चोर बाजार उर्फ भेंडी बाजार (Chor Bazaar)

मटन स्ट्रीट आणि चोर बाजार –

रस्त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल कि तिथे जाताना तुम्हा कशा प्रकारची कापाकापिची दृश्य पाहायला मिळणार आहेत ;p . (ज्यांना सवय नाही त्यांनी कृपया इथे तिथे न बघता सरळ मुंडी खाली घालून चालत जावे)

आणि ह्या मार्केटला ‘चोर’बाजार का बोलतात टे पुढे गेल्यावर कळेलच तुम्हाला. पण त्या मागे पण एक स्टोरी आहे, क्वीन विक्टोरिया ची स्टोरी.

‘१००-१५० वर्ष जुनी गोष्ट आहे. एकदा राणी विक्टोरिया मुंबईला आली होती. जहाजावरून सामानाची हलवा हलव करत असताना राणीच्या काही वस्तू गायब झाल्या, त्यात वायोलिन, ड्रेस, आणि इतर रोजच्या वस्तू होत्या. आता झालं असं, कि ह्या सर्व वस्तू तिच्या शिपायांना थोड्या दिवसांनी ह्या बाजारात विकायला ठेवलेल्या दिसल्या 😀 . तेव्हा पासून असं म्हणतात कि तुमची कोणती वस्तू हरवली असेल तर ती शोधायला इथे यायचं. 😛 .’

पण असंही म्हणतात कि इथे कायम गोंधळ म्हणजे ‘शोर’ असतो, म्हणून ह्याचं नाव ‘शोर’बाजार ठेवण्यात आलेलं, पण नंतर त्याचं ‘चोर बाजार’ झालं.

पहिली ओळख :

      ‘ले लो, ले लो’, ‘चोरी करो, पकडे जओ, माssssर खाऑ’….

‘ले लो, ले लो’, ‘चोरी करो, पकडे जओ, माssssर खाऑ’….

वेळ सकाळी ६ वाजताची. सगळ्याच दुकानदारांचा त्यांच्या वस्तू विकण्यासाठी गोंधळ चालला होता.

‘हजार का बझार सौ में… ले लो… ब्रांडेड लो भाय.. ब्रांडेड!!!’, ‘हज्जार का बझार!!’

हेच ते शब्द जे मी तिथे पहिल्यांदा गेल्या गेल्या कानावर पडले. तेव्हा मी १८ वर्षाचा होतो.  एका मुलाला तिथे शर्ट फाटेपर्यंत मारलं होतं आणि एक हट्टा-कट्टा दुकानदार ‘चाचा’ (ज्याची दाढी मेहंदीने रंगवलेली होती) त्या मुलाच्या फाटलेल्या कॉलरला घट्ट धरून उभा होता. तो डोळे मोठे करून, टाचा उंचावत गर्दीत अजून कोणाला तरी शोधत होता.

‘चोर बाजारात पण चोरी!! काय जमाना आलाय यार!’ माझा कॉलोनीतला मित्र स्वतःशीच पुटपुटला. तो चाचा कदाचित त्या ‘फाटक्या’ चोराच्या बाकी दोन साथीदारांना शोधत होता. चाचा २-४ वेळा इथे तिथे बघून झालं कि त्या बिचाऱ्याला अजून वेग-वेगळ्या बॉडीपार्टवर नेम धरून मारत होता. ‘आ..आं..!’, background ला त्या चोराच ओरडण चालूच होतं. सकासकाळी इतका क्रूर मारहानीचा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो.

त्या चोराची सुजलेली हनुवटी आणि काळा पडलेला डोळा बघून थोडी भीती वाटली. त्याला बघून माझं काळीज धकधक करायला लागलं होतं, मग त्या गरीब हडकुळ्या जीवावर काय गुजरत असेल त्यालाच ठाऊक. पण हे मात्र नक्की, कि उभ्या आयुष्यात तो आणि त्याला लांबून खांबाआडून बघणारे त्याचे ते दोन मित्र परत कधीच चोरबाजारात चोरी करणार नाहीत.

‘काय चोरलं असेल रे त्याने?’ आमच्या सोबतच्या एका मुलाने विचारलं, ज्याला नक्कीच हा किस्सा कट्ट्यावर पोरांमध्ये रंगवून सांगायचा असणार.

त्याच्या चौकस मित्राने, हळूच कानात बोलून त्याला तंतोतंत खबर दिली, ‘३ अंडर वेयर!’.

आणि ह्यावर त्याच्या मित्राची रिएक्शन, ‘आयची ** !!’. आणि सगळ्यांमध्ये हशा पिकला.

चोर बाजारात का जावं?

तशी बाजारात जाण्यासाठी तुम्हाला जास्त रिसर्चची गरज नाही, फक्त ‘जेब कात्रोसे सावधान’ रहा म्हणजे झालं. बाकी इतकी रिस्क घेऊन पण का जावं असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल…

दक्षिण मुंबईतल हे सर्वात जुन्या मार्केट्सपैकी एक आहे, ज्याचा इतिहास १४० वर्षाहून जुना आहे. चोर बाजार म्हणजे इथली शान आहे, इथे तुम्हाला सगळं काही मिळेल. अगदी ‘पेन’पासून ‘पीन’पर्यंत, अगदी ‘दुबई’पासून ‘चीन’पर्यंत सगळ्या देशातले प्रोडक्ट्स, एकदम कमी किमतीत. सगळ्या प्रकारच्या खेळाच सामान, मोबाईल सारख्या इलेक्टोनिक वस्तू सगळं.. सगळं!

इथे तुम्हाला अख्खी गाडी पण मिळेल आणि त्या गाडीचे छोटे पार्ट्स पण. जुन्या एनटीक वस्तू, जुने नकाशे, जुन्या सिनेमांचे पोस्टर्स, काचेचे दिवे, ग्रामोफोन रेकॉर्डर.. तशी हि लिस्ट खूप लांबलचक आहे. ह्या पृथ्वीवर ज्या कुठल्या प्रकारचं सामान आहे (जे mostly चोरलेलं किंवा second hand असतं) ते इथे मिळतं.

ढून्डेगा उसको मिलेगा भाय, ढून्डेगा उसको मिलेगा :

हो, हे खरंय!

इथले विक्रेते दुकान लावल्या लावल्याच हा डिस्क्लेमर देतात, ‘ढून्डेगा उसको मिलेगा भाय!’.

इथे काही खरेदी करायचं असेल तर तुमचं नशीब सुद्धा तितक तुमच्या बाजूने असायला हवं. कारण चांगल्या गोष्टी चोर बाजार उघडल्या उघडल्या अवघ्या अर्ध्या-एक तासातच संपून जातात. आणि जरी तुम्हाला एखादी वस्तू आवडली आणि तुम्ही ‘१० मिनिटांनी पुन्हा येऊ तेव्हा बघू’ असे म्हणत असाल तर थोड अवघड आहे बघा तुम्हाला ती वस्तू मिळणं.

खरा चोर बाजार : टायमिंग –

सहसा चोरबाजार सकाळी ११ ते ७.३० ला चालू असतो, आणि शुक्रवारी ‘जुम्मा’ बाजारला सकाळी ३ लाच उघडला जातो. आणि हा ३ ला उघतो ना तो खरा ‘चोर’ बाजार आहे बघा. कधी गेलात तर शुक्रवारी एकदम लवकरात लवकर सकाळी जायचं. मग ‘शोधेल त्याला सापडणारच!’

काहीही खरेदी करताना सावधान!!

आता हे वाचून तुम्हाला चोर बाजारात एकदा तरी फेरी मारायची इच्छा झालीच असेल. आणि मी तर म्हणीन तुम्ही कितीही गरीब असुद्या किंवा श्रीमंत, हि मुंबईतली must visit place आहे. फक्त थोडीशी खबरदारी घ्या, नाही तर समजलं तुमचीच वस्तू चोरीला गेली आणि तुम्हाला ती तिथूनच विकत घ्यावी लागली!!

आणि अजून एक ‘सावधान इंडिया’ टाईप किस्सा तुमच्या माहिती साठी सांगून ठेवतो. मागे आमच्या कॉलनीतल्या एका दादाने चोर बाजारातून १४ हजारांचा मोबाईल विकत घेतला. त्याने सगळं काही चेक केलं. पण एक छोटीशी चूक झाली बिचाऱ्याकडून. घरी येऊन त्याने फोनचा बॉक्स उघडून बघितला तर त्यात फोनच्या जागी फोनच्याच आकाराचा अंघोळीचा साबण होता.

आता बघा, बिना अंघोळीचा इतक्या लवकर उठून चोर बाजारात गेला आणि नंतरची एक अंघोळ १४ हजाराची पडली.

Related Posts