maitri Arogyashi Marathi health tips book

मैत्री आरोग्याशी

आरोग्यविषयक पुस्तकं वाचून आपण स्वतःच आपले डॉक्टर होत नसतो किंवा व्हायचंही नसतं. आरोग्यविषयक पुस्तकं ही आजार किंवा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे कळावे किंवा प्राथमिक उपचारांबद्दल माहिती व्हावी म्हणून वाचायची असतात.

‘मैत्री आरोग्याशी’ या पुस्तकात डॉ. सुभाष बेन्द्रे सुरुवातीलाच ‘स्वतःचे स्वतः डॉक्टर होऊ नये पण स्वतःचे आरोग्यस्नेही जरूर व्हावे!’ असं सांगत चुकीच्या आहारपद्धती, आरोग्य आणि औषधविषयक कल्पनांबद्दल सजग करतात. रोग होऊच नये म्हणून काय काय करता येईल, झाल्यावर काय काळजी घ्यावी आणि कोणत्या पायरीवर डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे, साधारणतः औषधं केव्हा व कशी घ्यायची याबाबत माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळेल. ‘काय करावं’ सोबत ‘काय करू नये’ याबद्दलही डॉक्टरांनी इतक्या सुंदररित्या सांगितलं आहे की, ते कायमचं तुमच्या मनात कोरलं जाईल. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल पुस्तकात लिहिलं आहे की, आपण त्याकडे कधी लक्षच दिलं नसल्याचं पुस्तकभर जाणवत राहतं.

डॉक्टर लिहितात, ‘डोके दुखते, अंग दुखते असे बोलल्यावर ‘एखादी क्रोसीन घेऊन टाक’ हे उत्तर सहजपणे दिले जाते. त्याचसोबत जाहिरातींमधल्या जादुसारखा परिणाम साधणाऱ्या औषधांच्या जाहिराती पाहून स्वतःच त्यांचा उपयोग केला जातो जे अहितकारक आहे. केवळ ४-८ रुपयांत काम भागते म्हणून केमिस्टकडून डायरेक्ट औषधे घेऊ नका. तुमचे शरीर इतक्या कमी किमतीचे नाही हे लक्षात ठेवा.’

या पुस्तकातील अतिशय भावणारी गोष्ट म्हणजे डॉक्टरांची सकारात्मकता आणि साध्या सोप्प्या भाषेत सांगितलेले उपाय. एकूण १०३ प्रकरणांमध्ये डॉ. सुभाष यांनी वेगवेगळ्या आजारांबद्दल लिहिले आहे. पुस्तकाची मांडणीही इतकी उत्कृष्ट आहे की, अनुक्रमणिका पाहून, आपल्याला ज्या आजाराबद्दल माहिती हवी आहे, ती पटकन शोधणं सोप्पं जातं. आरोग्यविषयक अनेक मुद्दे विविध प्रकरणांमध्ये विभागून, योग्य तिथे उदाहरणं देऊन अतिशय विस्तृतपणे समजावून सांगितलेली आहेत. डॉक्टरांची भाषा इतकी ओघवी आहे की, ते स्वतः समोर बसून काळजीने, जिव्हाळ्याने माहिती देत आहेत असं वाटतं. त्यांचं स्वतःच्या कामावर अत्यंत प्रेम असल्याचं तर पुस्तक वाचताना अनेकदा जाणवत राहतं.

लहान मुलं घशाची, टॉन्सिल दुखण्याची तक्रार करत असतील तर, ‘आईस्क्रीम खाल्लेस ना म्हणून होतंय, वाटेल बरं!’ असं म्हणून दुर्लक्ष करू नये, आपल्याला लागू झालेली औषधं इतरांना देऊ नये, काही आजारांमध्ये केवळ सहानुभूती नाही तर प्रेम, जिव्हाळा देण्याची गरज असते, वेदना म्हणजे शरीराद्वारे धोक्याची सूचना दिलेली असते पण त्याकडे दुर्लक्ष करून असा बिघाड का झाला याचं कारण न शोधता वेदनाशामक औषधे देऊ किंवा घेऊ नये अशा अनेक गोष्टी पुस्तकातून कळतात.

हितकारक पथ्ये, समतोल आहार, ऋतुमानानुसार व वयानुसार घ्यायची काळजी, प्रवासातील काळजी, दातांचे आरोग्य, पोटाचे विकार, लंघनाचे महत्व, सांधेदुखी, मणक्यांचे आजार, मधुमेह, वाढलेले वजन, नाकाचे, कानाचे, डोळ्यांचे विकार, चक्कर, दमा, खोकला, एड्स, रक्तदाब, हृदयविकार, बायपास, मेंदूतील रक्तस्राव, पक्षाघात, मुत्रविकार, कर्करोग, प्रसुती, स्वाईन फ्ल्यू, नागीण, अन्नविषबाधा, निद्रानाश यांसोबतच मनःशांती, त्वचारोग, मनस्वास्थ्य, आत्महत्या, कणखर मन, अस्वच्छतेमुळे होणारे आजार, लोकल प्रवासातील विकार, अशा अनेक छोट्या, मोठ्या आजारांबद्दल व विकारांबद्दल पुस्तकात सर्वांगाने भाष्य केलेलं आहे. सामान्य माणसालाही सहजरित्या समजावं यासाठी काहीवेळा एकाच विषयाबद्दल ३-४ प्रकरणांमधून माहिती दिली आहे.

त्याचसोबत अलोपॅथीसोबत आयुर्वेद, उत्कृष्ट आहार, आहारात फळांचा, सॅलड, भाज्या, तेला-तुपाचा योग्य वापर, पाणी पिण्याचे, चालण्याचे फायदे, रोग तपासणीच्या विविध चाचण्या, औषधांच्या अवास्तव वापराचे घातक परिणाम यांवरही डॉक्टर मार्गदर्शन करतात.

पुस्तकातील प्रकरणांची नावंही मजेशीर आहेत. ‘चहाच्या चाहत्यांनो सावधान’, ‘लंघन- नव्हे बंधन’, मलावरोध : कसा कराल विरोध?’, ‘कावीळ ‘रंग’ दाखवेपर्यंत वाट पाहणे धोक्याचे’, ‘आली चाळीशी, काळजी घ्या पुरेशी’, ‘गाऊटला करा आउट’, ‘नसेल कंबरदुखी तर व्हाल सुखी’, ‘मधुमेह – सोडा ‘मधू’चा मोह’, ‘कानासाठी कानमंत्र’, ‘नाकाच्या विकारांना नाक मुरडू नका’, ‘देही आरोग्य नांदते, भाग्य नाही यापरते’ ही मला आवडलेली काही नावं.

‘देह देवाचे मंदिर मानून आयुष्यात जगण्यासाठी जे-जे चांगलं आहे, सात्विक आहे, योग्य आहे असे आहार-विहार-औषध यांची संगत का धरू नये?’ असे विचारत डॉ. सुभाष बेन्द्रे यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या अनुभवाच्या कसोटीला उतरलेले आचार, विचार, उपचार या पुस्तकात मांडलेत. पुस्तकाला जेवणाच्या ताटाचं रूपक देऊन ते सांगतात, ‘आयुष्याचं सार एका छोट्या पुस्तकात सामावणार नाही याची मला कल्पना आहे. तरी तुमच्याच प्रेमळ आग्रहास्तव हे ताट मांडलं आहे. यातील सर्व पदार्थ रुचकर आहेत. मनापासून खा म्हणजे आरोग्य उत्तम राहील. ताटातील एकही वाटी दूर सारू नका. निदान चाखून तरी पहा. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे.’

डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी इथे क्लिक करा!

पुस्तक – मैत्री आरोग्याशी
लेखक – डॉ. सुभाष बेन्द्रे
प्रकाशक – रमा प्रकाशन
छापील किंमत – २५०/-


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *