द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी

तुम्हाला माहितीये, एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचं प्रमाण आजकाल वाढतंय! आकडेवारी बघितली तर गेल्या २० महिन्यांत पती-पत्नीपैकी कोणा एकाला घटस्फोट हवा आहे म्हणून दावा दाखल करण्याचा तुलनेत ९० टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत(संदर्भ- वृत्तपत्रं).

२ वर्षांपूर्वी एका लीगल फर्म मध्ये प्रॅक्टिस करताना आमच्याकडे बहुतेककरून डिव्होर्सच्या केसेस यायच्या. त्यातही संमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण बरंच जास्त असायचं.

मला नेहमी प्रश्न पडायचा की, ही लोकं या निर्णयाप्रत कशी आली असावीत? वाद न घालता शांतपणे चर्चा करून एकत्र निर्णय घेत आहेत म्हणजे इतक्या महत्वाच्या विषयावर त्यांचं एकमत होतंय! मग वेगळं होण्याचा इतका टोकाचा निर्णय का?

‘एकमेकांशिवाय जगू शकत नाही’ या स्थितीवरून ‘एकमेकांसोबत जगू शकत नाही’ अशी परिस्थिती कशी निर्माण होत असेल?

लक्षात घ्या, ‘आमच्या वेळेस नव्हतं असं’, ‘लव्ह मॅरेजचा परिणाम’, ‘तरुण पिढीची नाटकं’, ‘थोडीही सहनशीलता नसते आजकाल’, ‘मुलींकडून स्वातंत्र्याचा गैरवापर’, वैगरे वैगरे विचार करून किंवा प्रतिक्रिया देऊन या विषयाला आपण टाळू शकतो पण हा विषय वाटतो तितका साधा सोप्पा नाही.

प्रवीण दवणे सरांचं ‘द्विदल’ पुस्तक वाचताना माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. आपल्याला प्रचंड आवडणारं माणूस एकाएकी नकोसं का होत असेल, याचं फार समर्पक उत्तर दिलंय या पुस्तकात. पत्र रूपातून कथा उलगडत नेणारा कादंबरीचा हा एक वेगळा प्रकार दवणे सरांनी इतक्या तरलतेने मांडलाय की एका पत्रातील मुद्द्याचं उत्तर दुसऱ्या पत्रात कसं असेल, याची कायम उत्सुकता राहते आणि दोन्ही बाजू ऐकल्यावर आपल्याला काही प्रमाणात दोन्ही बाजू पटायला लागतात.

‘आपलं आवडणारं माणूस कुठकुठल्या संदर्भाच्या संस्कारांनी मोठं होत आलंय याचा विचारच केलेला नसतो आपण. आपण म्हणतो बरं का – ‘पूर्ण ओळखून एकमेकांना मन वैगरे दिलं. पण ही पूर्ण ओळख किती अपूर्ण  होती याचा शोध लागण्याच्या काळालाच संसार म्हणत असावेत. मनाचं हे असंही रूप होतं त्या व्यक्तीचं? अशी कोडी नित्यनव्याने पडत जातात आणि ही कोडी न सुटता अधिकच अवघडून बसली की हातात हात फक्त दिसतात. स्पर्शाचे गजरे कुठेतरी हरवलेलेच असतात. उरतो फक्त वाटचालीचा कोरडा आग्रह. एकत्र चालण्याचा सामाजिक संकेत आणि पुष्कळदा आता पुढेही निघून जाता येत नाही आणि मागेही फिरणं शक्य नाही, अशा स्वल्पविरामातली अगतिकता जगता जगता अर्ध आयुष्य निघून गेलेलं असतं.’

खरंतर या पुस्तकाचा उद्देश लव्ह मॅरेज करावं की नाही, हे सांगणं नाहीये तर प्रेमविवाह किंबहुना लग्न करण्याआधी किंवा वैवाहिक आयुष्यातही विचार करणं गरजेच्या असलेल्या पण कायम दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या महत्वाच्या गोष्टी दवणे सरांनी संवादातून सहजतेने मांडल्या आहेत. पुस्तकातील अनेक संवाद आपल्याला अवाक् करतात आणि खोलवर विचार करण्यास भाग पाडतात.

सायली व साहिल या जोडप्याची ही पत्रकथा. दोघं एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले. भृपृष्ठावरचाच माणूस खरा आणि त्याचे संदर्भच खरे असं मानणारी ती आणि दिसतो याहून माणूस वेगळा आहे तो खणून खणून मुळापर्यंत शोधणारा तो – अशी दोन टोकं एकत्र आली आणि एकदम विरोधी स्वभाव असूनही प्रेमात पडली, लग्न करून आयुष्यभरासाठी एकमेकांचा जोडीदार बनली. पण हे आयुष्यभर एकत्र राहावंसं वाटणं मात्र सुरुवातीची २-३ वर्षंचं टिकलं.

तिच्या कविमनाचं, हळुवारपणाचं, कलावंत वृत्तीचं आणि पूर्णत्वाच्या ओढीसाठी आसुसलेली त्याची बुद्धिमत्ता, त्याच्या क्षमता, पोलादी आत्मविश्वास, व्यवहारीपण यांचं आकर्षण संपल्यानंतर कदाचित त्यांच्या खऱ्या सहजीवनाला किंवा सहजीवनाच्या अंताला सुरुवात झाली. १५-१८ वर्ष एकत्र असूनही ते वेगळं होण्याच्या, घटस्फोटाच्या निर्णयाप्रत पोहचतात. घटस्फोट झाल्यानंतर एका वर्षाने विरहाच्या वेगवेगळ्या अनुभवातून जात असताना तुटलेल्या रस्त्याच्या अकल्पित वळणावर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला आणि ‘नक्की कुठे बिनसलं’ याचा पत्रातून शोध घ्यायचा प्रयत्न करतात.

साहिलने त्याच्या एका पत्रात लिहिलंय, ‘ मला वाटतं ज्या आकर्षणाने आपण ओढले गेलो तो काळ अन प्रत्यक्ष आयुष्य सुरू होण्याच्या काळ यातलं मधलं अंतर दोघांपैकी कुणाला तरी आधी कळलं असतं, तर दोघांवरही ही वेळ नसती आली. आकर्षणालाच ‘समजून घेतलं’ असं समजण्यातल्या वेडेपणाची किंमत आपण मोजतो आहोत.’

‘नेमकी कुठे वीण उसवत गेली? एकमेकांना आपण तिऱ्हाईत का वाटत गेलो? पण तरीही एकमेकांना जाणून घ्यावासं वाटण्याइतकेही अनोळखी का नाही झालो?’ याचा सायली आणि साहिलने पत्राच्या माध्यमातून घेतलेला हा परामर्श आहे.

असं वेगळं होण्याची अनेक कारणं असतात. कधी गृहीत धरणं, अवाजवी अपेक्षा असणं, इतरांसोबत तुलना करणं किंवा सायली तिच्या पत्रात म्हणते तसं एकमेकांसोबत मेळ न बसणं देखील असू शकतं. ती तिच्या पत्रात लिहिते की, ‘सुरुवात बरोबरीच्या पावलांनी होते. मग एका वेगाशी दुसऱ्या वेगाचा मेळ बसत नाही; पण सहचराची चाल का मंद झाली – यासाठी तरी क्षणभर मागे वळून बघावं असं वाटणं चुकीचं आहे का?’

साहिल-सायलीसोबत नक्की काय घडलं, काय चुकलं, ते पुन्हा एकत्र आले की नाही,कोण चूक, कोण बरोबर याची उत्तरं पुस्तक वाचून मिळवणंच उत्तम. कारण त्यांच्या वेगळं होण्याच्या प्रवास जाणून घेऊन प्रत्येकाने आपापल्या दृष्टीकोनातून त्याचा निष्कर्ष काढलेला चांगला (आणि घाबरू नका, त्यांची पत्र आपण चोरून तर वाचत नाही आहोत; तर बिनधास्त वाचा.) आणि विवाहइच्छूक तरुणांना तर नक्की सजेस्ट करा. काय माहीत, यातूनच आपल्यामधील कोणाची सायली किंवा साहिल होणं थांबू शकतं.

मला स्वतःला ही कादंबरी प्रचंड आवडलीये. दवणे सरांनी त्यांच्या काव्यात्मक भाषेत पतिपत्नी या सनातन नात्याचा एक उत्कट शोध घेतलाय. वैवाहिक आयुष्य संतुलित आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने एकदातरी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. पुस्तकातील प्रत्येक पानावर थेट मनाला भिडणारे संवाद आहेत, त्यातील मला आवडलेले काही संवाद पुढे देतेय.

– ‘मनुष्य काय केवळ दरवाजातून आतबाहेर करतो का?  पुष्कळदा तर घरात आलेला माणूसही आपल्या मनात पोहचलेला नसतो आणि दूरचा-घरापासून कितीतरी दूरचा आपल्या मनाच्या तळाशी असतो. सर्व दरवाजे ओलांडत तो येतोच.’

– ‘किती जवळ असतात माणसं एकमेकांच्या तरीही किती दूर. एकाच्या वादळाची दुसऱ्याला साधी कल्पनाही नसते. नात्यांचं उद्ध्वस्त मोहेन-जो-दडो सांभाळत हसतखेळत जगत राहणं म्हणजे केवढं ओझं!’

– ‘मागे जाऊन काळ पुसता येत नाही अन पुढे जाऊन, जाणता येत नाही; या मधल्या असहाय दुबळेपणालाच वर्तमान म्हणतात.’

– ‘अंदाजाला फक्त खरं किंवा खोटं असण्याचं बंधन नसतं आणि अंदाज करणाऱ्याला घटनेच्या मुळाशी जाण्यात स्वारस्य नसतं.’

– ‘अपेक्षाभंगांचं खत घातल्याशिवाय माणूस नावाचं रोप परिपक्व होतंच नाही का?’

– ‘एकाकी बायकांची दुःख ह्या कथा-कादंबरीवाल्यांनी आणि सिनेमावाल्यांनी अश्रूंच्या तोरणाने सजवून मांडली, व जिच्यावर अमर्याद प्रेम आणि प्रेमच केलं, अशा स्त्रीवाचून-पुरुषाची काय अवस्था होते हे कुणी मांडलंय आठवत नाही.

– ‘स्त्री-पुरुषांच्या विभक्त होण्याची कारणं फक्त वरवर शोधली जातात. पुरावे फक्त दिसणारे लागतात, पण या सगळ्या पांढऱ्याफटक दिवसाखालून एक जळजळीत रात्रही वाहत असतेच. दिवसाच्या भौतिक व्यवहारी धावपळीला समाधानी रात्रीचा किनारा नसेल, तर सगळं पारा उडालेलं वाटू लागतं.’

– ‘दोन अनोळखी प्रवाशांनी बसस्टॉपवर नुसतं वाट पाहत राहावं. वाट पाहता पाहता उगीच आपली नजरानजर, पण बघताच ओळखीचा पारा चमकतच नाही. नवरा-बायकोचं नातं जेव्हा इतकं अनोळखी होऊन जातं तेव्हा पुनर्शोध घ्यायलाच हवा.’

©अश्विनी सुर्वे.

पुस्तक विकत घेण्याची लिंक इथे देत आहे.

प्रवीण दवणे सरांच्या इतर प्रसिद्ध पुस्तकांची नावं  खालील प्रमाणे

Comments

2 responses to “द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी”

  1. Rani Rahul Avatar

    खुप सुंदररित्या मांडला आहे द्विदल चा आशय अशी कितीतरी संसार असतील ज्यांना आता नातं तोडता ही येत नाही आणि त्यात राहता ही येत नाही अप्रतिम पुस्तक आहे मी वारंवार वाचते प्रत्येक वेळी नव्याने कळत.

Leave a Reply to Rani Rahul Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *