचं काम पूर्ण न झाल्यामुळे त्यांना फक्त ह्याचा छोट्या आकारातला पुठ्ठ्याचा ‘गेट वे ऑफ इंडिया’ बघावा लागला. ह्यांची संरचना १९१४ साली Scotsman George Wittet यांनी केली, मग त्याला अप्रूवल मिळून पूर्ण बांधणी ह्वायला १९२४ साल उजाडलं. तिथेच जवळपास उपलब्ध असणाऱ्या पिवळ्या बेसाल्ट खडकाचा यात जास्तीकरून उपयोग केला गेला.

ऐतिहासिक खूष खबर –

प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटेल कि ताज हॉटेल इथे गेट वे ऑफ इंडिया आहे म्हणून बांधलं असेल. हो ना.. पण नाही तसं बिलकुल नाहीय. गोऱ्या राजा राणीला इम्प्रेस करायला हाच स्पॉट चांगला आहे, ताज हॉटेल मुळे ह्या गेट ला शोभा येईल ह्या विचाराने याची इथे उभारणी झाली. खरच.. आपल्या सर्वांचीच मान उंचावेल अशी ऐतिहासिक माहिती आहे हि.

जवळून एक नजर –

अरबी समुद्राकडे एकसारखा टक लावून पाहणारा हा दरवाजा बऱ्याच जणांची कुटुंब जगवतोय. डिजिटल जमाना आला तरी आजही तुम्हाला ते फर्रकन चटकन फोटो प्रिंट काढून देणारे कॅमेरामन इथे दिसतील. थोडा अजून पुढे गेलात आणि अगदी दरवाजाच्या जवळ जाऊन उभं राहिलात तर वरती ‘“Erected to commemorate the landings in India of their Imperial Majesties King George V and Queen Mary on the second of December MCMXI.”’ हे कोरलेलं दिसेल.

ह्या गेटची बांधणी colonial fusion architecture वापरून करण्यात आली आहे. हि architectural style खऱ्या अर्थाने लक्षवेधी आहे. त्यावरील घुमट तुम्हाला मुस्लीम बांधणीची आठवण करून देतील आणि त्याच बरोबर त्यावरी नक्षीकाम तुम्हाला तुम्ही हिंदुस्तानात उभे आहात याची जाणीव करून देईल. इथून जवळ अगदी अर्ध्या किलोमीटर वर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालायची बांधणी सुद्धा काहीशी अशीच आहे.

बाय बाय इंग्रज –

फेब्रुवारी १९४८ ला Somerset Light Infantry हे मिल्ट्री युनिट म्हणजे ब्रिटीशांची शेवटची बटालीयन ह्या दरवाजातून ब्रिटीश जहाजांवरून पाठवण्यात आली. तेव्हा तिथे जमा झालेली गर्दी बघायला आपल्यापैकी फार थोडीच लोकं तिथे असतील. पण आजोबांच्या वयाची इथली रहिवासी माणसं जेव्हा ते अगदी अभिमानाने सांगतात तेव्हा आपलीही छाती काहीही काम न करता आपोआप फुलून येते. कारण हाच होता इंग्रजी महासत्तेचा शेवटचा अध्याय.

Related Posts

Leave a Reply