स्वप्नांचा पाठलाग

गिटार जेव्हा पहिल्यांदा हातात घेतली तेव्हा विचार सुद्धा केला नव्हता कि माझ्या आयुष्यातला पहिला व्यावसायिक कार्यक्रम हा सगळ्या प्रकारच्या मिक्स म्यूजिक असलेला असेल. इतका वेगळा कि त्यात जुन्या-नवीन, हिंदी-मराठी, कव्वाली पासून लावणी पर्यंत सगळ्या प्रकारची गाणी असतील. मी कायम ‘येथे कविता लिहून मिळतील’ च्या कार्यक्रमाच्या स्वप्नातच गर्क असायचो. एक गिटारिस्ट म्हणून मी अशा कार्यक्रमांमध्ये हि काहीतरी करू शकतो याची मला कल्पना सुद्धा नव्हती.

‘मुग्धसंगीत’ मी काम केलेला पहिला व्यावसायिक प्रयोग, हा तयार करण्यामागे संचित आणि गोडबोले काकांचे प्रयत्न बरेच दिवस आधी पासून सुरु होते. काकांनी तर खिशातले लाखो रुपये टाकून ह्या कार्यक्रमाला आणि आमच्या २०-२५ कलाकारांच्या टीमला उभा केलं. संचित सोबत जयंत दादाचाही त्यात तितकाच हातभार होता. त्या ग्रुप मधला एकमेव तंतू वादक या ओळखीला खरा उतरून मन लाऊन सराव केला आणि अखेरीस ज्या दिवसाची वाट पहिली तो दिवस उजाडलाच.

२ जुलै २०१६, पूर्ण मुंबई २-३ दिवस लगातार पडणाऱ्या पावसाने चिंब झाली होती. कित्तेक लोकं तर ट्रेन बंद असेल असा स्वतःच्या मनाशीच विचार करून घरी बसली. पण मला तर कसंही करून गिटार सोबत ‘यशवंत नाट्यमंदिर’ ला पोहोचायचं होतंच.

योगायोग तर बघा माझा पहिला व्यावसायीक कार्यक्रम आणि तो हि माझ्याच नावाच्या सभागृहात जिथे बऱ्याच दिग्गज कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली आहे.”

खरंच देवाचे आणि मित्ररुपी देवांचे आभार मानावे तितके कमीच!

mugdh-sangeet

तुम्ही व्यावसायिक पातळीवर एखादी गोष्ट करता तेव्हा त्याचा अभिमान मनात असतो तो वेगळाच. पण मी या आधी दोन वेगवेगळ्या व्यावसायिक पातळ्यांवर काम करून झालो होतो. पहिली म्हणजे ‘Software Engineer’ म्हणून आणि मग एका so called ‘वकील साहेबा’च्या  भूमिकेतून. पण एक कलाकार म्हणून स्टेजवर उतरण माझ्यासाठी मोठं स्वप्न होतं. आता जसजसा मोठा होत जाईन तसं ह्या स्वप्नांचा गुणाकार होण तर सहाजिकच आहे. ह्या सफरीत पाहिलेलं एक एक स्वप्न आणि त्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा माझ्यातला लेखक तुम्हाला इथे कळवत राहीलच कि!

तो पर्यंत… वेळेवर झोपा, मस्त स्वप्न बघा, आणि मग ती स्वप्न अशा जवळच्या व्यक्तीला सांगा जो तुम्हाला त्या स्वप्नाची वारंवार आठवण करून देईल. मी पण तेच केलं 🙂  . म्हणून तर मी म्हंटलं ‘देवाचे आणि मित्ररुपी देवांचे आभार मानावे तितके कमीच!’ कारण माझी स्वप्न मी त्यांना सांगितली. आणि म्हणून ती कायम लक्षात राहिली.

देव आणि मित्र कायम तुमच्या सोबत राहो!

खूप खूप स्वप्न बघा आणि यशवंत व्हा!!

swapnancha-pathlaag

Related Posts