मुंबई हायकोर्ट

‘मुंबई, एक माया नागरी आहे’. हे वाक्य आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. मी ते प्रत्यक्ष अनुभवलं आणि माझी वकिली सोडून पूर्णपणे लिखाणात घुसण्याचा निर्णय घेतला. हो, हीच आहे मुंबईची ‘माया’. हिला ‘मायावी मुंबई’ म्हणा किंवा ‘मायाळू मुंबई’, जो जसा बघेल त्याला ती तशी दिसेल. मुंबईसाठी स्पेशिअली लिहिलेल्या ह्या लेखांमध्ये मी तुम्हाला मुंबईच्या अशाच काही गिन्या-चुन्या जादुई वास्तूंबद्धल सांगणार आहे, ज्यांची जादू त्या वास्तूच्या डोळ्यात डोळे टाकून बघेल त्यालाच कळते. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या मुंबई सफरी मधला थोडासा वेळ काढून इथे फिरकाव, हाच एक यामागचा उद्देश.

 

बांधणी:

१४ ऑगस्ट १८६२ साली याच्या बांधकामाला सुरुवात झाली. मुंबई हायकोर्टची इमारत बांधताना काळ्या दगडाचा जास्तीत जास्त उपयोग केला गेला आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण पश्चिम भारतातील हे सर्वात जुनं आणि मोठं कोर्ट आहे. Colonel J.A.Fuller यांनी हि इमारत उभी करत असताना इंग्लिश-गॉथिक संरचनेचा वापर केला. संपूर्ण इमारतीच्या बांधकामात १६,४४,५२८ रुपये इतका खर्च आला, जो कि मंजूर झालेल्या पैशांपेक्षा ३००० रुपयांनी कमी होता. आता कळाल तेव्हा बांधलेल्या इमारती इतक्या मजबूत आणि टिकाऊ का आहेत. ह्या इमारतींचा पायाच मुळात इमानदारीने घातला गेला. इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले नसते तर आपण ह्या अशा वास्तूंना मुकलो असतो.

मी हायकोर्टला पण वकिली केली आहे तशी, पण कधी न्यायाधीश मंडळी तिथून जाता येताना दिसली नाही. आधी नवीन नवीन वकिली करताना तर वाटायचं हे इथेच राहतात कि काय. पण मी इथल्या भुतिया कथा सुद्धा ऐकल्या होत्या, त्यामुळे इथे रोज रात्रभर थांबण मला तरी जमलं नसतं. फ्लोरा-फाऊनटन कडून हायकोर्टाकडे जाणारा रस्ता तुम्हाला नॉर्मल आम जनतेसाठी असणाऱ्या दरवाज्याकडे घेउन जाईल. आणि इथले न्यायाधीश इमारतीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या गेट ने प्रवेश करतात. हायकोर्टाचा न्यायाधीश म्हणजे नक्की साधी व्यक्ती नसते, मग गेट तरी साधं का ठेवा! तुम्हाला हा मागचा एरिया स्वताहून जाऊन बघायचा असेल तर एक तर न्यायाधीश तरी बना नाही तरी त्यांचे पोलीस बॉडीगार्ड !

 

भिंतीवरचे कोरलेले विलक्षण खोडकर प्राणी:

आता आमचा हा लेख वाचून तुम्ही हायकोर्टात गेलाच असाल तर तिथे तुम्हाला कोर्टाच्या काही कोपऱ्यामध्ये भिंतींवर कोरलेले कोल्हे लांडगे यांचे चेहेरे दिसतील. खरतर या प्राण्यांकडे फार कमी जणांचं लक्ष जातं. ह्या प्राण्यांना वकिलाचा किंवा न्यायाधीशाचा पेहेराव घातलेला दाखवण्यात आला आहे. त्यातली एक must see मूर्ती म्हणजे पाहिल्या माळ्यावरील माकड, जे न्यायाधीशाच्या गणवेशात हातात तराजू घेऊन बसलेलं दाखवलं आहे. हा तराजू एका बाजूला जास्त झुकलेला दाखवला आहे आणि शिवाय त्याच्या एका डोळ्यावर पट्टी आहे. आता याचा काय अर्थ घ्यायचा टे आपला आपणच ठरवायचं बाबा.

बाकी मला माझ्या सिनियर सरांकडून असं कळाल कि ह्या मागे सुद्धा एक जुनी कथा आहे. असं म्हंटल जातं कि एका भारतीय कंत्राटदाराचा आणि युरोपियन कंत्राटदाराचा न्यायालयात खटला चालू होता. ज्याचा निकाल त्याला पटेल असा लागला नाही. असं म्हंटल जातं कि ह्या मूर्ती त्या स्टोरीला इथे कायम लक्षात ठेवला जावं म्हणून मुद्दाम कोरण्यात आल्या.

मी वकिली २ वर्षातच थांबवली म्हणून, नाहीतर अजून खूप सारी माहिती मिळाली असती मुंबई हायकोर्टाची असं वाटत बऱ्याचदा. पण ठीक आहे ना.. दर वेळी मीच तुम्हाला माहिती द्यायची असं थोडीच आहे, कधी तुम्ही सुद्धा मला तुम्हाला माहित असलेल्या मुंबईच्या ओपन सिक्रेट जागांबद्धल कळवा. मी नक्की त्या इथे लिहिण्याचा प्रयत्न करीन. तुमची माहिती तुम्ही www.YashwantHo.com या संकेत स्थळावर पाठवू शकता.

Related Posts

Leave a Reply