मनातलं घर

घर. लहानपणी हा शब्द ऐकला कि त्रिकोणी कौलं आणि खाली ४ भिंती अशी वास्तू डोळ्यासमोर यायची. लहान असताना भरपूर वेळा अशी घरं कागदावर रेखाटली आहेत मी. पण माझं घर तसं बिलकुल नाही आणि आता मला ते थोड्या दिवासंनी सोडाव लागणार आहे.
मी घर सोडण्याआधी एक दिवस असाच कोणी नसताना भिंतींना बघत बसलो होतो. ह्या त्याच भिंती होत्या ज्यांनी मला नुसत्या कमरेच्या धाग्यावर बघितलं होतं. ह्या त्याच भिंती होत्या ज्यांना मी गोट्या भोवरे आपटून-आपटून खराब केलं होतं. ह्या त्याच भिंती होत्या ज्यांच्यावर आदळून मी माझं डोकं फोडून घेतलं होतं, ज्यांच्यावर मी पेनाने रेगोट्या मारल्या म्हणून मार खाल्ला होता, माझी पहिली उडती गाडी फिरवली होती.

आता त्या भिंतींमधला त्राण गेला आहे. एखाद्या म्हाताऱ्याच्या अंगावर सुरकुत्या पडाव्यात तशा त्यावर भेगा आहेत. अर्थातच, त्या भेगा घर सोडायचं कारण नव्हतच मूळी. माझे बाबा आता पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत. मग त्यानंतर कधी तरी रूम सोडायची होतीच. मनाला मी आधी तसं तयार सुद्धा केलं होतं.

ज्या घरात मी पोटाने सरकत होतो, ज्या घरात माझी लाळ सांडली होती, काय माहित न-कळत्या वयात अजून काय काय केलं होतं मी तिथे. आज ते घर सोडायचा दिवस जवळ आला होता.

हा हे घर माझ्या वाढत्या आकाराच्या मानाने छोटं आहे खर.. त्यात आलिशान flat सारखी २४ तास पाणी, सगळीकडे नळ, शॉवर अशा सुविधा नव्हत्या, पण त्या अडचणींमध्येच मजा होती.

जाता जाता माझ्या लक्षात आलं, ज्या घरात मी माझा पहिला शब्द बोलायला शिकलो त्या घराशी मी कधी बोल्लोच नव्हतो. आज त्या शांततेत मी शेवटची रात्र म्हणून बोलायचा प्रयत्न करत होतो. मनात काहीच येत नव्हतं….  डोळ्यात पाणी येणार तेवढ्यात हवा नसतानाहि भिंतीचा पापुदरा खाली पडला, ‘माझे अश्रू थांबवायला ते घर सांगत होतं जणू’. मी घराला काहीच न सांगता त्याने माझी शांतता ऐकली होती. त्या घराने मला मागची २२ वर्ष बघितलं होत, वाढवलं होतं. असं वाटलं ह्या भिंतींमध्ये जीव असता तर त्यांनी मला इथून कधी जाऊच दिलं नसतं. इतरांसाठी त्या भिंतीच आहेत म्हणा. निर्जीव भिंती.

उद्या मी हे घर सोडून जाणार हे नक्की, पण ह्या घराने माझ्या मनात जे घर केलंय ते कसं सोडू..??
स्थळ – वरळी पोलिस कॅम्प (३१-०६-२०१२.)

Related Posts

Leave a Reply