चला हिमाचलला – ‘सर पास’

तेजेश (माझा मित्र) बोलत होता, ‘अरे यश… आपण हिमालयात चाललोय, ट्रेकिंगला, तिथे या गिटारच काय काम! उगाच ओझं होईल तुला, नको घेउस तू गिटार’.

‘अरे तिथे नाही नेणार तर कुठे नेणार! मला लाइव म्युसिक आवडतं.. रेकॉर्डेड नाही.. imagine… आपण मस्त बर्फाच्छादित डोंगरांवर आहोत आणि तुमच्यासाठी मी गाणी वाजवतोय.. आ हाहा.. कोण तरी सुरेल गळा असलेली (सुंदर) मुलगी मला सूर देतीय’ मी म्हणालो.

तेजेश, मोठ्ठी स्माईल देत, ‘मित्रा.. घे घे.. तू गिटार घे..! पण जास्त वर घेऊन जाता येणार नाही ती.. वरती सामान नेताना वजनाचं लिमिट आहे.. तुला कदाचित बेस कॅम्पलाच ठेवावी लागेल ती..’

बेस कॅम्प आणि डेली रुटीन


(Pic – नगारु कॅम्पला कविता ऐकताना ग्रुप मेम्बर्स)

झालं, एका तिकिटावर मी आणि माझी गर्ल-फ्रेंड (गिटार) हिमालय ट्रेकसाठी निघालो. थंडी खूप होती हे वेगळं सांगायची गरज नाही, पण जसं जसं आम्ही वर जात होतो तसं तसं कालची थंडी कमी होती असं वाटत होतं. तरी बरं, ट्रेकचा अवघड पार्ट सुरु होण्याआधी २ दिवस ट्रेकर्स हिमालयातल्या वातावरणाला युस्ड टू होण्यासाठी कसोल बेस कॅम्पलाच मोर्निंग एक्सरसाईज, rappling, rock climbing, कॅम्प फायर असे फुल ऑन धमाल प्रोग्राम अरेंज केले होते.

आम्हाला बेस कॅम्पच्या थंडीत स्वतःची भांडी धुणं तर लांबच, हात धुवायला पण भीती वाटत होती, इतकी थंडी! पण ट्रेक करायचं म्हंटलं कि हे सगळं कराव लागतच, अहो हीच तर ट्रेकची खरी मजा आहे, कधी न केलेल्या, कधी न अनुभवलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे करता. मग ५-७ किलोची bag पाठीवर घेऊन दररोज ८ ते १२ किलोमीटर चालण असो, किंवा अगदी सकाळी ५.३० ला सुर्यासोबत उठून रात्री सूर्यास्ताआधी झोपण असो, काही दिवसांनी तर हे अंगवळनीच पडलं होतं आमच्या. तसं करण भागच होतं म्हणा. विजेची सोय नसायची, मग सूर्यप्रकाश आहे तोवरच जेवण करून घ्याव लागायचं. एक दोनदा तर आम्ही वातावरण बिघडतंय म्हणून संध्याकाळी ६.३० लाच जेवून बसलेलो.

मी तर ट्रेक करून घरी आल्यावर पण लवकर उठून बसायचो किती तरी दिवस. १२-१३ दिवस टेंट मध्ये झोपायची सवय लागलेली, मग इथल्या सिमेंटच्या भिंती नकोशा वाटायच्या. पण खरच, तंबू मध्ये झोपनच मस्त वाटत होतं. एकदम मुक्त, बेफिकीर! मोबाईल चार्ज करायची घाई नसायची, कोणाचा फोन नाही कि कसली मिटिंग नाही. फक्त तुम्ही, निसर्ग आणि ती थंड शांतात. काय बर वाटायचं सांगतो सकाळचे ‘नैसर्गिक कार्यक्रम’ त्या निळ्या आकाशाखाली बर्फाळ डोंगरांमध्ये आटोपयला! आम्ही तर १० दिवस अंघोळ सुद्धा केली नव्हती. तिथलं वातावरण इतकं प्रसन्न कि त्याची कधी गरज सुद्धा वाटली नाही!

मिले सूर मेरा तुम्हारा

yashwant-didwaghमी माझ्या कविता आणि गिटार वाजवून पहिल्या दोन्ही रात्री गाजवल्या होत्याच. जरी त्या ६०-६२ जणांच्या ग्रुप मध्ये साउथ-नॉर्थ इंडियाची मराठी-अमराठी सगळी मिक्स लोकं होती तरी म्युसिकच्या सोबतीमुळे मराठी नसलेल्या ग्रुप मेम्बर्सना पण त्या कविता आवडल्या.

श्रोत्यांमध्ये सगळ्या भाषांची लोकं आजूबाजूला बघून मला ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाण्याची आठवण झाली. पुढे २-३ दिवसांनी तर साउथच्या एका मुलाने (जो नंतर माझा चांगला मित्र झाला- किरणने) दिलेल्या प्रतिक्रियेवर मी फारच खुश झालो, त्याने सुरुवातीला मला एक–दोन न समजलेल्या ओळींचा अर्थ विचारला आणि त्याच्या क्युट साउथ-इंडियन टोनमध्ये म्हणाला, ‘यशवंथ.. अरलीयर आय युस्ड टू हेट मराटी… बट आफ्टर लिसनिंग टू यु… ब्रो.. आयी थिंक.. आयी शुड लर्न मराटी! रिअली…’. त्याची हि प्रतिक्रिया म्हणजे मला जग जिंकवून देणारी होती. तेव्हा माझा मी मराठी असल्याचा अभिमान दुणावला!

ट्रेक रूट

ट्रेकचा रूट आमचा हा असा होता. कसोल बेस कॅम्प(७,७०० फुट) – ग्रहण गाव – पदरी(९,३०० फुट) – मिन्थाच(११,२०० फुट) – नगारु(१२,५००) – सर पास(१३,८००) – बिस्करी(११,००० फुट) – बंधक थाच(८,००० फुट) – कसोल बेस कॅम्प. I know, I know तुम्हाला ह्या नावांमधलं काहीच कळलं नसेल (मला पण नव्हतं समजलं सुरुवातीला) १३,८०० फुटावर असलेल्या ‘सर पास’ पास पर्यंत पोहचण्याच्या ह्या वेल प्लांड स्टेप्स होत्या. आम्ही दररोज ८००-१५०० फूट अंतर वर चढायचो. टप्याटप्याने जाण्याचं मुख्य कारण म्हणजे उंचावर ऑक्सिजन कमी असतो, मग अचानक जर का आपण ३-४ हजार फुट वर गेलो तर आपल्या श्वसन संस्थेवर ताण येण्याची शक्यता असते.

बर्फावरून घसरताना!

आम्ही नगारु कॅम्पवरून रात्री ३ ला उठून, ४ च्या दरम्यान निघलो. हा आमचा सगळ्यात मोठा पल्ला असणार होता, तब्बल १२ तासाचा! सकाळी लवकर उठण्याच कारण हेच कि दुपारी उन वाढायला लागलं कि बर्फ वितळतो आणि ट्रेकिंग अवघड होऊन बसते. कधी कधी जराशी चूक जीवावर सुद्धा बेतू शकते.

फायनली ३-४ तासांनी तुम्ही सरपासला म्हणजे १३,८०० फुट उंचीवर पोहचता. ‘सर’ म्हणजे तळे (Lake). तिथे एक गोठलेलं तळं आहे, म्हणून त्याला सरपास म्हणतात.

Just imagine… तुमचा गाईड तुम्हाला तिथून जवळ जवळ अर्धा-एक किलोमीटर खोल खाली डोंगराच्या बाजूला बर्फावरून घसरत जायला सांगतो! कल्पना केलीत? अहो आम्ही सगळ्यांनी तर हे प्रत्यक्षात अनुभवलंय!

खालच्या टोकाला पोहचलेला माणूस काळा कि गोरा कळत नाही इतक्या लांब पोहचतो आणि लांब खाली उभा राहून तो उत्साहात आरडा ओरडा करताना तुम्हाला ऐकायला येतं (हो तिथे इतकी शांतात असते कि इतक्या लांबून सुद्धा ऐकू येतं!). तुम्ही मनातल्या मनात बोलता, यार हाच माणूस इथून सुरु करण्याआधी, ‘नको.. मला नको.. भीती वाटतेय’, करत रडकुंडीला आलेला. आणि आता तिथे पोहचल्यावर युद्ध जिंकल्याची ख़ुशी मनवतोय! ती घसरण इतकी वेगवान असते कि रस्त्यात कोणाची बॉटल पडते कोणाचा रेनकोट पडतो. हि असली कसली घसरगुंडी आहे ह्या विचारात तुम्ही पण त्या बर्फावर तुमच्या ७ किलो सामानासकट विराजमान होता.. १..२..३… आSss…! तीच किंकाळी ऐकू येते.. पण आता… तुमच्या घशातून!

काही सेकंदातच तुम्ही जवळ जवळ एक किलोमीटर अंतर पार केलेलं असतं. एव्हाना तुम्हाला पृष्ठभाग आहे कि नाही हे सुद्धा तुम्ही विसरून गेलेला असता. मागच्या काही सेकंदात तो पृष्ठभाग बर्फावर २०-३० कि.मी. ताशी वेगाने घासल्यामुळे तुमच्या मागच्या भागची चेतासंस्था काही मिनिटे निकामी असते! कल्पना केलीत? आहे कि नाही आगळा वेगळा अनुभव!

चालता चालता मिळालेली शिकवण


अशा ट्रेकला जायचं म्हणजे तुमचा ह्या निसर्गावर विश्वास असायला हवा, त्याआधी तुम्ही हे करू शकाल हा स्वतःवर विश्वास हवा. तुम्ही इथे एकदा आलात, कि इथल्या झाडांशी बोलायला शिकाल, त्यांची काळजी घ्यायला शिकाल. तुम्हाला हि झाडं सुद्धा आपली काळजी घेतात याची जाणीव होईल. तुम्ही हळू हळू प्रेमात पडाल.. निसर्गाच्या!

मैलोनमैल एकत्र चालून झालं कि तुम्हाला ‘माणूश्यप्राणी ग्रुपने का राहतो!’ हे समजायला लागेल. कारण इथे आपल्या जवळ इतर कोणतही मदतीचं साधन नसतं, आपल्यासोबतची माणसं आणि आपल्या पाठीवरची bag यावरूनच सगळ जग बघायचं असतं. मग नावडती लोकं पण आपोआप आवडू लागतात. (आणि कुणास ठाऊक पुढे जाऊन जीवाभावाचे मित्र सुद्धा होतील ते.) आणि अशा परिस्थिती एकमेकांना मदत करण, इतर कृत्रिम गोष्टींवर अवलंबून न राहण आपोआप शिकतो आपण.. ते ही तिथे चालता चालता!

सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ट्रेक करताना छोट्या-छोट्या आधाराच्या वेळी आपण दुसऱ्यावर कमीत कमी अवलंबून राहावं आणि दुसऱ्याला जास्तीत जास्त मदत करावी. ट्रेकच्या पहिल्या दिवसापासून मला मदत करणारे माझे ३-४ नवीन मित्र मला भेटले, ह्या लोकांशिवाय कदाचित हा प्रवास इतका सुखद झाला नसता. दिल्लीचे सीम आणि लुईस, मुंबईचा प्रसाद दादा आणि साउथचा भार्गव.. आता नेक्स्ट ट्रेकला जाईपर्यंत हिमालयासोबत मला त्यांची सुद्धा तितकीच आठवण येईल! Miss you guys!!

रोधो जूस (आणि ओमलेट/maggi सुद्धा! हिमालयात!!)

हे माझ्यासाठी काय तरी नवीनच होतं. रोधो नावाचं लाल रंगाचं हिमालयात एक फुल असतं, आमचा गाईड म्हणाला, जसं माळरानावर आपल्याकडे गवत उगवतं तसं हे फुल इथे सर्रास पाहायला मिळतं. याची उंची साधारण १ मीटर असते. ह्या फुलाचा जूस तुम्हाला कदाचित रस्त्यावर विकत देखील मिळेल. इथले गावकरी आपल्यासारख्या पाहुण्याची एनर्जी रिचार्ज करायला असे जूस, ओमलेट maggi घेऊन विकायला बसलेले असतातच जागो जागी. बाकी पिण्याच्या पाण्याचं तर इथे अजिबात टेन्शन नाहीय, दिसली नदी कि भरली बॉटल. इथलं पाणी तर इतकं निर्मळ सांगतो तुम्हाला..! बाकी काही नाही तर हिमालायामधलं पाणी प्यायला तरी नक्की यावं मी म्हणतो. एकदम स्वच्छ! (टीप: तरी इतर नैसर्गिक कचरा वेगळा करण्यासाठी साधा कापडी फिल्टर सोबत ठेवलेला उत्तम.)

गाईड म्हणत होता कि रोधोच्या फुलाच लोणचं सुद्धा भारी लागतं, मला टेस्ट करायला मिळालं नाही, पण पुढल्या ट्रेकला जाईन तेव्हा नक्की ट्राय करीन. तोवर हिमालयातल्या आठवणी आणि फोटो ह्या मुंबईच्या गरम वातावरणात थंड राहायला मदत करतीलच मला!

आयुष्यात एकदा तरी करावाच असा हा हिमालयन ट्रेक होता.. आणि मला माहितीय तुम्ही एकदा गेला कि त्याच्या पुढल्या वर्षी पण नक्की जाल, मग ‘वेळ नाही मिळत रे!’, ‘सुट्ट्या कोणाकडे आहेत!’ ‘पैशाची चणचण आहे मित्रा!’ हि अशी शुल्लक कारण (हो माझ्यासाठी ती शुल्लकच आहेत) तुम्ही देणार नाही. ‘थोडा अजून वेळ जाऊ दे, थोडा सेटल होतो आणि पुढल्या वर्षी पक्का..’ हे असं बोलणाऱ्यांच पुढलं वर्ष कधी येत नाही आणि त्यांना फ्रीज सोडला तर दुसरा बर्फ कधीच मिळत नाही. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला फ्रीज मधलाच बर्फ खायचाय कि…

जायचं पक्क ठरलाय का?

हिमालयात जाण्याचं मनात पक्क केलंच असेल तर अजून एक महत्वाची टीप, प्लान ६ महिने आधीच फिक्स करा अगदी तारखांसकट कारण तिथे जाणारे ट्रेकिंग ग्रुप्स ५-६ महिने आधीच फुल्ल होऊन जातात.

Related Posts