कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

काही वर्षांपूर्वी, ‘सेकंड हॅन्ड’ नावाची, दोन भावांची एक कथा वाचलेली. त्यांचे वडील कुठल्या तरी कापड दुकानात दिवाणजी होते. तशी परिस्थिती बेताचीच होती. पण दोघं मुलं छान शिकली. त्यातला मोठा भाऊ खूप हुशार, पहिला नंबरवाला होता. छोटा तसा हुशारच पण मोठ्याच्या सावलीत झाकोळलेला. छोटा भाऊ मेहनती होता, पण फार महत्वाकांक्षी नव्हता. त्याचा टारगेट ठेवून पुढं जायचा स्वभाव नव्हता. त्या दोघा भावांमध्ये प्रचंड प्रेमदेखील होतं. त्यांच्या मनात सेकंडहॅन्डचा विषयही नसायचा. लहानपणापासूनच मोठ्याच्या सेकंड हॅन्ड वस्तू जशा की पुस्तकं, सायकल वैगरे आणि मोठा झाल्यावरही अगदी मोठ्या भावाचा फ्लॅट त्याच्या लोनच्या बजेट मध्ये बसतोय म्हणून छोटा वापरत आलेला. पण छोट्या भावाच्या बायकोला हे सगळं सेकंडहॅन्ड आयुष्य आवडत नव्हतं. ती त्या घरात सेटलच होत नव्हती. तिच्या मोठ्या जावेने मात्र तिला समजून घेत सेकंड हॅन्डचा नवीन विचार तिला समजावलेला की,

“दादाचा मायेचा हात, कधीही ‘सेकंड हॅन्ड’ नसतोच मुळी. तो फर्स्ट हॅन्डच. राईट हॅन्ड.”

किती सुंदर विचार आणि मेसेज आहे ना हा!

त्या कथेच्या लेखकाचं नाव तेव्हा आठवत नव्हतं (किंवा कदाचित कोणी व्हॉट्सऍपवर लेखकाच्या नावशिवायच कॉपी पेस्ट केलेलं.) पण कथा मात्र मला प्रचंड आवडलेली. म्हणजे त्यातला तो सेकंड हॅन्डचा विचार तर खुपचं भारी आहे. तर गंम्मत अशी, की ‘कथुली’ हे पुस्तक हातात आल्यावर, ते चाळताना मधलं पान उघडलं आणि मला आश्चर्यच वाटलं कारण त्यादिवशी सकाळीच ती कथा सांगत एका मैत्रिणीला मी समजावत होते (एवढा योगायोग पाहून चक्क उडालेचं!) आणि जे पान मी पहिलं उघडलं त्या पानावर ही ‘सेकंड हॅन्ड’ नावाची कथाच होती. इतक्या वर्षांनी ही कथा मूळ लेखकाच्या पुस्तकात वाचण्याचा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप खास होता.

‘कौस्तुभ केळकर नगरवाला’ सरांच्या ‘कथुली’ या पुस्तकात ही ‘सेकंड हॅन्ड’ नावाची कथा आहे. त्या कथेतील गर्भितार्थ किंवा मेसेज इतक्या वर्षानंतरही माझ्या जसाच्या तसा लक्षात आहे, हे कौस्तुभ सरांच्या कथा सांगण्याच्या स्टाईलमुळेच. या पुस्तकातील इतर कथाही अशाच हलक्या-फुलक्या पद्धतीने मोठा डोस देणाऱ्या आहेत. सरांच्या इतर कथा तुम्ही फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साईट्सवर वाचल्या असतील तर त्यातून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की त्यांच्या कथांमध्ये एक प्रकारचा लयबद्ध वेग आहे, ज्यामुळे या सगळ्या कथा एका पाठोपाठ एक वाचत राहाव्याश्या वाटतात आणि शेवट काय असेल याची उत्सुकता कायम ताणलेली राहते.

सरांच्या खास लेखनप्रकारातील ही जलद लय तुम्हाला कथा पुढे पुढे वाचायला उद्युक्त करते. एखादी मोठी गोष्ट अगदी वेगात वाचत असल्याचा फील आणि छोटी सोप्पी वाक्यरचना असल्यामुळे पूर्ण कथा पटकन समजते आणि लक्षात राहते.

लेखकाच्या लेखणीच्या याच वैशिष्ट्यांमुळे नवीन वाचनास सुरुवात करणाऱ्यांसाठी आणि वाचनवेग वाढविण्यासाठी देखील हे एक उत्तम पुस्तक आहे. या कथांमधील घटना, पात्र, जागा, संवाद आणि भाषा आपल्या रोजच्या जीवनातील आजूबाजूला घडणाऱ्याच वाटतात. संवादातील इंग्रजी-मराठी शब्द एकत्र करून नव्याने निर्माण केलेले ‘वाचणेबल’, ‘ऐकणेबल’, ‘परवडेबल’ असे शब्दही लक्ष वेधून घेतात.

मला स्वतःला पुस्तकाचं नावदेखील फार आवडलंय. ‘कथुली’. किती छोटंसं सुंदर नाव आहे. लेखकाच्या भाषेत ‘कथुली म्हणजे कथेचं पिल्लू. छोटीसी, प्यारीसी, नन्हीसी कथा. तुमच्या आमच्या आयुष्यात रोज घडणारी म्हणूनच आपली वाटणारी.’

पुस्तकातील इतर कथा देखील अशाच तरल, हृदयस्पर्शी आहेत. एकत्र कुटुंबाचं, मैत्रीचं, नात्यांचं महत्व सांगणाऱ्या. स्वतःवर, नात्यांवर, माणुसकीवर विश्वास ठेवायला उद्युक्त करणाऱ्या. काही काही कथांमधून हे खरंच प्रत्यक्षात घडेल का असा प्रश्न पडतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कथांमधून हरवलेली माणुसकी भेटत राहते आणि आपल्याही आचरणात ती यावी यासाठी निदान प्रयत्न तरी करावासा वाटतो, हे नक्कीच लेखकाचं यश आहे.

कौस्तुभ सरांच्या कथांमधून सोसायटीच्या नजरेतून ऑड असणाऱ्या गोष्टी एकदम वेगळ्या, पटणाऱ्या वाटू लागतात. ‘उंचाली’ ही कथादेखील अशीच. त्या कथेतल्या साहिलला त्याची लहानपणापासूनची मैत्रीण फार आवडायची पण ती त्याच्यापेक्षा जास्त उंच असल्याने तो ऑकवर्ड, गोंधळलेला होता. पण उंचीपेक्षा तिचा स्वभाव महत्वाचा आहे, लोकं काय म्हणतील हे नाही, हे समजल्यावर त्याने योग्य तो निर्णय घेतला. कथेत शेवटी लेखकाने सांगितलंय की,

“उंचीत फरक दिसला तरी काही फरक पडत नाही. मनं सारख्या हाईटवर पाहिजेत.”

‘कथुली’तील प्रत्येक कथेतील व्यतिरेखा अशाच लार्जर दॅन लाईफ धडे देतात आणि आपल्या कृतीचं अवलोकन करायला भाग पाडतात. ‘अभिषेक टाईपसेटर्स अॅण्ड पब्लिशर्स’ यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. पुस्तक ऑनलाइन ऑर्डर केल्यावर अगदी दोनच दिवसात व्यवस्थित घरपोच पोहचवल्याबद्दल त्यांचे आभार.

लेखक कौस्तुभ केळकर यांनी मनोगतात लिहिलंय की, ‘मी खूपच साधंसुधं लिहितोय पण जे लिहिलंय ते मनापासून. माझ्या चतकोर आयुष्यात, मी पाहिलेली माणसं माझ्यासारखीच सीधीसाधी आहेत पण तरीही त्यांच्याबद्दल ‘इनमें कुछ खास बात थी!’ असं वाटायचं आणि म्हणूनच माझ्या या कॉमन माणसांच्या अनकॉमन कथा.’ पुस्तकात एकूण ५० कथा आहेत आणि खरंच या कथा कॉमन माणसाच्याच असल्या तरी त्यांच्यातलं वेगळेपण जाणवत राहतं.

‘पोटभर’ कथेतील माणसं जोडण्याची कला, ‘मॉर्निंग तात्या’ मधील “रिटायरमेंटची वाट बघू नका. जोडता नाही आलं तरी  शब्दांनी कोणाला तोडू नका. छोटंसं का होईना, दुसऱ्यासाठी तुमच्या सोईनं एखादं काम करा” सांगणारे तात्या, ‘उपाशी’ कथेतील जॉब गेलेला नवरा, त्याचा आत्मविश्वास कमी करणाऱ्या, त्याचं जगणं मुश्किल करणाऱ्या लोकांना घाबरतो; तेव्हा “तुझ्यापेक्षा जास्त इनसिक्युर्ड फील करणारी माणसं आहेत ही. तुझं घरी बसणं त्यांना रिलॅक्स करतं. त्यांचा छोटा पगारही मोठा वाटायला लागतो. पळू नकोस. फेस देम.” असं सांगत नवऱ्याचा आत्मविश्वास वाढवणारी बायको, ‘चलती का नाम गाडी’ कथेतील नवऱ्याने छोटी गाडी घेतली म्हणून नाराज असणाऱ्या बायकोला “गाडी छोटीच असते. आपल्या माणसांनी भरली की मोठ्ठी होते.” असे सांगणारे तिचे वडील, अशी ही सारी पात्रं आणि त्यांच्या कथा तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन, विचार देतात. आपल्या सगळ्यांच्याच छोट्याश्या सुंदर सुंदर कथा आहेत या. जमलं तर नक्की वाचा!

पुस्तक विकत घेण्यासाठी प्रकाशकांची माहिती पुढीलप्रमाणे –

अभिषेक टाईपसेटर्स 

पुस्तकाची किंमत – 250/- पोस्टेज सहित 

मंगेश वाडकर – 9422080967 

या क्रमांकावर GPay/ Paytm/ Phone Pay करू शकता. 


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *