ढाक बहिरी ट्रेक आणि आमचा पुनर्जन्म..!

पुनर्जन्मावर तुमचा विश्वास नसेल..माझाही नव्हता पण कालच्या “ढाक बहिरी ट्रेक” च्या आधीपर्यंत.

शुक्रवार म्हणजे आमचा नवीन ट्रेकच्या प्लॅनिंगचा दिवस. बऱ्याच दिवसापासून bucket list मध्ये असलेला “ढाक बहिरी” ट्रेक करायचा फायनल झाला..

आम्ही ५ जण ठरल्याप्रमाणे सकाळी ४.२७ ला CST वरून कर्जतला जाणारी ट्रेन पकडून निघालो..तिथून ७ ची बस पकडून आम्ही सांडशी गाव म्हणजे ढाक बहिरीच्या पायथ्याच्या गावी निघालो.. पहाटे धुकं पसरल होत. वातावरणातील गारवा सगळ्यांचाच उत्साह वाढवत होता. ३०-४० मिनिटात आम्ही सांडशीला पोहोचलो.. बस स्टॉपच्या शेजारच्याच घरात एका काकूंना विनांती करून आम्ही जेवणाची सोय केली..चहा पोहे खाऊन दुपारी १.३० पर्यंत जेवायला येऊ असा सांगून आम्ही निघालो. जाता-जाता एका गावकऱ्याने guide साठी विचारणा केली आणि आम्ही ती नाकारली..जी आमची सगळ्यात मोठी चूक झाल्याची प्रचिती आम्हाला थोड्याच वेळात येणार होती.

८.२६ वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. शेतातुन जंगलाकडे जाण्याच्या वाटेवर अनेक गावकरी भेटले, आणि प्रत्येकजण काळजीने एकच वाक्य बोलले..”सांभाळून या रे पोरंनो.” खरच हे गावची लोक किती प्रामाणिक आणि प्रेमळ असतात. शेत संपून जंगलात शिरतानाची वाट बरेच महिने बंद असल्याने पूर्णतः गायब झाली होती. सगळीकडे आमच्या उंचीपेक्षा जास्त उंच गवत वाढले होते. पहाटे गवतावर पडलेल्या दवामुळे आमचे कपडे आता पूर्ण ओले झाले होते. बुजत चाललेली वाट एका छोट्या ओढ्यापर्यंत गेली. आणि ओढ्यापलिकडे काहीच वाट दिसत नव्हती आणि हीच आमच्या भराकटण्याची “नांदी” होती.

आम्ही जंगलात उभी चढाई करून अंतर कापण्याचा निर्णय घेऊन चढाई सुरुवात केली. उत्साह पुरेपूर असल्याने आम्ही जोमाने ट्रेक करत होतो. समोर ढाकचा कडा तोऱ्यात उभा राहून आम्हाला चेतावणी देत होता, आम्ही घनदाट जंगल आणि कडेकपारी तुडवत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्यातील नारायण हा पाहिल्यांदाच ट्रेकवर आलेला. आणि आम्ही चढत असलेले रॉक पॅच कोणत्याही “treking equipment” विरहित असल्याने अवघड तर होतेच..पण जीवघेणे वाटत होता. हा रॉक पॅच संपवून परत जंगल सुरू झालं. मी मनातच देवाचा नाव घेऊन वाट सापडुदे असं म्हटलं..आणि पटणार नाही पण चार पाच पावलानंतर अचानक समोर आडवी जाणारी वाट! मनातच देवाचे आभार मानून आम्ही वाट पकडली. आता १०-१०.१५ वाजले होते. आम्ही वाट पकडून चालू लागलो, पण वाट गडाला समांतर असल्याने नक्की कोणत्या दिशेने जायचं कळेना. पहिल्यांदा उजव्या दिशेला काही अंतर चालून आम्ही कदाचित खालच्या दिशेला चाललोय अशी समज करून माघारी फिरून डाव्या दिशेला पायपीट सुरू केली. हि आमची दुसरी मोठी चुक.

वाट सापडल्याने सगळेच खुशीने गाणी वैगरे म्हणत चाललेलो.. वाट कड्याच्या बाजूने अनेक धबधबे ओलांडत चाललेली. आम्हीही नयनरम्य दृश्यांचा आनंद लुटत फोटोग्राफी करत मजेतच चाललेलो. ११.३० वाजून गेलेले. वाट काही गडाच्या जवळ नेण्याच नाव घेत नव्हती. शेवटी नळीची वाट पकडून वर जायचा ठरवलं. पुन्हा खडतर प्रवास सुरु झाला. ३५०-४०० फूट ची दगडांतून आणि मोठाल्या खडकातून जाणारी वाट तुडवून झाल्यावर एक मोठा कडा ‘आ’ वासून आमच्या समोर उभा.. जो कडा equipment शिवाय चढण अशक्य होतं. भर दुपारच्या उन्हात खडक तापले होते. Cave पासून बराच लांब असल्याने हा पॅच चढून कड्यापर्यंत पोचून कड्याच्या कडेने cave पर्यंत पोचण्याचा ठरवून आम्ही तो रॉकपॅच चढाईला सुरुवात केली.

मागे दरी तर समोर उंच कडा.. आणि आम्हाला हे दिव्य पार करण आता गरजेचं होतं.

एकमेकाला सपोर्ट करत आम्ही तो कडा पार केला.. मुख्य कडा अजूनही लांबच दिसत होता. परत घनदाट जंगल आम्ही चढू लागलो. आता १२.३०-४५ झाले होते. निसरड्या मातीचा एक 300-350 फुटांचा कडा आता आम्हाला चढायचा होता. प्रत्येक वेळी जास्त आव्हानात्मक होत जाणारा रस्ता आता तेवढाच जीवनघातक बनत चालला होता. मागे खोल दरी आणि तो निसरडा कडा आम्ही दोन्ही हात अक्षरशः मातीत रोवून चढू लागलो. सुकलेला कमजोर चारा सोडून पकडण्यासाठी काहीच आधार नव्हता. खाली उतरूच शकत नसल्याने वर जाण भाग होत. कसातरी आम्ही हा पॅच पार करून एका खडकपाशी येऊन पोचलो.. आणि आता आमचा निर्णय पक्का झाला की रेस्क्यूसाठी आपल्याला कोणालातरी बोलवावं लागेल. गावातील कोणाचाच कॉन्टॅक्ट नंबर नसल्याने आता कॉन्टॅक्ट करण पण अशक्य होतं. मी काहीही करून रेस्क्यू साठी मदत मागवेन..असा आश्वासन देऊन सर्वाना उरलेला शेवटचा आणि सगळ्यात जास्त खतरनाक आणि जीवघेणा कडा पार करूया अशी विनंती केली.

आम्ही ज्या खडकाच्या कपारीत होतो तिथून खाली उतरून जाण म्हणजे डायरेक्ट दरीत पडून आत्महत्या करण्यासारख होत.. आणि तिथून वर चढण हेही आत्महत्येपेक्षा कमी नव्हत.

खडकांच्या कपारीतून गीतेश ने लीड करावं आणि मी सगळ्यात मागे राहून नारायण आणि ध्रुव ला सपोर्ट करण्याचा ठरवून आम्ही शेवटचा टप्पा पार करण्यासाठी तयार झालो. १.३० वाजला होता. सूर्य आग ओकत होता. खडक तापले होते. पाणी संपत आल्याने बॉडी dehidrate झाली होती. अशात आम्ही मनातील सगळी जगण्याची ईर्षा एकवटून चढण्यासाठी सज्ज झालो. गीतेश लीड करत होता. प्रतीक, नारायण, ध्रुव आणि सगळ्यात मागे मी असे आम्ही चढू लागलो. पण काहीच मार्ग दिसत नव्हता. थोडा थोडा सरकत आम्ही शक्य ते सगळे वर जाण्याचे मार्ग शोधू लागलो. एका कापरितुन आम्ही बसूनच हळू-हळू पुढे सरकू लागलो. एकच मार्ग होता आता वर जाण्यासाठी.. म्हणजे adventure म्हणून आम्ही केलाही नसता.. पण मरणाच्या भीतीने तो आम्हाला पार करण भाग होता. जवळ जवळ १५० फुटांचा कसलाच आधार नसलेला तो कडा आम्ही पार करण्यासाठी प्राणांची बाजी लावली. आता आम्हाला एक असा टप्पा पार करायचा होता जिथे एक खडकाचा थोडासा भाग तुटून पडला होता. त्यावर उभा राहून ५.५-६ फूट चा उभा कडा बाजूच्या २ इंच खाचीत पायाची बोट रोवून चढायचा होता. हि कल्पनाच ऐकून नारायण फक्त रडायचा बाकी होता. पूर्ण कडा अजिबात उभा राहून न चढलेल्या नारायणला तो पोरशन फक्त उभा राहून नाही तर संपूर्ण अंग ५.५ फूट तळहाताच्या जोरावर वर झोकून पार करायचा होता. गीतेश आणि प्रतीक आम्ही त्या पोरशनपर्यंत पोहचेपर्यंत ४५-५० फूट वर होते. नारायणला मी त्या खाचीत चढवला. त्याच्यामागे ध्रुव चढला आणि त्याखाली मी.आणि माझ्याखाली ६००-७०० फूट खोल दरी. त्या १०-१२ फुटांच्या उभ्या रॉकपॅच मध्ये आम्ही तिघे दहीहंडी च्या पोज मध्ये होतो. नारायण ला सपोर्ट करत त्या अवघड खचित ध्रुव, तर ध्रुवचे पाय त्या खडकावर रोखण्यासाठी मी माझे दोन्ही हात त्याच्या पायाच्या खाली खडकावर दाबून धरले होते.

मी एका खडकाच्या तुटलेल्या धारधार भागावर अनवाणी उभा असल्याने होणारा त्रास सहन होत नव्हता. एवढ्यात गीतेशचा इशारा देणारा आवाज आला “watch out”.. ४५-५० फूट आमच्या डोक्यावर असलेल्या गीतेशच्या पायाखालून सरकलेला नारळाच्या size चा दगड वरून आमच्या दिशेने येताना दिसला..जणू काळच तो.

मृत्यूच जिवंतपणी दर्शनच ते. एक-दिड फुटाच्या अंतरावरून तो दगड थेट दरीत गेला. मृत्यूची थोडी चुकामुक झाली..पण संकटं अजून पाठ सोडत नव्हती. ध्रुवने जोर लावून अक्षरशः नारायणला त्या पॅच वरून वर ढकलला. एक चूक आणि आम्ही तिघे दरीत अशी अवस्था होती. नारायणने ते पार केल्यावर आता मी ध्रुवच्या जाग्यावर..आणि ध्रुव नारायणच्या जाग्यावर जाऊन पुन्हा ते थरार नाट्य सुरू झाला..पण आता आम्हाला दोघांनाच हा “प्रवेश” संपवायचा होता. ध्रुवच्या पायात डोकं घुसवून मी त्याला वर ढकलला.. तिथे पोचल्यावर मात्र ध्रुवचे हात पाय सटकु लागल्याने तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला.. मृत्यने चालवलेला हा खेळ आता खेळवत पण नव्हता आणि बघवत पण नव्हता. गीतेश ने प्रसंगवधान दाखऊन खाली येऊन कंबरेतील बेल्टच्या सहाय्याने त्याला वर खेचला. तो प्रसंग एवढा भयानक होता की आता लिहिताना पण माझे हात थरथरताहेत. आता फक्त मी मागे राहिलेलो..आणि ना मला कोण मागे सपोर्ट द्यायला होता..ना पुढे खेचून घ्यायला कोण होता..

विझणारा दिवा जसा शेवटी मोठयाने पेटतो, तीच माझी अवस्था झालेली.

अंगात असलेली नसलेली सगळी शक्ती एकवटून मी तो पार केला. सुटकेचा श्वास टाकून आता एक १५० फूटाचा जंगलाचा शेवटचा पॅच पार केला की आम्ही मुख्य कड्यापाशी पोहचणार होतो. तिथे पोहचल्यावर पहिल सगळ्यांनी मला रेस्क्यू साठी कॉन्टॅक्ट करायला लावला. मी खरच मनापासून आभार मानेन आज vodaphone चे. कारण एवढ्या घनदाट जंगलाच्या ठिकानी मला 4G नेटवर्क होत. मी वोडाफोन ची जाहिरात नाही करत आहे. पण त्यांच्या उल्लेखशिवाय ही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. कारण जर आम्हाला तिथे नेटवर्क नसतं तर आम्ही कुणाशीच कॉन्टॅक्ट करण शक्य नव्हतं. मी Google वर search करून स्थानिक police station चा नंबर मिळवला.. कॉन्टॅक्ट केला.. रामदास तुरडे साहेब line वर होते. घडलेला सर्व प्रकार सांगून आम्ही मदत मागितली. त्यांनी लगेच प्रयत्न सुरू केले. आम्ही लगेच आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या सर्व adventure ग्रुप्स ना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. सह्याद्री रेंजर्सचे अभिषेक मुळे याना कॉन्टॅक्ट केला. खूप काळजीपूर्वक परिस्थिती समजून घेत, आवश्यक सल्ले देत त्यांनी लगेच रेस्क्यू साठी सूत्र हलवायला घेतली. आमच्याकडे आता फक्त १००-१५० ml पाणी शिल्लक होत. ४ वाजले होते आणि जवळपास कुठेही पाणी नसल्याने तेवढ्याच पाण्यावर रेस्क्यू टीम येईपर्यंत भागवायच होत. एवढ सगळं पार करून १.३० नंतर डायरेक्ट ४ वाजता आम्ही एक एक बॉटल चा झाकण भर पाणी प्यायलो.. आणि पुढचे कितीतरी तास आता आम्हाला हेच करायचा होता.

एक्साक्ट लोकेशन समजावी म्हणून मी satellite location सगळ्या संबंधीत व्यक्तींशी share केली.. थोड्याच वेळात पोलीस रामदास तुरडे ह्यांचा कॉल आला.. गावातून २ लोकल लोक मदतीसाठी पाठवल्याची त्यांनी कल्पना दिली. अभिषेक मुळेंनी “शिवदुर्ग लोणावळा” याना संबंधीत घटनेची खबर दिली. “शिवदुर्ग लोणावळा” ची ५ लोकांची टीम लोणावळा वरून रावना झाल्याचं त्यांनी कळवलं. रोहित वर्तक, प्रवीण देशमुख, आणि अजून ३ लोक. ज्यांची नाव नाही कळली पण आमच्यासाठी ते “देवदूत” होते.

पाणी नसल्याने बॉडी dehidrate झाल्यानं panic होण्याची नैसर्गिक लक्षणं जाणवू लागली. तरीही rescue साठी सोयीस्कर व्हाव म्हणून काळोख पडण्याआधी सुरक्षित ठिकाणी ढाक बहिरी cave च्या जवळपास पोचण्यासाठी कड्याच्या कडेकडेने जंगल तुडवत आम्ही निघालो. तासभर पायपीट करून झाल्यावर “kalkrai pinacle आणि ढाक cave” चा दर्शन झालं. आम्ही आता cave पासून जवळ जवळ १ किलोमीटर दूर होतो. ६.३० झालेले. सूर्य मावळत चाललेला. मिळेल तेवढा अंतर कपायच ठरवून आम्ही cave च्या दिशेने सरकत राहिलो. एव्हाना बॅटरी लो झाल्याने माझा फोन बंद झाला होता. बऱ्याच लोकांचे रेस्क्यू update साठी फोन येत होते. १५ मिनिटातच सूर्य पूर्णतः मावळला. आत्ताच अमावस्या होऊन गेल्याने अंधार खूप गडद होता. अंधारचा राज्य सुरू झाला. गडद अंधार.. आणि त्यात घाबरलेली, थकलेली ५ शरीरं कड्याला टेकून मदतीची वाट बघत पडली होती. ७.२५ च्या दरम्यान जंगलात आम्हाला टॉर्च चा प्रकाश दिसला. आमच्या सगळयांच्या चेहऱ्यावरचा आनंद काळोखात सुद्धा स्पष्ट दिसत होता. आम्ही जोरात ओरडून आणि मागच्या अक्राळ विक्राळ कड्यावर मोबाइल टॉर्चचा प्रकाश टाकून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण समोरून काहीच रिप्लाय न आल्याने निराश होऊन आम्ही परत बसलो. हा प्रकार पुढील अर्धा तास चालूच होता.

“मृगजळ” शब्दाचा खरा अर्थ मला तेव्हा गवसला.

७.३० वाजून गेले होते. समोरच्या गडद काळोखात यमराज तर मागे अभेद्य कड्यामध्ये साक्षात भैरवनाथ.. खरंतर याच दोघांच युद्ध चाललेल. आम्ही फक्त माध्यम होतो. पण शेवटी ते राज्य भैरवनाथाच होतं आणि विजय भैरवनाथाचाच पक्का होता. कारण आता भास नाही, तर खरेखुरे देवदूत “हरिश्चंद्र ठोंबरे आणि प्रकाश” टॉर्च फिरवत आमच्या शोधात १००-१५० फुटांवरच्या दरीत आम्हाला दिसले..आम्ही नकळतच उभे राहून, ओरडून मोबाइल फ्लॅश चालू करून लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न चालू केले. यावेळी मात्र त्यांनी आम्हाला पाहिले. अवघ्या ५ मिनिटात ती मुलं ती दरी चढत आमच्याजवळ पोहोचली.

जीव भांड्यात पडणं वैगरे जे काय म्हणतात ते झाला. आम्ही बॅग वैगरे लावून तयारच होतो. पाणी न आणल्याने थोडे निराश झालो. पण २-३ कडे उतरून जंगलात पोचल्यावर झऱ्याच पाणी मिळेल अस हरिश्चंदराने बोलल्यावर आम्ही लगेच दरी उतरायला घेतली. ८ वाजता उतरणीला सुरुवात केली. एक कडा उतरवताना हरिश्चंद्र चक्क ५ वेळा प्रत्येकाला उतरवण्यासाठी खालून वर आला. पूर्ण काळोख असल्याने फक्त टॉर्च च्या प्रकाशात जेवढं दिसत होता तेच उतरायचा असल्याने. दरी असूनही दरीची भीती वाटत नव्हती. असे ३ रॉक पॅच उतरून आता आम्ही जंगलात पोचलो. काही वेळात आम्हाला वर कलकाराई टोकाजवळ ३-४ टॉर्च चमकताना दिसल्या. लोणावळ्यावरून निघालेली “शिवदुर्ग लोणावळा” ची रोहित वर्तक, प्रवीण देशमुख आणि त्यांची टीम तिथे पोचली होती. त्याना आमच्या टॉर्च च्या लाईट्स दिसल्यावर हाक मारल्या. आम्ही प्रतिसाद दिला, पण ते बरेच उंचावर व आम्ही जंगलात असल्याने आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता. कदाचित गावकरी असतील व आम्ही अजूनही फसलेले असू म्हणून ते लोक कड्याच्या दिशेने आम्हाला शोधत पुढे सरकत होते. थोड्या वेळाने आमचा फोन वाजला. त्यांनी आपण आल्याची व जंगलात टॉर्च दिसल्याच आम्हाला बोलले. आम्हीच गावकऱ्यांसोबत उतरत असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी तिथून निघत असल्याचा बोलून निरोप घेतला. तिथून पाणवठ्यापर्यंत पोचायला आम्हाला १०.४७ वाजले. ६-७ तासंपासून कोरडा पडलेल्या घशाला पाण्याचा स्पर्श होताच सगळे तृप्त झाले. सकाळी ८.२० वाजल्यापासून सुरू असलेली पायपीट १० मिनिट पाणवठ्यावर विश्रांती घेऊन पुन्हा सुरू झाली.

रात्री १.३० वाजता १६ तास अखंड खडतर ट्रेक करून शेवटी आम्ही सांडशी गावातील त्या काकूंच्या घरी पोचलो. ज्यांना आम्ही दुपारी १.३० वाजता जेवायला येतो अस बोललेलो. खरच त्या काका काकूंचे आभार मानवे तेवढे थोडे, कारण झोपलेले असताना सुद्धा रात्री १.३० वाजता उठून आम्हाला त्यांनी जेवण दिल. कसलीही नाराजी न दाखवता अगदी काळजीने, प्रेमाने त्या दाम्पत्याने आम्हाला जेवण वाढल. गरम गरम भाकरी आणि चिकन वर ताव मारला. काकांनी आम्हाला अंथरून पांघरून दिला आणि समोरच असलेल्या अवाढव्य “ढाक बहिरी” कडे बघत आम्ही शांतपणे शरीर अंथरुणावर झोकून दिली. सगळ्यांच्या डोक्यात एकाच विचार होता…

“आम्ही खरच जिवंत आहोत की हा पुनर्जन्म..!”

खरच आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढणाऱ्या त्या सगळ्या माणसांचे आभार कसे मानावे कळत नाहीये. पण त्या सर्व देवदूतांचा उल्लेख करणं मी माझा कर्तव्य समजतो.

सगळ्यात पहिला कॉन्टॅक्ट झालेले कर्जत पोलीस स्टेशनचे रामदास तुरडे, काळजीपूर्वक वेळेचं भान राखून तातडीने मदतीची चक्रे फिरवणारे अभिषेक मुळे सर, यशवंत दिडवाघ, शिवदुर्ग लोणावळाचे रोहित वर्तक, प्रवीण देशमुख, दिनेश सुने आणि बाकी सर्व लोक. (माफ करा काही लोकांची नाव माहीत नाहीत) आणि आम्हाला मरणाच्या दाढेतून प्रत्यक्ष बाहेर काढणारे देवदूत ” हरिश्चंद्र ठोंबरे आणि प्रकाश.” आम्ही आपले जन्मभर ऋणी राहू..

 


महेश

मुळचा कुडाळचा. इल्यूस्ट्रेटर, डिजायनर म्हणून काम करतो. ट्रेकचा भारी नाद. जे.जे. मधून कलेचं शात्रोक्त शिक्षण घेतलेला. आवडेल तो रस्ता धरून चालत राहणं हा त्याचा स्वभाव, आणि ह्या प्रवासात त्याला आलेले अनुभव लिहिणे हि त्याची आवड.

 

Visit Facebook Profile

Related Posts

Leave a Reply