फ्लाइंग सिख – द रेस ऑफ माय लाईफ – मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र

काहींच्या मनात मिल्खा सिंग हे नाव ऐकताच इतिहासाच्या पुस्तकातील एखादी धूसर स्मृती चाळवली जाते, पण बहुतेक लोक त्यांना अजूनही ओळखतात ते त्यांना मिळालेल्या ‘उडणारा शिख’ या त्यांच्या टोपणनावानंच. चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीतील सर्वोत्तम खेळाडू अशी कीर्ती प्राप्त केलेल्या मिल्खा सिंगांवर त्यांच्या आयुष्यातील अंतिम ठरलेल्या शर्यतीत १९६० सालच्या रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हार पत्करण्याची नामुष्की ओढवली.

हे अपयश त्यांना किती क्लेशकारक ठरलं असेल! परंतु अपयशावर मात करून पुन्हा एकदा उभं राहण्याच्या वृत्तीमुळे मिल्खा सिंग या घनघोर अंधकारमय कालखंडातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःला अपराधाच्या भावनेतून मुक्त केलं. पण अशा प्रकारची मुक्ती मिळवणं सोपं नव्हतं कारण आयुष्याची शर्यत धावत असताना त्यांना त्यांच्या मनातील पिशाच्चांना आणि अनेक प्रकारच्या भयगंडांनाही सामोरं जावं लागलं, त्यांच्याशी चार हात करावे लागले.

मिल्खा सिंगांनी आयुष्यात अनेक प्रकारच्या दुर्धर प्रसंगांना तोंड दिलं रक्तरंजित फाळणी पाहिली, त्यामध्ये त्यांचं कोवळं बालपण निष्ठुरपणे खुडलं गेलं, अनिकेत अवस्थेत त्यांनी तऱ्हेतऱ्हेचे लहानमोठे गुन्हे केले, अथक कष्ट करून जयही मिळवले आणि ते क्षण त्यांच्या हातून निसटण्याचं दुर्भाग्यही अनुभवलं. पण इतका प्रचंड संहार आणि निराशा अनुभवल्यानंतरही त्यांची प्रत्येक क्षण पूर्णत्वानं उपभोगण्याची क्षमता किंचितही ओसरलेली नाही. असामान्य व्यक्ती अशा मातीच्या बनलेल्या असतात इतकाच निष्कर्ष आपण काढू शकतो. त्यांचं आयुष्य इंद्रधनुष्यातील सात झळाळणाऱ्या रंगांनी बनलं आहे.

मानवी आयुष्यातील अगम्य संकटं आणि सत्त्वपरीक्षा यांच्यापासून बनवलेली एक गुंतागुंतीची प्रतिमा असं त्यांच्या आयुष्याचं स्वरूप आहे. तो जीवनपट आपल्यापुढे उलगडतो तेव्हा एकाच गोष्टीची सातत्यानं जाणीव होत राहते. खरा विजय आयुष्यात अडचणींना सामोरं जाऊनच मिळत असतो, त्यांच्यापासून पळ काढण्यानं नाही. आपल्या आयुष्यातील अडचणींपासून दूर पळू नका, त्यांच्याबरोबर शर्यत लावा.

– – ‘द रेस ऑफ माय लाईफ – मिल्खा सिंग’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादातील काही भाग.

पुस्तक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *