फ्लोरा फाऊनटन आणि हुतात्मा चौक (Flora Fountain / Hutatma Chowk)

मी लहानपणापासून फ्लोरा फाऊनटन बघत आलोय, नेहमी प्रश्न पडायचा, हे नक्की बांधलय तरी कशाला इथे मध्येच! पण आता कळतं, कि ह्याची सुद्धा काहीतरी रहस्य असतील, कारणं असतील. चला, आज ह्या लेखातून ती थोडी explore करूया.

मी सलग १८ वर्षाच्या शिक्षणानंतर वकील झालो. फोर्टच्या सिटी सिविल कोर्टात वकिली चालू केली. पण ते करत असताना इथल्या इंग्रजी इमारती बघून बरेच प्रश्न माझ्या मनात यायचे. कोर्टात जाताना न्यायनिवाड्यात कमी आणि तिथल्या वास्तूंमध्येच मी जास्त रमायचो.

‘त्या ऐतिहासिक भिंती माझ्याशी बोलू पाहतायत कि काय असा भास ह्वायचा, आणि शेवटी तसेच झाले.’

वकिली करत असतानाच एका travel guide android app साठी ‘ऑडीयो स्क्रिप्ट्स’ लिहिण्याचा योग साधून आला, आणि फायनली मी त्या ऐतिहासिक जागांना जवळून अनुभवायला लागलो. ह्या लेखनासाठीच्या केलेल्या रिसर्च मधूनच मला हे मुंबईच असाधारण ऐतिहासिक रूप दिसलं.

फ्लोरा फाऊनटन आणि हुतात्मा चौक हे तर त्या असाधारण ऐतिहासिक मुंबईचे २ छोटेसे भाग आहेत.

फुलांचे कारंजे – फ्लोरा फाऊनटन:

‘Mid-night Cycle Ride’ मधला हा माझा सगळ्यात आवडता स्पॉट. इथली रात्रीची शांतता मी तिथल्या खुर्चीवर बसून बराच वेळ अनुभवली आहे. दिवसभर गाड्यांच्या गोंधळाने मानसिकरित्या थकलेलं फ्लोरा फाऊनटन तेव्हा आराम करत असतं J .

१८६४ला फ्लोरा फाऊनटनची स्थापना झाली. ‘फ्लोरा’ म्हणजे रोमन फुलांची देवी. पश्चिम भारतातील Agri-Horticultural society ने या शिल्पाची स्थापना केली. त्याकाळी ह्या शिल्पाच्या उभारणीत ४७,००० रुपये खर्च आला होता आणि त्यातले २० हजार कुर्शेतजी फार्दुनजी नावाच्या भल्या माणसाने दिले होते.

Just imagine, इथे सगळीकडे डांबरी रस्त्यांऐवजी मातीचे रस्ते आहेत, ज्यावरून गोंधळ करणारं ट्राफिक नसून फक्त घोडागाड्या आणि एखाद दुसरी साहेबांची गाडी जातीय. मस्त वाटतय ना! मी रात्री इथे बसतो तेव्हा त्याच काळात जाऊन बसतो .

चर्चगेट स्टेशनचं नाव ‘चर्च’गेट का ठेवलं?!

जुन्या फोर्ट एरियाला त्याकाळी ३ दरवाजे होते. फ्लोरा फाऊनटन आज जिथे उभा आहे, तिथे त्यामधलं एक गेट होतं, जे तिथून पुढे असलेल्या सेंट थोमस चर्चकडे जाण्याऱ्या वाटेवरचं प्रवेशद्वार होतं. आता आलं का लक्षात ह्या स्टेशनला सगळे चर्चगेट म्हणतात!?

हुतात्मा चौकाची स्टोरी तरी काय आहे?

हुतात्मा झाले ते कोण होते, प्राणांचं बलिदान देण्यामागचं नेमकं कारण काय हे बऱ्याच कमी लोकांना माहितीय.

 फ्लोरा फाऊनटन शेजारीच १९६० ला हुतात्मा चौकाची स्थापना करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा १०८ हुतात्म्यांची नावं देखील तुम्हाला वाचायला मिळतील. यात जवळ जवळ सर्व प्रकारच्या जाती-पंथा मधल्या लोकांचं समावेश होता.

जमावबंदीचा भंग करून, चवताळलेला मुंबईकर फ्लोरा फाऊनटनच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्याच वेळात विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला.

मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते.

प्रेक्षणीय फ्लोरा फाऊनटन च्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०८ हुतात्मे झाले, त्या मालिकेची हि सुरुवात होती.

चला निघायची वेळ झाली:

ह्या जागेने चळवळी पाहिल्या, मोर्चे पाहिले, रक्तांचे थारोळे पाहिलेत, पण त्याही पेक्षा भितीदायक काही असेल तर ते आहे, मुंबईकरांनी ह्या इतक्या जीवंत इतिहासाकडे दुर्लक्ष करण. वेळात वेळ काढून हे आर्टिकल तुम्ही वाचलत त्या बद्धल धन्यवाद.

दक्षिण मुंबईत बघण्यासारख आणखीन खूप आहे; छत्रपती शिवाजी टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी , मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ आणि राजाबाई टॉवर, ताज हॉटेल, गेट वे ऑफ इंडिया, नरीमन पोइंट, मरीनड्राईव्ह, खूप खूप आहे इथे फिरायला; अगदी धोबी घाट आणि चोर बाजार सुद्धा. आणि ह्या प्रत्येक जागेची खुफिया माहिती तुम्हाला इथे एक-एक करून द्यायचं काम, अर्थात माझंच आहे.

Related Posts