ranmitra dr prakash amte Marathi Pustak Olakh

रानमित्र – माणसाला प्राण्यांची खरी ओळख करून देणारा

हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पासोबतच तेथील वन्य प्राण्यांच्या अनाथालयाबद्दल किंवा प्रकाश आमटेंच्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या ‘प्राण्यांच्या गोकुळा’बद्दल सर्वांनाच फार कुतूहल वाटतं.

अस्वल, वाघ, सिंह, बिबटे, साप अशा प्राण्यांसोबत खेळीमेळीने कसं कोण राहू शकत, भीती नाही वाटत का असे बरेच प्रश्न या वातावरणापासून दूर असणाऱ्यांना पडणं साहजिक आहे.

प्रकाश आमटे सर ‘रानमित्र’ या पुस्तकात सांगतात की, ‘शहरात माणसांचा प्राण्यांशी संबंध येतो तो कुत्र्या-मांजरापुरता किंवा फार फार तर पिंजर्‍यातल्या पक्ष्यांपुरता. ग्रामीण भागात लळा लागतो तो गाई-म्हशी-बैल आणि शेळ्यांचा. पण आमच्या या अनाथालयात खार, माकडापासून अगदी अस्वल आणि बिबट्यापर्यंत सगळे प्राणी येत गेले. अतिशय मजेत राहिले. ते आमच्याकडून काय शिकले माहिती नाही, आम्ही मात्र त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला तसा आम्हीही त्यांच्यावर टाकला आणि दोघांनीही या विश्वासाला आजतागायत तडा जाऊ दिलेला नाही.’

सरांनी किती सुंदर शब्दात मांडलय प्राणी आणि मनुष्यातलं नातं. खरंच आहे ना! आपण एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना त्रास न देता राहिलो तर या निसर्गाचा समतोल राखणं किती सोप्प होईल आणि सर्वांनाच त्याचा उपभोग घेता येईल.

“प्राणी कधी माणसांसारखे स्वतःच्या फायद्यासाठी मनुष्यावर हल्ला करत नाहीत. त्यांचा हल्ला हा बहुधा स्वसरंक्षणासाठीच असतो आणि आपण जर त्यांना काही हानी पोहोचवणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं की ते त्रास देत नाहीत.”

हा मुद्दा रानवाटा पुस्तकात सरांनी विविध उदाहरणं देत समजावून सांगितला आहे.

एकदा सर त्यांच्या एका मित्रासोबत प्रकल्पाजवळील नदीवर गेले आणि पाणी कमी होतं म्हणून पोहत नदी पार करून पलीकडच्या काठावर पोहचले. तिथे एक टेकडी चढताना अचानक एक अस्वल त्यांच्यासमोर आलं. तोपर्यंत प्रकल्पाच्या अनाथालयात अस्वलाची एन्ट्री झाली नव्हती. सरांनी फक्त अस्वलाने हल्ला करून कवटी फोडलेल्या, चेहरा विद्रुप केलेल्या लोकांवर उपचार केला होता. अस्वल दिसल्यावर काय करावं हे त्यांना सुचलंच नाही म्हणून ते तसेच उभे राहिले कारण पळाले असते तरी अस्वलाने सहज पकडले असते. हे काही हालचाल करत नाही बघून अस्वल पण निघून गेले. मग सर आणि त्यांचा मित्र गप्पा मारत तिथेच बसले. त्यांना कळालं नाही, की ते बसलेले त्या शिळेखाली अस्वलाची गुहा होती. यांच्या बडबडीमुळे कदाचित त्या अस्वलाच्या विश्रांतीत व्यत्यय आला म्हणून ते पुन्हा आरडाओरडा करत या दोघांकडे वेगात धावत यायला लागलं. सर सांगतात मूर्तीमंत भीती म्हणजे काय, हे आम्हाला त्यावेळी कळले पण कुठल्यातरी प्रेरणेने ते देखील जोरजोरात ओरडायला लागले. हा वेगळा प्रकार पाहून ते अस्वलही भांबावलं आणि तेवढ्याच वेगात दुसऱ्या दिशेने गेलं.

खरंतर त्यावेळी सर आणि त्यांचा मित्र जंगलात खूप आत होते. अशावेळी काही झालं असतं तर कुणालाच समजलं नसतं पण तरीही या अनुभवानंतरही ‘प्रकल्पावर अस्वल नको’ अशी काही त्यांची भूमिका झाली नाही. प्राणी माणसांना विनाकारण इजा करत नाहीत यावर त्यांचा खरोखरच गाढ विश्‍वास होता आणि तो अस्वलांच्या बाबतीत त्यांच्या प्राण्यांच्या अनाथालयातील ‘राणी’ या अस्वलाने सार्थ करून दाखवला. सरांचे सहकारी आणि ‘नेगल’ या पुस्तकाचे लेखक विलास मनोहर यांच्याबाबत तर ही राणी फार पजेसिव्ह होती. या दोघांसोबत ती  फेरफटका मारायलाही जायची.

याच राणी अस्वलाचे किस्से वाचताना तर डोळ्यांत पाणी येतं. तिला गाड्यांची फार भीती वाटायची. एखादा ट्रक किंवा जीप आली तर ती झाडामागे लपायची. एकदा राणी, सर आणि विलास मनोहर फिरून परत येत असताना, एक जीप जवळ आली. त्या जीपच्या आवाजाने राणी झाडामागे लपून बसली. त्या जीपमधली लोकं सहकुटुंब जंगलात फिरायला आलेली. त्यांना राणी दिसली नाही म्हणून ते बिनधास्त खाली उतरले आणि सरांना प्रकल्पापर्यंत सोडण्याचा आग्रह करू लागले. आणि सर नको नको म्हणत असताना जवळपास ओढुनच त्यांना जीपमध्ये बसवले. या दोघांना जीप मधून जाताना बघून राणी घाबरली. तिला वाटलं, तिला सोडून चाललेत म्हणून ती पण जीपमागे धावायला लागली. आणि जीपच्या मागे अस्वल धावत येताना बघून त्यातल्या माणसांनी जीप थांबवली आणि त्यांच्या लहान मुलांना जीपमध्ये तसंच सोडून चक्क ती मोठी माणसं लांब पळून गेली. नंतर राणी काही करत नाही पाहून ती माणसं परत आली आणि प्रकाश सरांनाच सावध राहायचा सल्ला देऊ लागली.

सर लिहितात, “स्वतःच्या लहान मुलांना अस्वलाच्या पुढ्यात सोडून जाणाऱ्या या माणसांचा हा सल्ला ऐकून हसावं की रडावं कळेना.”

ते पुढे विचारतात, ‘या प्राण्यांनाही माणसं लबाड, स्वार्थी आणि क्रूर वाटत असणार. पण सगळीच माणसं तशी नसतात ना, मग हाच नियम आपण प्राण्यांना का लावत नाही? लांडगा म्हंटलं की लबाड, वाघ म्हंटला की क्रूर अशी विधानं का करतो?

कदाचित माणसांचं प्राण्यांविषयी अज्ञान, निसर्गापासून दूर जाणं आणि स्वार्थाने सगळं ओरबाडण्याची वृत्ती याला कारणीभूत असावी.

पुस्तकात या अनाथालयातील प्राण्यांचे, त्या प्राण्यांच्या प्रकल्पात दाखल होतानाचे, प्रकल्पात, माणसांत रमण्याचे, खेळण्याचे, खाण्याचे, स्वभावाचे, तिथल्या आदिवासींचे आणि लोकबिरादरी प्रकल्पात काम करताना घडलेले किस्से इतक्या रंजक पद्धतीने लिहिले आहेत, की वाचताना चित्र डोळ्यांसमोर उभे राहते, आपण त्या विश्वात गुंतून जातो आणि या प्रकल्पाला एकदातरी भेट देता यावी असे सारखे वाटत राहते. पुस्तकात मध्ये मध्ये दिलेले फोटो देखील सुंदर आहेत.

प्राण्यांचे मजेशीर, हृदस्पर्शी किस्से सांगतानाच प्राण्यांच्या अधिवासाबद्दल, सवयींबद्दल, विविध जातींबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल तसेच दुर्मिळ किंवा नष्ट होत असलेल्या प्राण्यांच्या जातींबद्दल, वेगवेगळ्या हरणांबद्दल, शेकरू, रॅटल असे फार माहितीत नसलेले प्राणी तसेच सापाला कसे पकडतात, प्राण्यांना कसे हाताळायचे, प्राणी हल्ला का व कधी करू शकतात, या हल्ल्यांपासून सावध कसे राहायचे याबद्दलही इंत्यभूत माहिती यात वाचायला मिळेल.

खरंतर या अनाथालयाची सुरुवात ठरवून नाही झाली. सर आणि मंदाताईंना एकदा काही आदिवासी दोन मेलेल्या माकडांना काठीला बांधून नेत असताना दिसले. त्यातील एका माकडणीच्या पोटाला एक छोटेसे जिवंत पिल्लू चिकटले होते. त्या पिल्लाला पाहून त्यांना वाईट वाटले म्हणून त्यांनी त्याला आदिवासींकडून धान्याच्या बदल्यात विकत घेतले व प्रकल्पात आणले. तेथील आदिवासी शेतीबद्दल अनभिज्ञ असल्याने शिकार करत. पण शिकार केलेल्या प्राण्यांच्या पिल्लांना ते त्यानंतर प्रकल्पात आणून सोडायला लागले आणि प्रकल्पातील प्राण्यांच्या अनाथालयाने आकार घेतला.

लोकं सरांना विचारतात की, सापांची किंवा बिबट्याच्या क्रूरपणाची भीती नाही वाटली का? तुम्ही लहान मुलांना त्यांच्यासोबत खेळायला कसे देता?

त्यावर सर उत्तर देतात की,’खरंच नाही वाटली भीती कारण हे प्राणी आमच्याकडे आले तेव्हा ते लहान होते. त्यांना आईच्या मायेची, आधाराची गरज होती आणि आम्ही त्यांना आपल्या मुलासारखं वाढवलं. ते देखील आपल्या मुलांसारखे दंगामस्ती करायचे, जबड्यात हात धरायचे, अंगावर उड्या मारायचे. ही त्यांची पद्धत होती आणि आम्ही त्याकडे घरातलं मूल दंगा करतं तसं पाहत होतो. आम्हालाही त्यांना खायला काय द्यायचे, कसे द्यायच, त्यांचे आजार, उपचार याबद्दल काहीच माहिती नव्हती पण त्यांच्या सहवासातूनच शिकत गेलो आणि जसं आपलं मूल आपल्याचं नजरेसमोर मोठं झालेलं असत त्यामुळे ते काय करेल, काय नाही करेल याबद्दल आपल्याला खात्री असते, तशीच आम्हाला या प्राण्यांबद्दल असायची.

सरकारची प्राण्यांच्या या अनाथालयाकडे पाहण्याची जी असहिष्णू दृष्टी आहे त्याबद्दल बोललं पाहिजे असं वाटल्याने आणि त्यांच्या या मुक्या मित्रांबद्दलचे लोकांमधले गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक प्रकाश आमटे सरांनी लिहिलं.

हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम निर्माण होईलच, याची खात्री मी देत नाही परंतु प्राण्यांबद्दलचे बरेच गैरसमज नक्कीच कमी होतील. आणि तेवढं झालं तरी खूप आहे. धन्यवाद.

पुस्तकाची लिंक सोबत देत आहे.

डॉ. प्रकाश आमटे सरांची अजून माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील पुस्तकं वाचू शकता आणि या प्रकल्पातील प्राण्यांविषयी खाली दिलेल्या व्हिडियोमधून अधिक माहिती घेऊ शकता.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *