लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं

मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात स्वप्नील जोशीचा एक डायलॉग आहे की, ‘आजकाल नाती का तुटतात माहितीये? कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो.’ फार अर्थपूर्ण आहे हे वक्तव्य. लव्हमॅरेज करताना आपल्याला वाटतं, की आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो पण बऱ्याच वेळा काही प्रमाणात तो फक्त एक मुखवटा असतो. एक हुरहूर असते, की आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास कुठल्या तरी बेसावध क्षणी निसटून नाही जाणार ना! आणि म्हणूनच आपल्याला आवडत असलेली व्यक्ती आपल्यापासून दुरावू नये, तिचं मन जपावं म्हणून प्रयत्न करत असतो आणि कळत-नकळतपणे त्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीला आवडेल असा एक मुखवटा पांघरतो. पण लग्नानंतर या हुरुहुरीचा शेवट होतो. जोडीदार दूर जाण्याची भीती नाहीशी होते, आपण रिलॅक्स होतो आणि बऱ्याचदा एकमेकांना गृहीत धरत अपेक्षा वाढणं सुरू होतं. मग ‘तू आधी असा नव्हतास किंवा तू चेंज झाली आहेस’, असे आरोप सुरू होतात.

यावेळी एकमेकांच्या अशा अनेक गोष्टी, सवयी, स्वभावपैलू नव्याने समोर येतात की, ‘मनाचं हे असंही रूप होतं त्या व्यक्तीचं?’ अशी कोडी नित्यनव्याने पडत जातात आणि ती मोकळेपणाने संवाद साधून सोडवली नाहीत तर अधिकच अवघडून बसतात. काहीवेळेस याची परिणीती नात्यांमध्ये कडवटपणा येण्यात किंवा कायमचं दूर होण्यात होऊ शकते. हे असं होऊ नये म्हणून नात्यांमधला पारदर्शक संवाद, विश्वास फार महत्वाचा आहे. आणि या अशा मोकळ्या संवादाला सुरुवात करण्यासाठी, आपल्या जोडीदाराला योग्यरीतीने समजून घेण्यासाठी पुढील पुस्तकं नक्कीच मार्गदर्शक ठरतील.

१. पार्टनर – वपु काळे

संसारात क्षणोक्षणी येणाऱ्या हतबलतेला कसं सामोरं जावं हे सांगणारा पार्टनर प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवा.

‘वर्तमानकाळ सांभाळ’, ‘मालकीहक्काची भावना हेच मोठं सुख’, ‘संसाराचा अर्थ अशाच एखाद्या क्षणी समजतो’, ‘पैसा मिळेल न मिळेल पण अफाट प्रेम करायची आपली शक्ती तर कुणी हिरावून घेत नाही’, ‘इतर अनेक गरजांपैकी ‘तृप्ती’ ही गरज आहे. जो गरजू आहे, त्याला व्यवहार सांभाळावा लागतो’, मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन, ‘आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं म्हणजे नरक’, ‘मुलांच्या मोठेपणाच्या व्याख्येत आई-वडिलांची एकवाक्यता नसली, सुसंवाद नसला तर मुलं गुदमरतात’,  असं सांगणारा पार्टनर स्वतः संसारात पडला नाही, पण त्यामुळे अनेकांचे संसार अलिप्तपणे पाहू शकला आणि त्याचमुळे संसाराबद्दल तटस्थपणे भाष्य करू शकला.

तशी ही देखील एक प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हे तिचे वैशिष्ट्य. फक्त या प्रेमकहाणीत त्याला ती आवडणे, त्यांचे लग्न होणे इथे कथा संपत नाही तर खरी सुरू होते. नवरा-बायको सोबतच आई-वडील, सासू, भाऊ, मुलं या नात्यांवरही वपुनीं प्रकाश टाकला आहे.

स्वतःच्या आत्मप्रेरणेवर जगणाऱ्या, काही नाती एखाद्या क्षणी किंवा आयुष्यभर अशी का वागतात आणि त्यावेळी आपण कसं वागायचं हे सांगणाऱ्या आणि, ‘लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस’ असं म्हणणाऱ्या या पार्टनरला पुस्तकातून एकदा तरी नक्कीच भेटा आणि तुमच्या जोडीदारालाही भेटवा.

२. द्विदल – प्रवीण दवणे

आपल्याला प्रचंड आवडणारं माणूस एकाएकी नकोसं का होत असेल, याचं फार समर्पक उत्तर दिलंय या पुस्तकात. लेखक लिहितात,  ‘आपलं आवडणारं माणूस कुठकुठल्या संदर्भाच्या संस्कारांनी मोठं होत आलंय याचा विचारच केलेला नसतो आपण. आपण म्हणतो – ‘पूर्ण ओळखून एकमेकांना मन वैगरे दिलं. पण ही पूर्ण ओळख किती अपूर्ण  होती याचा शोध लागण्याच्या काळालाच संसार म्हणत असावेत.’

खरंतर या पुस्तकाचा उद्देश लव्ह मॅरेज करावं की नाही, हे सांगणं नाहीये तर प्रेमविवाह किंबहुना लग्न करण्याआधी किंवा वैवाहिक आयुष्यातही विचार करणं गरजेच्या असलेल्या पण कायम दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या महत्वाच्या गोष्टी दवणे सरांनी संवादातून सहजतेने मांडल्या आहेत. पुस्तकातील अनेक संवाद आपल्याला अवाक् करतात आणि खोलवर विचार करण्यास भाग पाडतात. पुस्तकाबद्दल अधिक माहिती या लिंक वर मिळेल.

३. तो आणि ती (मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस – मराठी अनुवाद – डॉ. रमा मराठे)

संसारात किंवा रिलेशनशिपमध्येही सगळ्यात जास्त दुरावा निर्माण करणारी वाक्यं कोणती आहेत, माहितीये?  ‘तू किती भावनाशून्य आहेस!’ आणि ‘तू उगीच इमोशनल होऊन अति विचार करत बसतेस!’ ही दोन वाक्ये बहुतेककरून संसारात किंवा रिलेशनशिपमध्ये गैरसमज निर्माण करतात. समोरच्याला एकतर काहीच फरक पडत नाही किंवा काय वाटतंय हे कळायला मार्ग नाहीये, या अशा समज, गैरसमजांमुळे आणि गृहीत धरल्यामुळे नाती दुरावतात. अशावेळी आपला पार्टनर नक्की असा विचार का करत असेल याचा आपण त्यांच्या जागी जाऊन विचार करू शकलो तर?

‘मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस’ या ‘जॉन ग्रे’ यांच्या पुस्तकात पुरुष आणि स्त्रियांना अनुक्रमे मंगळ आणि बुध ग्रहाचे रूपक देऊन व अनेक उदाहरणांसहित लेखकाने त्या दोघांच्या स्वभावाचे पैलू उलगडले आहेत. कोणत्याही गोष्टीवर रिऍक्ट होण्याची पद्धत स्त्री आणि पुरुषांची वेगवेगळी असते, हे मुख्यतः या पुस्तकात सांगितलंय. जसं की, स्त्रिया जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम्स शेयर करतात तेव्हा त्यांना त्यावर उपाय नको असतो, तर फक्त कोणीतरी ऐकायला हवं असतं आणि पुरुषांची एखाद्या प्रॉब्लेमवर काय उपाययोजना करता येईल याचा शांत राहून स्वतःच विचार करण्याची वृत्ती असते.

समोरच्याचं मन जाणून घेण्यासाठी हे एक पुस्तक उत्तम गाईड आहे. मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. रमा मराठे यांनी केला आहे.

४. प्रेमाच्या पाच भाषा – गॅरी चॅपमन (द फाईव्ह लव्ह लँग्वेजेस – मराठी अनुवाद – डॉ. अनघा दूधभाते)

या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर ठरलेल्या पुस्तकात वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या पद्धतीने कशी प्रेम व्यक्त करतात हे लेखकाने उदाहरणं देऊन सांगितलं आहे. लेखकाच्या मते प्रत्यक्षात पाच प्रेमभाषा आहेत. त्या म्हणजे, ‘कौतुकाचे शब्द’, ‘अमूल्य सहवास’, ‘भेट वस्तूंचा स्वीकार’, ‘सेवाभावी कृती’ आणि ‘शरीरस्पर्श’. जी गोष्ट तुम्हाला अर्थपूर्ण वाटत असते, ती काही वेळेस तुमच्या जोडीदाराला निरर्थक वाटत असते. काही वेळेस तुम्हाला फक्त बोलायचं असतं पण तुमच्या जोडीदाराला वाटत असतं की, तुम्हाला काही भेटवस्तू दिल्यावर तुम्ही खुश व्हाल. हा नात्यांचा प्रॉब्लेम नाही तर तुमच्या पार्टनरची प्रेम व्यक्त करण्याची भाषा माहीत नसल्याचा परिणाम असतो. एकदा का जोडीदाराची भाषा तुम्हाला कळलीकी सुखी संसाराचं रहस्य तुम्हाला मिळालं. लेखक पुस्तकात सांगतात की, लग्नानंतर प्रेम टिकविण्यासाठी प्रेमाची दुय्यम भाषा शिकणं जरुरीचं आहे. जोडीदाराला आपलं प्रेम कळण्यासाठी ते त्याच्या भाषेतच सांगितलं पाहिजे.

५. बकुळा -सुधा मूर्ती (अँड जेंटली फॉल द बकुळा -मराठी अनुवाद – लीना सोहोनी)

या पुस्तकात सुधा मूर्तींनी फार सुंदर संदेश दिलाय. संसाराच्या दोन चाकांमधील एक चाक जेव्हा दुसऱ्याचा विचार न करता, मागे वळून न बघता पुढे धावत राहतं, तेव्हा काय होतं, हे सांगणारी ही कथा. श्रीकांत आणि श्रीमती यांची ही प्रेमकहाणी. या पुस्तकाची कथा खरंतर नुसतं ‘श्रीकांत श्रीमती एकत्र येतात की नाही’, यावर नाहीये, तर त्याहूनही पुढचा आहे. आणि हा प्रवास सुधा मूर्तींनी खूप सुंदर शब्दांत, थोडं अस्वस्थ करून काळजाला घरं पडून जाईल अशाप्रकारे रेखाटला आहे. पुस्तकाबद्दल अधिक माहिती देणारा ब्लॉग लवकरच या लिंक वर मिळेल.

पुस्तकात सुधा मूर्ती लिहितात, की ‘कुणावर माया करण्यासाठी सौंदर्य किंवा बुद्धिमत्तेची गरज नसते. परस्परांवरचं प्रेम आणि गाढ विश्वासाची तिथे गरज असते. कोणत्याही नातेसंबंधात परस्परांविषयीचा जो दृढ विश्वास निर्माण होतो, तो असा या मायेतून, प्रेमातूनच निर्माण होतो’.

६. नातं दोघांचं – डॉ. राजेंद्र बर्वे

पती-पत्नीच्या नात्यातील विसंवादी सूर अधिक गहन बनला, तर ते नाते तुटायला वेळ लागत नाही. असे होऊ नये, यासाठी काही गोष्टी आधीपासूनच समजून घ्यायला हव्यात. डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या या पुस्तकात नेमके हेच सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.

परस्परांच्या सुखासाठी काय करावे याचा कानमंत्र ते देतात. चुकतेय कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधून वेळीच त्यावर तोडगा काढायला हवा. पती, पत्नी आणि आई या तिघांचे एकमेकांशी असलेले भावनिक नातेसंबंध लक्षात घ्यायला हवेत. रिलॅक्स व्हायला शिका, असे ते सांगतात. आपण जसे आहोत आणि दुसरा जसा आहे, तसाच तो स्वीकारायला शिका, अधिकार गाजविण्याची सवय सोडून द्यायला हवी, असा सल्ला ते देतात. विश्वासाचं नातं आणि लैंगिक जीवनावरही ते चर्चा करतात.

७. ती दोघं – डॉ. रमा मराठे

या पुस्तकात वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या काळातील, परिस्थितीतील ‘तो’ आणि ‘ती’ या दोघांमधील भावनिक गुंतागुंत आणि पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी यांच्यातल्या ‘नर-मादी’ या नैसर्गिक, नाकारता न येणाऱ्या नात्याची स्थिती डॉ. मराठे यांनी १५ कथांमधून तरलपणे व्यक्त केलेली आहे.

सायकॉलॉजिस्ट म्हणून लेखिकेसमोर अनेक मनं उघडी होत राहतात. त्यांच्या जगण्याची उकल त्या करतच असतात. कधीकधी अशी उकल होतही नाही, कल्पितापेक्षा वास्तव भयंकर असतं हे जाणवतं. जीवनाचा शोध ज्याचा त्याने जमेल तसा घ्यावा पण ते जीणं वाचकांसमोर उभं करण्यासाठी हा कथाप्रपंच. या पुस्तकातील अनेक कथा सत्य घटनांवर आधारित आहेत तर काही डॉ. आनंदी गोपाळ जोशी, प्रिय कैकयीस अशा अतिशय वेगळ्या नजरेने पती-पत्नीच्या नात्याकडे बघणाऱ्याही आहेत.

प्रेमविवाहामध्ये एकमेकांना जाणून घेऊनच दोघं एकमेकांचे झालेले असतात त्यामुळे त्या एकत्र येण्याची आणि कायम एकत्र राहण्याची जबाबदारी फक्त त्या दोघांचीच असते. त्यामुळे हे ‘जाणून घेणं’ अगदी परखडपणे होणं फार गरजेचं असतं कारण तसं नाही झालं तर उरतो फक्त वाटचालीचा कोरडा आग्रह! एकत्र चालण्याचा सामाजिक संकेत आणि पुष्कळदा आता पुढेही निघून जाता येत नाही आणि मागेही फिरणं शक्य नाही, अशा स्वल्पविरामातली अगतिकता जगता-जगता अर्ध आयुष्य निघून गेलेलं असतं.

अशी अगतिकता नात्यांमध्ये येऊ नये म्हणून दोघांमधील मनमोकळा संवाद कायम ठेवा आणि तुमच्या ओळखीतील लव्हमॅरेज करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसोबत ही लिस्ट नक्की शेयर करा. ‘व्हॅलेंटाईन डे’ला ही पुस्तकं गिफ्ट देण्याची कल्पनाही तशी बेस्ट आहे हा! ऑल द बेस्ट!

– अश्विनी सुर्वे.

 

 

Comments

13 responses to “लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं”

  1. […] डॉ. राजेंद्र बर्वेंचं ‘नातं दोघांचं’ या वैवाहिक जीवनासाठी मार्गदर्शक असणाऱ्या पुस्तकाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.   […]

  2. Shubhangi pustake Avatar

    लव्ह मॅरेज करणाऱ्यांनीच का वाचायची? ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी आणि बाकीच्यांनी पण वाचायला हरकत नाही तेवढीच विचारात सुस्पष्टता येईल.

  3. Geetanjali sawant sankhe Avatar

    खूपच सुरेख लेख आणि उत्तम भाषाशैली..👌👌

  4. Sheetal Sarangdhar Avatar

    खूपच सुरेख लेख 😀😀 आपण सांगितलेली पुस्तकं लवकरच वाचेन

  5. Pravin Shrisundar Avatar

    ही पुस्तके आत्ता पाहायला मिळाली, 34 वर्षापुर्वी मिळाली असती तर कदाचित जास्त भांडलो असतो आम्ही .. पण थोडे थोडे भांडत एकत्र 32 वर्षे झाली… तरीपण काही पुस्तके एकदा वाचुन पाहातो, काय चुकलं काय बरोबर होतं किंवा आहे हे समजेल…

  6. Darrshana Shetty Avatar

    अतिशय सुंदर व कमी शब्दांत समजावून सांगितले आहे.👌👌👍👍

  7. Anuradha Gaikwad Avatar

    खूप सुंदर लिहीलयं . यातील ‘ तो आणि ती ‘ मी वाचलयं . एकमेकांना समजण्यास या पुस्तकामुळे मदतच होते . तुमच्या विवाहेच्छुक मुलांना नक्की वाचायला द्या , त्यांचे संसार नक्कीच सुखी होतील .👍

  8. Krishna Jadhav Avatar

    खूप छान लेख, खूप उपयोगी माहिती. लव्ह मॅरेज मध्ये लग्नाअगोदर काही वेळ भेटणं बोलण होत तेव्हा चांगल्या गोष्टी दाखविल्या जातात, इतर गोष्टी नकळत वा जाणूनबुजून समोरच्यापासून अंधारात रहातात. पण लग्न झाल्यावर पूर्ण वेळ एकत्र आल्यावर सगळ्या गोष्टी एकमेकांना कळतात, समोरच्याला काही आवडतात काही आवडत नाहीत, ज्या आवडत नाहीत त्यात सुधारणा झाली उत्तम अन्यथा भांडण व काहीवेळा घटस्फोट पक्का. हे टाळणे आवश्यक भविष्यात संसार सुखाचा होण्यासाठी. दुसरी गोष्टी लव्ह मॅरेज असो वा ठरवलेलं दोन्हीत वयानुसार नवरा बायकोत मानसिक वागण्यात बदल होतात व दोघांनी ते समजून घेतले तर आंनद नाहीतर एकाची घुसमट, तेही टाळणं आवश्यक. तसेच नवरा बायको सारखेच वा समान नव्हेत तर पूरक आहेत तेव्हा काही वेळा नवऱ्याने तर काही वेळा बायकोने नमते घेणे आवश्यक, सुखी संसारासाठी.

  9. Ujwalla sahane Avatar

    खूप छान लिहिले आहे तुम्ही. तुमच्या लेखनास दाद दिलीच पाहिजे.महत्त्वाचे म्हणजे निवडलेली पुस्तके एक काल्पनिक कादंबरी ते वैचारिक लेखन अशी विविधता आहे.

  10. Chandrashekhar bokey Avatar

    Thats 100% true….. Thanks for nice information

  11. सौ. स्वाती गोरे Avatar

    खूप सुंदर लिहिलं आहे…. आणि थँक्यू पण… 🌹😊

  12. Prakash khandekar Avatar

    छान.
    कितिहि लिहिली तरी कमीच आहे.
    प्रत्येकाची रित न्यारीच आहे.
    वाचणारे असतिल तर पुस्तके भेट द्या.

  13. Rohit palkar Avatar

    अश्विनी मिस अप्रतिम लिहिलं आहे…. ओघवती भाषा शैली …एक कसलेल्या आणि अनुभवी लेखकाच लिखाण कस हवं याच उत्तम उदाहरण … उत्कृष्ट शब्दांची मांडणी… कीप इट मिस… गॉड ब्लेस…

Leave a Reply to ठाम |निर्णय |कसे |घ्यायचे| सांगणारी| 5 मराठी| पुस्तकं| योग्य | निर्णय | घेण्याचे | कौशल्य Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *