मुंबई शहराच्या पोटातली – खोताची वाडी

मोठं शहर, मोठी स्वप्न, आपली मुंबई आहेच अशी; रंगीत, आपल्या स्वप्नांना रंगवणारी, आकार देणारी. गेली कित्तेक वर्ष ह्या शहरात सातत्याने बदल होत राहिले, पण ह्या ना त्या कारणांमुळे आपली मुंबई भूतकाळाशी अनेक धाग्यांनी जोडलेली राहिली. ‘खोताची वाडी’ हा ह्या शहरातला असाच एक जुना रेशमी धागा.

गिरगावच्या जगन्नाथ शंकरशेठ मार्गावर तुम्हाला हा रेशमी धागा पहायला मिळेल. जशी आजकालच्या रेशीम कपड्यात जुन्याकाळा एवढी शुद्धता राहिली नाही, तसंच ह्या सांकृतिक वारसाच सुद्धा झालय. एकेकाळी संपूर्ण पणे पोर्तुगालीन घरांनी सजलेली हि वाडी आता सिमेंटच्या, उंचच उंच इमारतींच्या भेसळीने तिचा ओरिजिनल चार्म हरवू लागलीय.

नावामागचा इतिहास:

असं म्हंटल जातं कि २०० वर्ष आधी हि जागा खोत नामक जमीनदाराच्या मालकी हक्काची जागा होती. त्यांनी हि जागा इथे राहत असणाऱ्या लोकांच्या पूर्वजांना तुकड्या तुकड्याने विकली आणि एकोणिसाव्या शतकात इथे लोकवस्ती नव्याने वसली. तेव्हा मुंबईचा विकास एक जागतिक दर्जाचं बंदर म्हणून केला जात होता.

काहीतरी हटके:

इथले स्टायलीश चिंचोळे रस्ते तुम्हाला मुंबईत कुठेच पाहायला मिळणार नाहीत. आणि ह्या रस्त्यांवरून चालताना तुम्हाला जाणवेल कि ह्या अथक, कधीच न थांबणाऱ्या मुंबई शहरात एक छोटस गाव सुद्धा आहे. इथे तुम्हाला पोर्तुगीज बांधणीची घरं पाहायला मिळतील. थोडा वेळ तर तुम्हाला गोव्यात आल्या सारखा भास होईल. ज्या गल्लीतून तुम्हाला चालता येत नाही त्यातून एकदम कलाकुसरीने दुचाकी चालवणारे कलाकार तुम्हाला तुम्ही मुंबईत आहात ह्याची आठवण करून देतील.

इथल्या घरांच्या सुंदर बालकन्या, Sorry Balconies, त्यावरील रंगीत नक्षीकाम तुम्हाला बाकी मुंबईत कुठेच पाहायला मिळणार नाही. घराच्या दरवाज्यापर्यंत जाणाऱ्या बाहेरच्या लाकडी पायऱ्या, उतार असलेली छप्पर, सगळ काही एकदम युनिक, हटके.

नुसते बाहेरूनच नाही तर इथले १७५ वर्ष जुने असलेले बंगले आतमधून सुद्धा तितकेच मनमोहक आहेत. अर्थात, तुमच्या ओळखीचं कोणी तिथे राहत असेल तरच ते तुम्हाला पाहता येईल. तिथली १२० वर्ष जुनी खांडेराव चाळ पण तितकीच आश्चर्यव्यक्त करण्यासारखी आहे.

काहीतरी गडबड आहे:

१९९५ साली ह्या जागेला हेरीटेज प्रोपर्टी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पण हि घोषणा २००६ साली रद्द करण्यात आली. आता ह्यामागे नक्की काय कारण होतं ह्याच्या खोलात गेलो तर बरेच राजकीय विचार मनात येऊन जातात, पण सध्या त्यात शिरायला नको. इथल्या ऐतिहासिक महत्वाचा सगळ्यांना विसर पडू नये म्हणून खोताची वाडी वेलफेयर असोसीएशन ची स्थापना करण्यात आली आहे, जे दर वर्षी खोताची वाडी फेस्ट भरवतात.

धार्मिक एकता:

इथे तुम्हाला अष्टविनायकाची गाणी सुद्धा ऐकायला मिळतील आणि येशूची सुद्धा! इथे एक क्रिश्चन प्रार्थना स्थळ आहे. असं मानलं जात कि इथल्या दैवी शक्तीमुळेच पूर्वी १८९०च्या दशकात आलेल्या प्लेगच्या साथीपासून इथल्या रहिवाश्यांच संरक्षण झालं.

सो कॉल्ड विकास:

खोताच्या वाडीत पूर्वी ७६ बंगले होते, ज्यातले आता फक्त २०-२५ च उरले आहेत. इथले रस्ते बारीक आहेत हेच त्यांना मिळालेलं वरदान आहे, नाहीतर अलोट गर्दी येऊन हे उरलेले बंगले सुद्धा पडून गेली असती. ह्या उरलेल्या घरमालकांना रस्ता रुंदीकरणाच कारण सांगून कधीही बाजूला केलं जाऊ शकत अशी भीती आहे.

उज्वल भविष्यासाठी भुतकाळ सिमेंट मध्ये मिसळायला निघालेल्या मानवी हवरटपणाला काय नाव द्यावं तेच कळत नाहीय. मुंबईला शांघाई करण्यात थोडी घाई तर होत नाहीय ना? अशा जागांना मुंबईच्या नकाशावरून पुसून टाकायचं कि त्यांना संरक्षण द्यायचं, हे कसं आणि कोण ठरवणार?

अजूनही वेळ गेलेली नाही:

वय वाढलं कि सौंदर्य कमी होतं हे खरंय, पण ह्या जागेचं सौंदर्य आपण टिकवून ठेवू शकतो. अजूनही आपण त्या जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरून १५० वर्ष पाठीमागे जाऊ शकतो. पण त्यासाठी इच्छाशक्तीची गरज गरज आहे.

अगदी थोड्याच लोकांना माहित असलेल्या ह्या गोंडस गावात एकदा तरी जाऊन बघाच, तुम्ही पण ह्याच्या प्रेमात पडाल. तुम्हाला मुंबईच्या गर्दीपासून लांब पळायचं असेल तर मुंबईतल्या मुंबईत हि एकंच शांत जागा उरलीय सध्या तरी!

Related Posts

Leave a Reply