छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST)

आजकालची बिझी लोकं छत्रपती शिवाजी टर्मिनसला फक्त एक इमारत म्हणून बघत असतील, काही लोकं तर नीट बघत सुद्धा नसतील. त्यांचंच दुर्दैव म्हणा हवं तर त्याला! आज आपण जरा ह्याच वास्तूला वेगळ्या नजरेने बघूया.. तुम्हाला नक्कीच भरपूर काही दिसेल, जे मला दिसलं! अशी रहस्य जी सगळ्यांसाठी खुली होती, पण कोणी बघण्याची, जाणून घेण्याची तसदीच  देखील घेतली नाही.

छत्रपती शिवाजी टर्मिनस – इतिहास:

ह्या भव्य ब्रिटीश इमारतीचा इतिहास बऱ्याच कमी जणांना ठाऊक असेल कदाचित. १८५० च्या काळात ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कार्यरत होती, ज्याचं सुरूवातीचं स्टेशन होतं ‘बोरी बंदर’, ते इथेच. इस्ट इंडिया कंपनीने ह्या स्टेशनची पुनर्रचना केली, आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टीवन यांनी या स्टेशनला ‘विक्टोरिया टर्मिनस’ असं नाव दिलं. १८८७ ला राणी विक्टोरियाच्या हस्ते ह्या ऐतिहासिक स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. विक्टोरिया टर्मिनसच्या बांधणीला जवळ जवळ एक दशकाचा वेळ लागला (Seriously! :O ). त्या जमान्यातली सगळ्यात महागडी इमारत होती हि, किंमत २६०,००० स्टर्लिंग पाउंड (फक्त 😛 ) .

‘यार हे सगळं शक्य कसं झालं!!’

तेव्हा नव्याने सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे हे सगळं शक्य झालं. ह्या इमारतीच्या बांधणीत तुम्हाला मुघलकालीन शिप्लांची आठवण करून देणाऱ्या नक्षा दिसतील. राज्य सरकारकडून १९९६ला ह्या स्टेशनचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असे करण्यात आले. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे ब्रिटीश आणि भारतीय रचनाकौशल्याच्या तंतोतंत मिश्रणाचं एक उत्तम उदाहरण आहे. पण ह्या नक्षीकामाला बघण्यासाठी कोणी आवर्जून वेळच काढत नाही, हीच एक खंत वाटते. चला, आज ह्या इमारतीला जितक्या जवळून बघता येईल तितकं बघून घेऊ.

एका नजरेत सामावणार CST:

जरा लांबून उभं राहून ह्या इमारतीला लक्ष देऊन बघाल तर हळू हळू तुम्हाला मी बोलत होतो त्या जादूचा अनुभव यायला सुरुवात होईल. एक वेगळीच मोहिनी आहे ह्या वास्तू मध्ये. मी तर जवळ जवळ १५-२० मिनिटांपर्यंत ह्या टोलेजंग महालासारख्या इमारतीला बघत उभा राहू शकतो, बऱ्याचदा त्याआधी गर्दीच आपल्याला धक्का देऊन पुढे नेते तो भाग वेगळा 😉 😀 . तुम्हाला कदाचित माहित नसेल पण CST हे जगातल्या सर्वात सुंदर आणि गर्दी असलेल्या स्टेशन्स पैकी एक आहे. आजच्या तारखेला सुद्धा ह्या वास्तूचं सौंदर्य टिकून आहे हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे.

सातासमुद्रापलीकडले प्रवासी येतात आणि ह्या वास्तूचे दर्शन घेऊन जातात. कोणी त्यावर ब्लोग्स लिहीतं, तर कोणी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढून घेऊन जातं. परदेशी प्रवाशांपैकी बऱ्याच जणांची रोजीरोटी आहेत अशा ऐतिहासिक भारतीय इमारती, ज्यावर लिहून, फोटो काढून आज ते त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत. पण मुंबईतला सामान्य मुंबईकर… तो तर त्याच्या ९ ते ६ वाल्या नोकरीत वेळेवर जाण्यासाठी इतका बिजी झालाय कि ह्या जगाला वेड लावणाऱ्या, जगप्रसिद्ध सौंदर्याकडे बघायला त्याच्याकडे वेळच नाही.

‘म्हणूनच मी आज ठरवलं कि ह्यावर लिहिलं तर पाहिजेच, आणि ते सुद्धा मराठीत!’

इथूनच भारतातली पहिली पेसेंजर रेल सेवा सुरु करण्यात आली, जिचं उद्घाटन १८५३ ला झालं. हा ३४ किलोमीटर अंतराचा ठाण्यापर्यंतचा मार्ग होता. ‘द ग्रेट इंडिअन पेनिन्सुलर रेल्वे’ ने या सुरुवातीच्या स्टेशनचं नाव ‘बोरी बंदर’ असं ठेवलं. ‘बोरी’ म्हणजे कापसाच्या गोन्या, आणि ‘बंदर’ म्हणजे जहाजांच आगार. ह्या जागेला बोरी बंदर बोलायचे कारण कापूस उत्पादक आणि मोठे व्यापारी इथून कापसाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर करत असत. १८६०च्या दशकात झालेल्या अमेरिकन सिवील वॉर मध्ये पहिली आर्थिक उन्नतीची लाट भारतात आली तेव्हा मुंबई कापुसाच्या खरेदी विक्रीमध्ये अग्रेसर होती, ती ह्याच स्टेशन मुळे.

घुमट – जे कोणीच पाहिलं नसेल

सर्वात वरती, अगदी मधोमध असलेल्या घुमटाकडे फारंच कमी लोकांची नजर जाते. तुम्ही लांबून बघू शकता कि छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीला प्रमाणबद्ध रितीने समान अंतरावर असणाऱ्या कमानी, खिडक्यांनी एका भव्य इमारतीच्या स्वरुपात बांधण्यात आलं आहे, तत्कालीन भारतीय महालांची संरचना हि ह्याच प्रकारची होती.

‘आपल्या सर्वांना US ला असलेली ‘Statue of Liberty’ अगदी लहानपणापासून माहितीय, पण कोणाला ‘Statue of Progress’ बद्धल माहितीय का!?’. मी पक्का सांगू शकतो हे कोणालाच माहित नसणार!

१६ फूट ६ इंचाची ‘Statue of Progress’, ज्याचा शब्दशः अर्थ ‘प्रगतीचा पुतळा’ असा होतो. त्या काळी इंग्रज सरकारकडे असलेली दूरदृष्टी, आणि मुंबईला जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मास्तर-प्लान सुरुवात इथूनच झाली होती, ह्याचा हा पुरावा. ह्या प्रगतीपथावरच्या घडदौडीत तत्कालीन समाजानेही हातभार लावावा ह्या उद्देशाने ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. बाजूच्या घुमटांवर तुम्हाला अशाच अजूनही काही मूर्ती दिसतील, त्यांचं नाव आहे ‘The Statue of Agriculture’ (शेतीचा पुतळा), Statue of Shipping & Commerce (वाणिज्य पुतळा), Statue of Engineering & Science (विज्ञान पुतळा), हे इंग्रज सरकारच्या प्रगतीचे ३ अविभाज्य घटक.

आता जरा जवळून बघू!

दरवाजावरचे पहारेकरी – सिंह आणि वाघ :

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्य ऑफिस गेटवर असलेले सिंह आणि वाघ, अनुक्रमे ग्रेट ब्रिटन आणि भारत या दोन देशांचं प्रतिक आहेत. मुख्य इमारतीचं बांधकाम चुनखडक आणि रेतीच्या खडकापासून करण्यात आलं आहे, त्यासोबत इटालियन मार्बल एक परफेक्ट फिनिशिंग देतो.

तुम्ही जर का वाघ आणि सिंहाच्या बरोबर मधोमध उभे राहिलात, तर अगदी नजरेच्या समोर थोड्या उंचीवर (घड्याळाच्या खाली) एक रिकामी जागा दिसेल. दिसली!? असं म्हणतात कि इथे राणी विक्टोरियाचा पुतळा होता, जिच्या नावावरून हे स्टेशन बांधण्यात आलं. मग कुठे आहे तो पुतळा? नक्की तिथे काही होतं तरी का?

रहस्य – विक्टोरिया राणीच्या पुतळ्याचे –

असं म्हणतात कि या आधी काढलेल्या फोटोंमध्ये हा पुतळा होता. मला असा कोणताही फोटो अजून तरी नाही मिळाला. पण याचा अर्थ असा नाही होत कि तिथे कधी काही नव्हतंच. कारण त्या मोठ्या घड्यालाखाली असलेल्या रिकाम्या जागेत नक्कीच काहीतरी असणार हे नक्की. इतक्या बारीकीने बनवलेल्या वास्तूचा निर्माता अगदी मधोमध अशी रिकामी जागा सोडणं अशक्य आहे.

कोणी म्हणतं कि स्वतंत्र मिळाल्यानंतर हा पुतळा काढण्यात आला, तरी कोणी म्हणतं कि हा पुतळा लंडन मध्ये एका लिलावात विकण्यात आला. अर्थात, याचा काही पुरावा आज तागायत तरी माझ्या (माझ्या म्हणजे इतर लेखकांच्या 😛 ) हाती लागलेला नाहीय.

या नसणाऱ्या पुतळ्याकडे कुणाचं लक्ष जात नाही, याचं कारण म्हणजे, इथल्या भिंतींवर इतक्या सुरेख रीतीने नक्षीकाम करण्यात आलंय कि येणारा पर्यटक यातंच हरवून जातो. हिच ह्या वास्तूची जादू आहे, त्यात असणाऱ्या बारीक सारीक गोष्टी इतक्या आकर्षक आहेत कि जरी कालांतरामुळे ह्यात काही खराबी आली असली तरी त्याकडे साधारण डोळे फिरकत देखील नाहीत.

ह्या ‘C’ आकाराच्या इमारतीच्या भिंतींवरच्या फुलांनी सजवलेल्या नक्षांचा फोटो तुम्ही परवानगी घेऊन बिन्दास्त काढू शकता. या सोबतच तुम्हाला या भिंतींवर वेगवेगळे चेहेरे सुद्धा कोरलेले दिसतील. हे चेहेरे रेल्वेच्या ऐतिहासिक जडणघडणीसाठी कार्यरत असलेल्या तत्कालीन दिग्गज मंडळींच्या स्मरणार्थ कोरले गेले होते.

अक्राळ, विक्राळ, नक्षीदार – ‘गार्गोईल्स’:

CST ला आलात आणि ह्या ‘गार्गोइल्स’ला निरखून पाहिलं नाहीत तर काय पाहिलंत इथे येऊन! या रचनेची कोणी मन भरून स्तुती केली, तर बाकींनी तितकीच निंदा. कोणाला हे एका रानटी जनावरासारख वाटलं तर कोणाला कलेचा एक उत्तम अविष्कार. हि चीजच तशी आहे. ‘गार्गोइल्स’. याकडे बघून तुम्हाला समजणार पण नाही कि या भागाचा नक्की काय उपयोग आहे.

ओके, आता जास्त हवा बनवत नाही ह्याची, सांगून टाकतो. हे बाकी काही नसून पावसाच्या पाण्याचा निचरा हवावा म्हणून छतावरून बाहेर काढण्यात आलेल्या नळकांड्या आहेत. ज्या ह्या रहस्यमयी प्राण्यांच्या नक्षीने झाकण्यात आल्या आहेत. भिंतीवरून गरंगळत जाणारं पाणी कालांतराने भिंतीसाठी हानिकारक ठरू शकते. वाहत्या पाण्यामुळे भिंतीवर येणारं शेवाळ गार्गोइल्समुळे कमी होतं. हे नक्षीदार प्राणी CST चे रक्षक आहेत असेही मानले जाते.

एकदा आत जाऊन तर बघा:

CST इमारतीची एक बाजू सर्वांसाठी खुली आहे, तर दुसरी बाजू कार्यालय म्हणून वापरली जाते, म्हणजे वाघ- सिंहाच गेट असलेली बाजू. इथे आतमध्ये जायचं तर स्पेशल परवानगीची गरज असते. योगायोगाने जर का तुम्हाला आत जाण्याची संधी मिळाली तर तुम्हीला ह्या वास्तूची अजून थोडी रहस्ये अनुभवायला मिळतील.

तुम्ही आत शिरल्याशिरल्याच आजूबाजूच्या वातावरणात अचानक झालेला बदल तुम्हाला लगेच जाणवेल. आत गेल्यागेल्या सरळ वरती दिसणारा घुमट तुम्हाला तुम्ही वेगळ्याच जगात असल्याचा भास करवून देईल.

मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीय! सिरीअसली! थोड्यावेळासाठी तरी तुम्ही नक्कीच हे विसराल कि १० सेकंद आधी आपण एकविसाव्या शतकातल्या मुंबईमध्ये होतो!

इथे १२व्या ते १६व्या शतकातील युरोपिअन शैलीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘गॉथिक आर्कीटेकचर’ चा वापर प्रकर्षाने दिसून येतो. जागोजागी ठेवण्यात आलेल्या रंगीत काचांवरील चित्रकला हि देखील इथली खासियत. तुम्हाला अशा रंगीत काचा असलेले दरवाजे CST स्टेशन वर सुद्धा बऱ्याच जागी पाहायला मिळतील, फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ मिळायला हवा 😛 .

अजून थोडं आत गेलात आणि वरती जाण्याची संधी मिळालीच तर CST च्या सिग्नल वरची वरदळ बघायला नक्की बालकनीत जा. तिथून ह्या वास्तूच्या भिंती तुम्हाला अजून जवळून बघायला मिळतील. भिंतीचा प्रत्येक कोपरानकोपरा अतिशय बारकायीने कोरण्यात आला आहे. थोडा वेळ ह्या बिजी शहराला न्याहाळून झाल्यावर, आपला दिवस वसूल झाल्याची फिलिंगआली असेल, तर तुम्ही आता खाली उतरायला सुरुवात करू शकता.

बाय बाय CST:

आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे सुद्धा माहित नसेल कि CST २००४ ला युनेस्को द्वारा ‘World Heritage Site’ म्हणून घोषित झाली आहे. मला पण हे हल्लीच कळालय, आणि देव जाणे अजून ह्या वास्तूची किती रहस्य आहेत जी सर्वसामान्यांना अजिबातच माहित नाहीत.

मी महिन्यातून २-३ वेळा तरी रात्री कुणीच नसतं तेव्हा ‘Heritage Cycle Ride’ साठी इथे येतो, ह्या जादूई वास्तूकडे थोडा वेळ टक लाऊन बघतो, आणि सेम प्रश्न माझ्या मनात येतो.

‘अजून कित्ती रहस्य आहेत ह्या वास्तूमध्ये देव जाणे!’

मला अभिमान बाटतो, कि मी ह्या ऐतिहासिक वास्तूच्या इतक्या नजीक राहतो. म्हणून तर मला मुंबई आवडते. मुंबई चालते, पळते, तिच्या भूतकाळातून वर्तमानात आणि वर्तमानातून भविष्यात इथल्या वाटसरूंना स्वप्न दाखवते J.

मुंबई कायम चालूच राहते. २४ तास, सातही दिवस, आणि भूत,भविष्य, वर्तमान ह्या तिन्ही काळात.

चला, आता बस झालं, अजून बाकीच्या जागांबद्धल पण जाणून घायचंय आपल्याला!

Related Posts