dahajani by ratnakar matkari marathi blog

दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही

“चूक तुझी नाहीये, गोपाळा -” मी जरा सौम्यपणे म्हटलं. “चूक तुझ्या नस्त्या वेडगळ नीतिकल्पनांची आहे त्या कल्पनांनी तू स्वतःला जखडून घेतलयस, म्हणून हातपाय हलवू शकत नाहीयेस! मुलगी आपली आहे! तिचा छळ होता, सासरी पटत नाही, तर मग तिला घरी परत आणली पुढं तिची काही प्रगती होईल, असं पाहिलं- हे सगळ शहाणपणाला धरून आहे की नाही? पण ते करायला तुमची डोकी सरळ विचार करू शकतात का? निव्वळ, मुलगी आणि तिचं सुख एवढंच तुम्ही पाहू शकता का? तर नाही- या एवढ्या दोनच खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी सोडून तुम्ही बाकीच्या शंभर गोष्टींना महत्त्व देणार! लोक काय म्हणतील? याची मुलगी माघारी आली, म्हणून आपल्याकडे बोट दाखवतील! नंतर मुलीचा संसार होणार नाही! धाकटीच लग्न होणार नाही! यंव नि त्यंव! मग स्वतःच्या सासूच्या कलानं घे, नवऱ्याच्या लाथा खा! दिल्या घरी तू सुखी राहा आणि हे कर नि ते कर! हा नामर्दपणा कुणाचा? तुझाच की नाही?”

रत्नाकर मतकरींच ‘अ‍ॅडम’ शोधताना हे ‘दहाजणी’ पुस्तक दुकानात दिसलं. सहज म्हणून उघडलं आणि वरचा परिच्छेद वाचण्यात आला. चपराक बसावी, डोळे खाडकन उघडावेत असे स्पष्ट विचार इतक्या सहजसोप्प्या शब्दात मांडलेत मतकरी सरांनी की पुस्तक पुन्हा रॅकवर ठेववलंच नाही. घरी येऊन सुरुवातीपासून वाचायला घेतलं. पुस्तक हातातून सोडवत नसतानाही प्रत्येक कथेनंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी लागत होती; ती कथा आणि त्यातले विचार मनात रुजवायला, त्यांची उजळणी करायला.

तशा या कथा ८० सालातल्या. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८५ मध्ये आली. मतकरींनी या १० कथा त्याआधी काही वर्ष लिहिल्या होत्या. पण तरीही त्या जुन्या काळातल्या वाटत नाहीत, याची खरं तर खंत वाटते.

दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने मांडलेल्या मनोगतात मतकरी सर लिहितात की, ‘शेवटी प्रश्न असतो तो परिस्थितीने निर्माण केलेल्या असहायतेचा, त्यातून जाणवणाऱ्या एकाकीपणाचा. वर्षे गेली तरी हे मूलभूत प्रश्न कायमच आहेत. कायम राहू नयेत पण राहतील.’

खरंच, या कथांमधील संदर्भ बदलले असतील. नऊवारी वरून सहावारी किंवा ड्रेस/जीन्स असे बदल झाले असतील पण प्रवृत्ती?.. ती फार नाही बदलली. वरती दिलेल्या परिच्छेदात सांगितलंय तश्या घटना आजही आजूबाजूला घडताना दिसतात आणि सुन्न व्हायला होतं.

वरती दिलेला परिच्छेद या पुस्तकातील ‘चुलीतच जळायचं’ या दीर्घकथेतील आहे. त्या कथेवर आधारित ‘अग्निदिव्य(१९८४)’ हे नाटक देखील मतकरींनी लिहिलंय.

काही लोकं अशी का वागतात? दुसऱ्यांना त्रास देण्यात त्यांना कसला आनंद मिळतो, अशा प्रश्नांचं उत्तर या ‘चुलीतच जळायचं’ या कथेतच आहे.त्यातील सोपारकर म्हणतात, ‘मला तर याला एकच कारण दिसत होतं, त्या दोघांच्या स्वभावातील विकृती. जिथं तिथं आपण पटण्यासारखी कारणं शोधण्याचा खुळेपणा करतो. पण खूप गोष्टी विनाकारणच असतात. विकृती म्हंजे विकृती! तिथं कसलं आलंय कारण? काही माणसं राक्षसी असतात आणि दुसऱ्यांना छळण्यात त्यांना आसुरी आनंद मिळतो, एवढंच खरं!’

मला माझ्या आजूबाजूला अशा घटना घडताना आजही दिसत आहेत, कदाचित त्यामुळे या कथेने मला जास्त अस्वस्थ केलं. मतकरी सरांची ही कथा वाचून अजूनही काही बदल होईल, याची आशा वाटली त्यामुळे त्याबद्दल जास्त लिहितेय.

पण पुस्तकातील या दहा कथा फक्त स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या कथा नाहीत. समाजातील विविध मनुष्यस्वभावाची अनंत रूपं या दहाजणींच्या आयुष्यातून दिसतात. इतक्या खोलवर जाऊन ही मनं टिपणाऱ्या आणि तितक्याच सहजतेने मांडणाऱ्या रत्नाकर मतकरींच्या प्रतिभेला मनस्वी अभिवादन. समाजाच्या विविध घटकांच्या जागी जाऊन त्यांच्या मनाचा वेध मतकरी सरांनी, संवादातून, स्वगतामधून अतिशय सरलपणे मांडला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्या कथेतील स्त्री पात्रांपेक्षा काही पुरुष पात्रांची व्यथा किंवा द्विधा मनस्थिती आपल्याला त्यांच्या जागी जाऊन विचार करायला भाग पाडते.

‘इरावती सोमण’ या कथेतील, सगळीच माणसं चांगली असतात या समजुतीपायी चोरीच्या आरोपात फसलेले कीर्तने, ‘चंद्राक्का’ कथेतील एरव्ही मुलांशी कायम कडक शिस्तीत वागणारे पण मुलगा घर सोडून जाण्याच्या कल्पनेने धास्तावून, व्याकुळ होऊन रडणारे नाना, ‘सुंगधा कदम’ कथेतील वेणीमाधव, ‘उपरीची गाथामधील’ विनायक आणि ‘चुलीतच जळायचं’ मधील सोपानराव अंतर्मुख करून जातात.

त्याचप्रमाणे कुत्रिम अवयव केंद्रातील ‘सुंगधा कदम’ आणि ‘ओ पी डी : बी के ६६|७९’ या सुगंधा व नीलिमाच्या कथा आपल्याला वेगळीच दुनिया दाखवतात. ‘कांगारू’ मधील घटस्फोटीत आईची होणारी ओढाताण, ‘भगिरथीची पाठवणी’ ही कुष्ठधामातील म्हातारी आई, तिला घरी न्यायला नकार देणारा मुलगा आणि डॉक्टरची कथा, स्वातंत्र्यानंतरच्या काळात जेव्हा महिलांनी नोकरी करायला सुरुवात केलेली तेव्हा गुलामासारखीच नोकरी करणाऱ्या ‘इरावती सोमण’ची कथा, महिलाश्रमातील निराधार महिलांना आधार देणाऱ्या संचालक आणि त्यांची वेडसर मुलगी यांची ‘दोघी’ ही कथा, ज्याच्यावर प्रेम करतो त्याला फक्त एकदा भेटण्यासाठी, पाहण्यासाठी गंभीर परिस्थितीतही थेट रशियातून भारतात येणारी ‘लू’, अशा कथांमधून स्त्रीमनाची, त्यांच्या सभोवतालची विविध भावविश्व रत्नाकर मतकरींनी इतक्या तपशिलात चितारली आहेत, की त्यातल्या व्यक्तिरेखा, प्रसंग जसेच्या तसे आपल्या समोर उभे राहतात.

आपल्या मनातील नीतीमत्तेच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाबद्दलही मतकरींनी फार सुरेख लिहिलंय. या कथेवरही ‘खोल…खोल पाणी, १९८३’ हे नाटक आधारित आहे. पुस्तकातील ‘चंद्राक्का’ या कथेत हे पुढील विचार आहेत.

‘कधीकधी मनात येतं, की ज्याला आपण नीती-नीती म्हणतो, ते खरं असतं तरी काय?

नीतीची व्याख्या काळाप्रमाणे बदलते म्हणतात; तर तेही खरं नाही. एके काळी ज्या गोष्टी लाजतबुजत करत, त्या आज उजळ माथ्यानं करतात. पण हेही तितकंसं खरं नाही. कारण आजही जे करणं शिष्टसंमत नाही, असं बरचसं त्या काळी केलं जायचं. अगदी वाजतगाजत नव्हे. पण चारचौघांना माहिती असायचं. कधीकधी लोक त्याविषयी बोलायचे; बहुतेक वेळा कानाडोळा करायचे, समजून घ्यायचे. त्या माणसाच्या जगण्याचा तेवढा भाग ‘आपल्याला काय करायचं’ म्हणून बाजूला काढायचे, आणि बाकीच्या गोष्टींपुरता त्याच्याशी संबंध ठेवायचे. आत्ताही बरंचसं तसंच करतात. मग बदल बदल म्हणायचा तो काय? तेव्हा, जगाच्या नीतीच्या कल्पना काळाप्रमाणे बदलतात की नाही, कोण जाणे! पण निदान, व्यक्तीच्या बदलतात – वयाप्रमाणे!’

मी अजूनतरी या पुस्तकातील कथांमधून, त्यातील व्यक्तीरेखांमधून बाहेर आलेले नाहीये कारण दैनंदिन जीवनातही त्यातलं कोण ना कोण दिसत राहतं,भेटत राहतं.

पण रत्नाकर मतकरी सरांचं हे पुस्तक इतक्या उशिरा वाचतेय, याची खंत मात्र मला कायम राहणार आहे. त्यांनी मनोगतात लिहिलंय की, ‘सुमारे अडीचशे कथा लिहूनही, मी कथा लिहितो हेच ज्यांना माहीत नाही, किंवा केवळ गूढकथा लिहितो, असेही ज्यांना वाटते, त्यांच्या हातात ‘दहाजणी’ सारखा कथासंग्रह पडणे आवश्यक आहे.’ खरंच, जमलं तर हे पुस्तक नक्की वाचा, एका वेगळ्या अनुभूतीसाठी. दुसऱ्यांच्या जागी जाऊन विचार करावा, असं आपण ऐकत/बोलत असतो. काय माहीत या पुस्तकामुळे कदाचित ते कृतीत उतरवता येईल.

अश्विनी सुर्वे. 

टीप –  अ‍ॅडम देखील मिळालंय. त्याबद्दल मी लिहावं असं तुम्हाला वाटत असेल तर खाली कॉमेंट मध्ये कळवा.

सोबत ऑनलाइन पुस्तक विकत घ्यायची लिंक देत आहे.

रत्नाकर मतकरींच्या इतर पुस्तकांची माहिती खालील प्रमाणे

 

 

Comments

2 responses to “दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही”

  1. Rajkumar Pandit Avatar

    अश्विनी मॅडम, खूप चांगला उपक्रम राबवताय तुम्ही. चांगली पुस्तके वाचावीत सर्वांनी यासाठीचा हा स्तुत्य प्रयत्न. मी देखील प्रयत्न करेन जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्याचा. रत्नाकर मतकरींच्या ‘दहाजनी ‘चे उत्कृष्ट रसग्रहण.

  2. Charusheela Agashe Avatar

    वा, सुरेख परीक्षण, मी देखील गूढकथा च वाचल्या आहेत त्यांच्या . पण हे वाचेन नक्कीच

Leave a Reply to Rajkumar Pandit Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *