लक्ष इच्छांवर

एक वय होतं जेव्हा दर महिन्याला एका तरी मित्राचा वाढदिवस असायचा. आता असं वय आलंय कि दर महिन्याला एकाचं लग्न होतंय. आधी बर्थडे पार्ट्यांमध्ये होणाऱ्या भेटी, लग्नात जेवताना होऊ लागल्या आहेत. आपल्या लिस्ट मधली कोणती व्यक्ती (दुसऱ्या सोबत लग्न होऊन) खपली, ह्याच्या अपडेट्स मिळतायत.

कदाचित पुढच्या वर्षापासून बर्थडे-पार्टी ऐवजी लग्नाच्या वाढदिवसांना भेटी होतील, आणि मग कदाचित नंतर त्यांच्या मुलांच्या वाढदिवासात! स्वतःचं वाढतं वय मोजत आपण एकटेच उरलेलो असू. आणि मग कधी एकेकाळी दिवसाला ४ केक कापणारे त्याच दिवशी शांततेत बसलेले असतील.
हे मात्र तितकंच खरं, कि हे वाढतं वय कोणीच मागितलं नव्हतं. ‘पण मोठं तर सगळ्यांनाच व्हायचं होतं’. आणि एकटेपणा सुद्धा तुम्ही कधीच मगितला नसेल,पण शांतता आपण कधी तरी मागितली होतीच ना!

आपली एक इच्छा दुसऱ्या इच्छेला आडवी येतीय, हे समजलं तोवर उशीर झाला होता. कारण कालचा दिवस हातातून कधीच निसटून गेला होता. बरं.. तो निसटलाय हे सुद्धा अजून बऱ्याच जणांना माहित नाही, कारण ते उदयाला पकडण्याच्या धडपडीत आहेत.

येणाऱ्या उद्यासाठी कोणाला नवीन लाईफ-पार्टनर शोधायचाय तर कोणाला नवीन जॉब. आणि हातात असलेली गोष्ट आता थोडी छोटी वाटू लागलीय. पण आपण कधी थोडा वेळ थांबून हा विचार करतो का, कि मला नक्की काय हवं होतं, आणि मी काय मागितलं होतं.. आणि शेवटी आज आता माझ्या हातात काय मिळालं आहे.

ह्या सगळ्यांचं काय तरी कनेक्शन असतंच. हो.. थोडावेळ थांबून आपल्या ‘इच्छांवर’ लक्ष ठेवायची वेळ आलीय.

Related Posts

  • Reply Aditya Desai July 8, 2018 at 3:17 pm

    Mast jamlay

  • Leave a Reply