Atal dukhatun sawartana marathi pustak yashwant Ho marathi blog marathi motivation

अटळ दुःखातून सावरताना

मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

नाव ऐकूनच या पुस्तकात काय असेल किंवा हे पुस्तक आपल्याला कसं मदत करेल, याची मला उत्सुकता होती. खरं तर असं पुस्तक असेल असं वाटलंही नव्हतं. म्हणजे मानसोपचार तज्ञांची ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर अनेक पुस्तकं आहेत किंवा मरणावर, मरणानंतर किंवा कर्मावर अशी आध्यात्मिक पुस्तकं देखील आहेत. पण असं जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेल्यावर होणाऱ्या दुःखातून, त्यामुळे येणाऱ्या निराशा, हतबलता, राग यांसारख्या भावनांमधून सावरण्यासाठी मदत करणारं हे एकमेव पुस्तक असावं.

मृत्यू हा अटळ आहे. ‘जन्माला आलेल्या सर्व गोष्टी संपतात’, ही गोष्ट आपल्या बुद्धीने मानलेली असते; पण मानसिक पातळीवर ती आपल्याला मान्य करायला त्रास होतो. त्यातही जर मृत्यू अचानक आलेला असेल तर त्याला स्वीकारणं फार कठीण होतं. पण ‘जर दुःख समजलं तर दुःखातून सावरणं तुलनेने सोपं जातं’ या हेतूने डॉ. संज्योत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे एक हतबलतेची आणि त्या व्यक्तीने असं अचानक जाऊन, आपल्याला एकटं सोडल्याची, फसवल्याची भावना मनात निर्माण होते. मग यातूनच गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी स्वतःला दोषी ठरवणं, त्यातून निराशा, राग वाढणं, आपलं काही चुकलं का, आता आपलं पुढे काय, असं केलं असतं तर-तसं झालं असतं तर; असे अनेक विचार मनात निर्माण होऊन अधिक त्रास करून घेतला जातो आणि शून्याची भावना निर्माण होते.

जर जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अचानक अपघातात झाला असेल तर देव, निसर्ग आणि यंत्रणेविषयी मनात अढी निर्माण होते. जर हत्या असेल तर आपल्यासोबत असं का? हा प्रश्न छळत राहतो. जर आत्महत्या असेल तर, आपण कुठे कमी पडलो, आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्यासोबत मोकळेपणाने बोलता आलं नाही याची खंत वाटत राहते. तुमच्या जवळची अशी व्यक्ती जिचा तुमच्या आयुष्यावर फार प्रभाव पडला आहे, अशा व्यक्तीच्या नसण्याची जाणीव फार भयंकर असते. दुःख समान असलं तरी दुःखाची ही स्थिती फार गोंधळाची आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. कधीकधी ही वस्तुस्थिती स्वीकारणं अतिशय कठीण आणि त्यापासून पळणं, एकटं राहणं सोप्पं वाटतं.

पण दुःखाच्या प्रक्रियेविषयी जर अधिक माहिती मिळाली तर अशा प्रसंगांना सामोरं जाताना काय अपेक्षित आहे आणि काय अपेक्षित नाही याचा अंदाज येऊ शकतो. म्हणूनच आपण सामान्यवेळी विचारही करू शकणार नाही अशा मृत्यू या विषयाच्या विविध अंगाना स्पर्श करतील असे सर्व विषय आणि त्यांना समर्पक अशी अनेक उदाहरणं आणि सत्य घटना या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत.

डॉ. संज्योत सांगतात तसं, ‘ कोणतंही दुःख मोठं किंवा छोटं नसतं. दुःख फारफार तर वेगळं असू शकतं; किंबहुना प्रत्येक दुःखाची जातकुळीही नेहमी वेगळीच असते.’

१२ वेगवेगळ्या प्रकरणांतून अतिशय संवेदनशीलतेने भाष्य करत डॉ. संज्योत आपल्याला या अंतिम सत्याला सामोरं जाण्यासाठी आणि त्यातून सावरण्यासाठी तयार करतात.

‘पूर्णविराम… की सुरुवात?’ या प्रकरणामध्ये मृत्यू ही एकच गोष्ट नाही ज्यात आपण काही गमावून बसतो हे सांगताना बदलत्या समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्थेमुळे मृत्यूकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण कसा बदलत आहे, याबद्दल लिहिलं आहे. माध्यमांतून दिसणाऱ्या मृत्यूबाबतच्या असंवेदनशीलतेवरही त्या भाष्य करतात. ‘सकारात्मक राहणं म्हणजे वास्तव नाकारणं नव्हे आणि कणखरपणा म्हणजे संवेदनशून्यता नव्हे’ हे सांगत संवेदनशीलताच कशी मृत्यूच्या घटनेला सामोरं जायला मदत करू शकते हे सखोलपणे मांडलंय.

‘आदर: जीवनाचा आणि मरणाचा’ या प्रकरणात मृत्यूशय्येवर असणाऱ्या माणसाच्या कायदेशीर हक्कांबाबत माहिती दिली आहे. जसं की, ‘जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मला जिवंत माणसाप्रमाणे वागवलं जाण्याचा हक्क आहे’ किंवा ‘माझ्या आजाराबाबत माझ्यापासून काहीही लपवून न ठेवता सत्य जाणून घेण्याचा मला अधिकार आहे’, ‘मला समजेल अशा भाषेमध्ये माझ्या आजाराचे रोगनिदान व त्यावर केलेल्या उपाययोजना समजून घेण्याचा हक्क आहे’, किंवा ‘माझ्या कुटुंबियांची मदत घेण्याचा हक्क आहे’, ‘मला अतिशय शांततेने स्वप्रतिष्ठा कायम ठेवून मरण्याचा हक्क आहे’, इ.

पुस्तकात डॉ. देशपांडेनी ‘थॅनटॉलॉजी’ (Thanatology) म्हणजे मृत्यूशी निगडित असणाऱ्या वर्तनाचा, विचारांचा आणि भावनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रासंबंधीही विस्तृत माहिती दिलेली आहे.

‘मृत्यूच्या हाका’ या प्रकरणात स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूला सामोरं कसं जायचं, याविषयी डॉ. सांगतात. त्या लिहितात, मृत्यूच्या निमित्ताने कोणत्याही नात्यातील वेदनेला, कटुतेला संपवण्याची, नात्यांमध्ये समेट घडवून आणण्याची ही एक प्रकारची संधी असते. प्रेम, क्षमा, स्वीकार, पश्चाताप, कृतज्ञता या मनाच्या तळाशी लपवून ठेवलेल्या गोष्टी उलगडण्याची, ‘मी खूप कृतज्ञ आहे’, तू माझ्यासाठी किती केलंस याची मला जाणीव आहे’, ‘मी तुला माफ केलं’, किंवा ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ अशा सगळ्या गोष्टी बोलण्याची, भावना व्यक्त करण्याची ही एकमेव संधी.

यात मृत्यू जवळ आल्यावर माणसाचं मन कसं वेगवेगळ्या ५ अवस्थांतून पुढे जातं, हे सांगितलंय. या पाच अवस्था म्हणजे, १. नकार देणे/मनाला धक्का बसणे, २. राग, ३. सौदा करणं, ४. नैराश्य, ५. स्वीकार.

‘दुस्तर वाट दुःखाची’ या प्रकरणात दुःखाची प्रक्रिया सर्वसामान्यपणे कशी असते, दुःखाचे मानसिक, सामाजिक, वर्तणूक, शारीरिक व विचारांवर होणारे परिणाम आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण नेमकं कुठे पोहोचणं अपेक्षित आहे,याबद्दल चर्चा केलेली आहे. मानसतज्ज्ञांच्या मते शोक-दुःख-grief हा असा न संपणारा, पूर्णविराम नसलेला अनुभव बनून राहतो. या प्रक्रियेतला महत्वाचा भाग असतो तो सर्व अर्थाने स्वतःच्या पुनर्बांधणीचा! त्यामुळे दुःख एका प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा नव्याने जगायलाच शिकवत असतं.

त्याचसोबत ‘दुःखाची प्रक्रिया पूर्ण व्हायला किती वेळ लागायला हवा’, ‘शेवटी काळ हेच औषध असतं का?’, तज्ञ व्यक्तीची/समुपदेशकाची मदत कधी घ्यायची, मृत्यूनंतर केले जाणारे विधी, लहान मुलांवर होणारे परिणाम व उपाययोजना यांवरही डॉ. संज्योत यांनी तरलतेने लिहिले आहे.

‘दुःख गुंतागुंतीचं होतं तेव्हा’ या प्रकरणात अनेक उदाहरणं देऊन दुःख कसं आणि कोणकोणत्या प्रकारे गुंतागुंतीचं होतं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याबद्दल माहिती दिली आहे. जेव्हा एखाद्या हानीबद्दल, घडलेल्या मृत्यूबद्दल, मोकळेपणानं बोलण्यासारखी परिस्थिती नसते, त्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल वाटणाऱ्या भावना मोकळेपणानं व्यक्त करता येत नाही, अशा वेळी दुःखं गुंतागुंतीचं होऊ शकतं.

‘निरागस दुःख’ या प्रकरणात लहानपणी झेललेले दुःखाचे घाव मुलांच्या निरागसतेचा बळी घेऊ शकतात हे मांडले आहे. बाल्यावस्था ते कुमारवयातील वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या मनात व स्वभावात कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे कसा बदल होतो, काही गमावण्याचा अर्थ लहान मुलांच्या दृष्टिकोनातून काय असतो, त्यांच्या मृत्यूच्या कल्पना आणि त्यावरील प्रतिक्रिया याबद्दल सांगताना गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत माहिती कशी द्यायची, त्यांच्या याबद्दलच्या भावनांची दखल कशी घ्यायची याबद्दल खूप सुंदररित्या लिहिलं आहे. या विषयावर लिहिल्याबद्दल डॉ. संज्योत देशपांडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण मुलांना काही समजत नाही असं म्हणत आपण त्यांच्या भावनांना नाकारत असतो, ज्याचे त्या मुलांच्या आयुष्यावर फार दूरगामी परिणाम होताना दिसतात.

अचानक होणारे मृत्यू, अपघाती मृत्यू हा आजच्या काळातला ज्वलंत प्रश्न आहे म्हणून ‘अचानक होणारा आघात’ आणि ‘अवचित दुःखाचे क्षण’ या प्रकरणांमध्ये या विषयाची माहिती दिलेली आहे.

वेगवेगळी नाती गमावण्याचा अनुभव कधीच एकसारखा नसतो. विविध नाती गमावताना माणसं वेगळ्या अनुभवांतून जातात. त्याचबरोबर एखादी व्यक्ती जाण्याचे सर्व कुटुंबावर होणारे परिणामही खोलवर असतात. त्यामुळे “दुःख नात्याच्या अलीकडले-पलीकडले” या प्रकरणामध्ये या विषयाचं विश्लेषण केलं आहे.

‘अटळ दुःखातून सावरताना’ या प्रकरणात या अनुभवाला सामोरं जाताना काय करावं याची माहिती दिली आहे. ‘दुःखाच्या वाटा’ यात केवळ मृत्यूच नाही तर विविध मार्गांनी आपण बरंच काही गमावून बसत असतो; त्यामुळे मृत्यूशिवाय इतर प्रकारे होणारं नुकसान काय आणि कसं असतं या संदर्भातलं हे प्रकरण आहे.

‘मनाची काटकता’ हे प्रकरण मनाच्या काटकपणाविषयी आहे.

स्वतःच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूला कसं सामोरं जायचं हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं आणि त्याचे वेगवेगळे गंभीर परिणाम देखील होतात. पण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर कसं व्यक्त व्हायचं, त्याच्या कुटुंबियांसोबत काय बोलायचं, कसं वागायचं हे माहीत नसल्यामुळे कळत-नकळत त्या परिवारावरही आपण दूरगामी परिणाम करत असतो. यासाठी मृत्यूला समजून घेणं गरजेचं आहे.

‘अटळ दुःखातून सावरताना’ या पुस्तकाच्या लेखिका डॉ. संज्योत देशपांडे या गेली अठरा वर्ष मानसोपचारतज्ज्ञ म्हणून पुण्यामध्ये काम करत आहेत. विवेकनिष्ठ उपचारपद्धतीचा त्या गेली अनेक वर्षे अभ्यास करत आहेत. त्याचसोबत भावनांचे नियोजन, ताण-तणावांचे नियोजन, विवेकनिष्ठ पालकत्व अशा विषयांवरील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कार्यशाळांमध्ये त्या प्रक्षिक्षक म्हणूनही सहभागी होत असतात. त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतलं. अनेक जेष्ठ मनोविकारतज्ज्ञांनी या पुस्तकाचे कौतुक केले आहे.

या पुस्तकाबद्दल डॉ. संज्योत यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असंख्य उदाहरणं देत हा विषय त्यांनी अगदी तरलतेने समजावलाय. पुस्तक वाचल्याशिवाय त्याची किती गरज आहे हे समजणार नाही.

‘मृत्यूला सामोरं कसं जायचं?’ ते ‘मृत्यूनंतर काय?’ या प्रश्नांचा आणि त्यावरील उत्तरांचा हा प्रवास तुम्हाला सांगेल की, मृत्यू ही आयुष्यात घडणारी एक घटना आहे. तिला एवढं सरळसोट, सोपं बनवणं बरोबर नाही. ती आयुष्यात घडणारी अवघड घटना आहे हे जर आपण एका पातळीवर मान्य करतो, तर त्याविषयी विचार करायचं, त्या पाठीमागची मानसिकता समजून घ्यायचं का नाकारत आहोत? आणि मृत्यूविषयी बोलणं खरंच इतकं वाईट आहे का ? मुळात या गोष्टीविषयीच इतकी भीती वाटत असल्याने आपण त्याविषयी बोलायचं टाळतो. पण या पाठीमागची मानसिकता आपण समजून घेऊ शकलो, तर या अवघड काळातून जातानाची वाट सोपी असू शकते.

पुस्तक विकत घेण्याची लिंक सोबत देत आहे


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.


मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

Related Posts

Leave a Reply

Whatsapp करा
1
मदत हवी आहे?
नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
वाचत रहा,
धन्यवाद!