इतकी घाई कशाला केली!

.
‘स्वर्ग’ अशी जागा मुळात नाहीच आहे,
मी परवाच जाऊन आलो तिथे,
देव म्हंटला, ‘अरे इतकी घाई कशाला केलीस
तुला अजून खूप मजा करता आली असती की खाली!’
.
मी थोडा कोड्यात पडलो
यार.. जर खाली मजा येते
तर ‘लोकं वरती स्वर्गात येऊन अजून कसलं सुख मिळवायच्या गडबडीत आहेत..’
.
‘अरे इथे पण तीच गत आहे मित्रा..’
देव म्हणाला,
देव कसला माझ्यासारखाच कुणी तरी एक होता तो!
‘सगळी लोकं खाली जायला उत्सुक आहेत,
त्यांना कोणी तरी सांगितलंय खाली भारी मजा येते बुवा!’
.
‘थोड्या दिवसांनी तुला मी विचारीन,
तेव्हा तूच सांग कुठे जास्त मजा येते
खालच्या स्वर्गात की वरच्या स्वर्गात?’
.
‘खालच्या स्वर्गात! की वरच्या स्वर्गात!’
मी पडलो बुचकळ्यात,
‘खाली कुठला आलाय स्वर्ग?!’
‘अरे तो काय तो जमिनीवर’
देव खाली खुणवत म्हणाला..
.
‘मला तर काहीच दिसत नाहीय देवा.. आपलं.. भावा..!’
‘तुम्हाला तरी कुठे काय दिसतं वर..
तरी बोटं दाखवताच ना.. स्वर्ग बघा स्वर्ग बघा करत..
मी पण तेच करतोय’
.
‘यार म्हणजे स्वर्ग नाहीच आहे का कुठे..!’
‘असं कसं, असं कसं!
स्वर्ग म्हणजे सुख, प्रत्येक क्षणामधलं,
ते तुला कुठूनही घेता येत..!’
.
‘स्वर्ग म्हणजे शाळेतला वर्ग,
तुम्ही कुठे तरी कोपऱ्यात असता आणि
मुलं दंगा मस्ती करत असतात,
त्यांना बघताना जे सुख मिळतं ना
तोच कि रे स्वर्ग!’
.
‘स्वर्ग म्हणजे आईची कुशी,
ती तुमच्या केसांमधून हात फिरवते
आणि तुम्ही शांत डोळे मिटून झोपी जाता,
तोच की रे स्वर्ग’
.
‘स्वर्ग म्हणजे.. बाबांनी दिलेली शिवी,
जी तुम्ही उद्या तुमच्या मुलाला द्याल,
तो सुद्धा तुमच्या सारखा गुणी व्हावा म्हणून’
.
‘स्वर्ग म्हणजे जुन्या मित्राने
गर्दीत अचानक मारलेली हाक,
प्रेयसीने हक्काने पकडलेला तुझा हात..
आणि हे सगळं सोडून
तू कुठल्या स्वर्गात यायला निघालास देव जाणे..!’
.
‘अरे.. देव म्हणजे तूच ना रे देवा..! आपलं.. भावा..!’
‘हाहा’ देव पण हसला, ‘अरे कशाला उगाच चेष्टा करतोय गरीबाची,
वेडा झालाय का भाऊ!’
.
‘स्वर्ग अशी गोष्ट इथे नाहीच आहे
मग देव कुठून रे आला?
ते बघ माझ्या मित्रांना वाटतंय मी तुझ्या बरोबर नाही देवा सोबत बोलतोय!..
मी पण परवाच जाऊन आलो की खालच्या स्वर्गात!
तुझ्या सारखाच एक देव ‘माणूस’ भेटला होता,
म्हंटला अरे इतकी घाई कशाला केलीस?
तुला अजून खूप मजा करता आली असती की वर!’

.

.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Related Posts

  • Reply Vinay July 23, 2019 at 4:52 pm

    Waah!

  • Reply Sneha July 24, 2019 at 1:01 am

    मस्त लिहिलं आहे यश 🙂

  • Leave a Reply