वेळ वाया घालावण्याआधी

तुम्हाला कोणी विचारलं कि आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती? तर तुम्ही काय उत्तर द्याल?

इथून पुढे वाचण्याआधी ह्या प्रश्नाचं मनातल्या मनात उत्तर द्या. मगच पुढे वाचा.

ह्या प्रश्नाचं गौतम बुद्धांच उत्तर असं होतं..

“आपल्या आयुष्यातली घोड चूक म्हणजे, आपल्याला वाटतं कि आपल्याकडे बराच वेळ आहे! वेळ जरी तुम्हाला कुणालाही काही न देता फुकट मिळत असला तरी त्याची किंमत मोजण अशक्य आहे. तुम्ही वेळेचे मालक नसता, तरी तुम्ही वेळेला वापरू शकता. वेळ कुठेच साठवून ठेवता येत नाही, पण तरी तिला खर्च करू शकता. आणि मोठी गंमत म्हणजे, एकदा का वेळ गेली.. कि गेली.. ती पुन्हा कधीच येत नाही.”

ओके. मी गौतम बुद्ध नाही. तुमच्यासारखाच एक सर्वसाधारण जीवंत माणूस आहे. थोडी फार आकडेमोड येते मला. शिवाय बरेच सर्वे सुद्धा हेच सांगतात कि, एक सर्वसाधारण माणूस ७८ वर्ष जगतो, त्यातली (एका वर्षाला मिनिटांमध्ये बघायचं झालं तर ५,२५,६०० मिनिट असं पकडून) आपण २८ हून अधिक वर्ष झोपतो, म्हणजे जवळ-जवळ एक तृतीयांश आयुष्य! आपण साडेदहा वर्ष काम करतो, पैसे कमावतो. त्यातसुद्धा ५०% लोकं त्यांना त्यांचं काम आवडत नसून सुद्धा काहीही विचार न करता ते करत असतात.

वेळ पैशापेक्षा खूप महत्वाचा आहे. पैसा थोडा अजून मिळेल, पण वेळ; वेळ नाही मिळणार. आपली ९-१० वर्ष टी.व्ही., इंटरनेट अशा गोष्टींमध्ये जातात. अजून १० वर्ष जेवण, स्वच्छता आणि इतर लहान-सहान गोष्टींमध्ये जातात. ३-४ वर्ष शिक्षण घेण्यात, २-३ स्वतःला सुधारण्यासाठी आणि २-३ शॉपिंगसाठी जातात. त्यात भर म्हणून कमीत कमी १ वर्ष (आणि जर का तुम्ही कल्याण-विरारला राहून ३-३ तास ट्रेनमध्ये प्रवास करणारे आहात तर ३हुन जास्त वर्ष) प्रवास करण्यात जातात. सगळी बेरीज केलीत तर प्रत्येकाला कमीत कमी १० वर्ष तरी मिळतात. हि वेळ कशी घालवायची? हा विचार कधी केला होता का!

स्टीव्ह जॉब्स म्हणाले आहेत, ‘तुमच्याकडे खूप लिमिटेड वेळ आहे, मग ती वेळ दुसऱ्यासारख आयुष्य जगण्याच्या नादात घालवू नका!’

वेळेच्या बाबतीत २ मुद्दे पक्के आहेत, एक चांगला आणि दुसरा वाईट. पहिला वाईट मुद्दा सांगतो. वाईट गोष्ट हि कि ‘वेळ नेहमी उडून जाईल, तुम्ही त्याला कधीच पकडू शकणार नाही’ पण चांगली गोष्ट हि कि, ‘ती वेळ कशी उडवायची हे तुमच्या हातात असेल.’

सोप्पा समीकरण आहे. दिवसाला तुम्हाला २४*६०=१४४० मिनिटं मिळतात. आपण थोड्यावेळासाठी असं समजू कि रोज तुम्हाला १४४० रुपये मिळतात, जे तुम्ही कसेही खर्च करा किंवा करू नका, दिवसाच्या शेवटी ते सगळे जाऊन शून्य होणार आहेत आणि पुन्हा उद्या १४४० रुपये मिळणार.

ह्या पैशाच तुम्ही काय कराल?

रोज तुम्हाला १४४० मिनिटं मिळतात, आता ह्याच जागी जर का ते पैसे असते तर ते आपण उगाच कुठेही वाया घालवले असते का? मग वेळ वाया का घालवतो आपण? वर दिलेल्या बुद्धांच्या शिकवणीनुसार तर तुम्हाला पटलंच असेल कि हि मिनिटं त्या रुपयांपेक्षा खूप शक्तिशाली आहेत. तुम्ही जास्त पैसे मिळवाल, पण वेळ नाही.

वेळेची किंमत प्रत्येकासाठी वेगळी असली, तरी ती सगळ्यांसाठी महत्वाचीच असते. नापास झालेला मुलासाठी एक वर्ष खूप मौल्यवान आहे; १ महिना आजारी असणारी व्यक्तीसाठी तो निष्क्रिय एक महिना खूप महत्वाचा असतो; एका मिनिटाने बस,ट्रेन किंवा फ्लाईट चुकलेल्या व्यक्तीसाठी तो मिनिट फार महत्वाचा असतो, आणि एका सेकंदाच्या फरकाने अपघातात जीव वाचलेल्या व्यक्तीसाठी तो एक क्षण खूप महत्वाचा असतो.

आपला गैसमज

आपल्याला नेहमीच असं वाटतं कि दुसरी लोकं माझा वेळ वाया घालवत आहेत, पण एकदा विचार करून बघा, खरंच असं आहे का? कि आपणच त्यांना तसं करण्याची परवानगी दिलेली असते म्हणून आपला वेळ वाया जातो.

खर सांगायचं तर आपण स्वतः ह्या बाबतीत २ प्रकारे स्वतःशी संवाद साधत असतो. एक मन आपल्याला काम करण्याला सांगत असतं, प्रगती करायला सांगत असतं, तर दुसरं त्या कामापासून लांब जाण्याची कारण शोधत असतं. एक तुमची वाढ ठरवणार, आणि दुसरं तुम्हाला मागे पकडून धरणारं. तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्या २ मनांच्या भांडणात कोण जिंकणार हे ठरवायचं असतं. ह्यातलं कोणतं मन जिंकतं माहितीय का तुम्हाला? ‘आपण ज्याचं ऐकतो ते मन!’ ज्याला आपण पोषक वातावरण तयार करतो. ज्याला आपण खाद्य टाकत राहतो.

आपल्या अशाच निर्णयांवर आपली प्रगती, आपलं आयुष्य घडत असतं. वेळ न दिल्याने तुटलेली नाती तुम्ही पाहिली असतीलच. व्यक्ती लांब गेल्यानंतर त्यांचं महत्व तुम्हाला पटलं असेलच. अनेक अपयशांनंतर आयुष्यभर तुम्हाला वेगवेगळे धडे शिकायला मिळतील, वेळेचं महत्व कळेल आणि वेळेमुळे आयुष्याचं!

शेक्सपियर बोलल्याप्रमाणे, ‘ज्यांना वेळ हवा आहे, त्यांच्यासाठी वेळेचा काटा हळू हळू सरकत राहतो; घाबरलेल्यांसाठी जोरात पळायला लागतो, दुःखात असाल तर बराच वेळ तिथेच थांबतो, मजा करणाऱ्यांसाठी पटकन सरून जातो. आणि प्रेम करणाऱ्यांसाठी अनंत काळ टिकून राहतो.’

म्हणून म्हणतोय वेळेला जपून वापरा.

तुम्ही तुमची वेळ कशी जपून वापरता हे आम्हाला खाली कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा.

आता खाली कमेंट करणच तुम्हाला ‘वेस्ट ऑफ टाईम’ वाटतोय तर.. हे आर्टिकल मित्रांना शेयर करण्याइतका वेळ तरी नक्कीच असेल यार तुमच्याकडे!

Related Posts

Leave a Reply