हक्क..? कि चुका!

आज ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरीनिर्वाण दिन. योगायोग बघा, परीक्षेची तयारी म्हणून आज भारतीय संविधानाचा अभ्यास करत शिवाजी पार्क जवळील घरात बसलोय. घर तळमजल्यावर असल्यामुळे गेली ३ दिवस इथून येणा-जाणाऱ्या भिमगर्दीला उठता-बसता ऐकायला-पहायला मिळतंय. दादर मध्ये राहण्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच डिसेंबर महिना.

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा… विजय असो!!’ अशी आरोळी दर ५ मिनिटांना ऐकू येतीय. तिथेच सोशल-मिडिया वर, ‘देवाला देव न मानणारे, माणसालाच देव समजून बसलेत 😀 … आज जर तो दूत जीवंत असता तर खरंच खूष असता का??’ असे स्टेटस वाचायला मिळतायत.

आमच्या घरा शेजारच्या चौकात मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. जिथे दर १०-१२ पेले पाणी पिऊन लोकं पुढे गेली कि, ‘कृपया पाण्याचे ग्लास इथेच ठेऊन जावे .. इतर भीम बांधवांना सुध्दा त्यातूनच पाणी मिळणार आहे.. तुमच्या बाटल्या तुम्ही खुश्शाल भरून घेऊ शकताsss’ अशा सूचना ऐकू येत आहेत.

शिवाजी पार्कात माणसांना आकर्षून घेणारं चुंबक आलंय कि काय, अशा प्रकारे लोंढेच्या लोंढे चैत्य भूमीच्या दिशेने जाताना दिसत आहेत. ह्या एकीला तुसड्या नजरेने बघणारे सुध्दा आहेतच मध्ये मध्ये. ‘ह्यांच्या मुळे दर वर्षी ट्राफिक होतं यार!!’, ‘शिवाजी पार्काची वाट लावली २ दिवसात!’ असे संवाद कानावर पडतायत.

मघाशी तर मी एका फरसाण विक्रेत्या दुकानाच्या शेठला त्याच्या गिऱ्हायीकावर उगाचच्या उगाच मोठ्याने डाफरताना पाहिलं, कदाचित त्याने घातलेले सफेद-निळे कपडे त्याचं कारण असावं. पूर्ण रस्ता जाम असताना एकाच जागी उभी असलेली एका ‘आय-फोन धारकाची’ गाडी, गाडीपुढून रस्ता ओलांडून जाणाऱ्या एका भीम बांधवाला हळूच त्याच्या गुडघ्यात गाडी पुढे घेऊन दाबताना पाहिलं. (धर्मामुळे नाही) गर्दीमुळे होणाऱ्या तणावामुळे ह्या गोष्टी होत असाव्यात कदाचित (तसं असेल तर आनंदच आहे कि!).

शिकलेल्या लोकांना (शिकले आहेत म्हणून कि काय) ह्या विषयावर बोलायला भीती वाटते. आणि अशिक्षित लोकं कुठल्या तरी एका पार्टीची बाजू घेऊन भांडत बसतात. (अर्थात हे भांडण सुध्दा पार्टीच्या हितावह असलं तरच!)

संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर सगळे करत आहेत, तरी कुठे तरी गणित चुकल्या सारखं वाटतंय. सगळ्यांनी एकसंध होऊन जगावं म्हणून आख्याss पृथ्वीवरच मोठ्यात मोठं संविधान असणाऱ्या देशाचा नागरिक आज वैचारिक दृष्ट्या भरकटलेला दिसतोय.

एकीकडे ह्या गर्दीला आपला ग्राहक बनवून धंदा करून फायदा कमवून जाणारे आहेत, आणि दुसरीकडे आपण ह्या गर्दीतला एक थेंब आहोत हे सांगण्यात अभिमान बाळगणारे आहेत.

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’

ह्या सुविचाराला शोभेल असं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर करून गेले आणि संविधान रुपी शिल्प त्यांनी आपल्याला सुपूर्त केलं.  त्यात अशा तरतुदी लिहिल्या कि प्रत्येक दीन बांधवाला एखाद तरी त्याचं स्वतःच शिल्प घडवता येईल.

आपापल्या विचारांनुसार शिल्प काढणारे शिल्प काढतायत.. आणि कचरा काढणारे.. कचरा!!

आता तुम्हीच सांगा ह्याला संविधानाने दिलेले हक्क म्हणायचं कि .. अनावधानाने केलेल्या चुका!!

 

ता.क.:- काही चुकलं असेल तर हक्काने खाली कमेंट करून मला दुरुस्त करा.. afterall संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार आहे तो : ) !!

 

Related Posts

Leave a Reply