५० वर्षांचे अनुभव – २ मिनिटात वाचा!

आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगीन ज्यात माझे स्वतःचे काही अनुभव आहेत, काही मला माझ्या गुरूंकडून, आई-वडिलांकडून, काही मित्रांच्या आईवडिलांकडून शिकायला मिळालेल्या गोष्टी आहेत. यातलं बरचसं मी अजूनही शिकतोच आहे, अजूनही काही गोष्टी पूर्णपणे उलगडलेल्या नाहीत, पण ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे नक्की.

————————————————————–

“आयुष्य सोप्पं नाही, आणि ते सोप्पं नसावही!

तुम्हाला नशिबाने खूप ठोकर दिल्या असतील, बऱ्याचदा तुमचे प्रयत्न १००% असून सुद्धा हवा तसा रिजल्ट आला नसेल. होतं असं बऱ्याचदा. पण एक ऐका. त्या जाळ्यात प्लीज तुम्ही अडकू नका. जाळ.. ज्यात तुम्ही स्वतःला कमकुवत समजता (तुम्ही कमकुवत नाही आहात.!). त्यातून बाहेर या.

ह्या जाळ्यात अडकल्यावर तुम्हाला नशिबाला कोसण्याचं मन करेल. पण थांबा! त्यातून बाहेर या. आता तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचाय.. “माझ्यासाठी ‘यश’ मिळवणं म्हणजे नक्की काय आहे?”

पैसा?.. ठीक आहे ना, पैसा असू शकतो एखाद्याचं ‘यश’.

कदाचित कुणासाठी प्रसिद्धी म्हणजे यश असेल, कुणासाठी गुण्यागोविंदाने नांदणारं एकत्र कुटुंब असेल, तर कुणासाठी दुसऱ्यांना मदत करण असेल. एखाद्याला संन्यासी बनू वाटत असेल. ‘यश’ काहीही असू शकतं.

रोज स्वतःला हा प्रश्न विचारत रहा. .. “माझ्यासाठी ‘यश’ मिळवणं म्हणजे नक्की काय?”

आणि हो दर वेळी तुमचं उत्तर सारखंच असेल असं नाही (अशी सक्ती देखील नसावी). तुम्हाला ते बदलण्याचा पुरेपूर हक्क आहे.

बस्स.. एक ध्यानात ठेवा, तुम्ही स्वतःला जे काही उत्तर देता त्याला साजेल अशी पावलं उचलायला घ्या. कामाची बांधणी तशी करा.

अशा गोष्टी करन टाळा ज्या तुम्हाला तुमच्या विचारांच्या (तुमच्या उत्तरांच्या) विरुद्ध नेतात.

आपल्याला बऱ्याच गडांवर स्वतःच्या नावाचे झेंडे गाडायचे आहेतच. पण त्या आधी तुमच्या गडांची यादी बनवा!

“म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ‘आपलं यश आपण स्वतः ठरवायचंय’ (दुसऱ्यांनी नाही) आणि मग त्या दिशेने चालायला लागायचं.”

यासाठी लागणाऱ्या गोष्टी रोजच्या वेळापत्रकात सामाविष्ट करायच्या, त्या गोष्टी लक्षपूर्वक अमलात आणायच्या.

आता, ह्या क्षणाला,तुम्ही कुठे पोहचू शकत नाही ह्यासोबतच, तुम्ही आता कुठे आहात हे देखील तितकंच महत्वाच आहे. तुम्हाला ती पहिली पायरी ओळखायची आहे, जी तुम्हाला तुमच्या ओळखी पर्यंत घेऊन जाईल.

‘मला माहितीय मी कोण आहे’ हि पहिली पायरी आहे, असं तुम्हाला वाटेल. पण नाही.

‘मला माहितीय मी कोण नाहीय!’ हि आहे ती पहिली पायरी.

हि नको असलेल्या गोष्टींना काढून टाकण्याची प्रक्रिया आहे!

‘मी कोण नाही आहे’, हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, तेव्हा तुम्हाला ‘मी कोण आहे?’ ह्याचं उत्तर आपोआप मिळू लागेल.

तुमचे मित्र, ज्यांच्या सोबत तुम्ही फिरता टाईमपास करता, जर का त्यांच्यासोबत असताना तुमच्यातला ‘बेस्ट’ माणूस बाहेर येत नसेल. कारण ते खूप चुगल्या करतात (कारण काहीही असेल). आणि तुम्हाला नक्की माहितीय कि हे असे मित्र अडचणीच्या वेळी तुमच्या सोबत नसणारच आहेत.

तो सासू-सुनांची भांडण दाखवणारा टिव्ही, जो तुम्हाला खाली खेळायला-फिरायला जायच्या वेळी तुमची पाठ सोडत नाही. (जेवण आटोपलं कि यावं जरा फेरफटका मारून.) किंवा ते हॉटेल मधलं महागडं (पौष्टिक नसलेलं) जेवण जे कधी तरी तुम्हाला भविष्यात जडणाऱ्या व्याधींचं कारण ठरणार आहे. तुम्ही लठ्ठ होणार आहात.

ती तशी माणसं, त्या गोष्टी, त्या सवयी ह्यांना वेळ देणं बंद करा. खूप सोप्पंय. तिथे जाणं टाळा.

जेव्हा तुम्ही हे कराल, त्यांच्यासोबत वेळ घालवणं बंद कराल, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी थोडा जास्त वेळ काढू शकाल. आणि अशा खूप जागा (गोष्टी) आहेत ज्या तुमच्यासाठी (तुमच्या स्वप्नांसाठी) ‘पौष्टिक’ आहेत. जिथे तुम्हाला आनंदी वाटतं. का? ह्याचं कारण.. तुम्ही तुम्हाला नको असलेल्या गोष्टी ओळखल्या आणि थांबवल्या.

त्या सवयी, ती माणसं, त्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्यातला ‘स्व’ शोधण्यासाठी पोषक नव्हत्या, त्यांना तुम्ही मागे सोडलत!

सोप्पंय, ज्याप्रमाणे जास्त पर्याय मिळाले कि आपण गोंधळून जातो, फोकस विसरून बसतो, त्यातलाच हा प्रकार आहे. नको त्या गोष्टी गोळा करून साठवून ठेवणं बंद करा. थोडक्यात तुमचे पर्याय कमी करा.!

एकदा का हे तुम्हाला जमलं कि जे काही तुमच्या पुढे असेल, त्या सर्व महत्त्वाच्याच गोष्टी असतील.

आपण स्वतः कोण आहोत याची पडताळणी करण अवघड आहे, म्हणून त्या फंद्यात कधी पडायचंच नाही असं नाही, असं करून नाही चालत. थोडा वेळ शांत बसा. थोडा विचार करा.

सर्वात आधी ‘तुम्ही कोणी नाही आहात ते ओळखा!’ मग नको त्या गोष्टी कायमच्या काढून टाका. तुम्हाला नक्की कुठे जायचंय त्याचा रस्ता तुम्हाला आपोआप मिळेल!

नेहमीच आपण उत्कृष्ट बनण्याचा ‘प्रयत्न’ करतो, उत्कृष्ट बनत नाही!

महापुरुष बोलून गेलेत, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’ मग चला तर ‘उत्कृष्ट शिल्पकार’ बनण्यासाठी त्याच्या अभ्यासाला लागायचंय. ह्यामुळेच आपल्याला ‘यश’ मिळणार आहे.

आपला आनंद, आपली इमानदारी, मन मोकळं करून हसलेले क्षण, किंवा ते मनाच्या कोपऱ्यात साठवलेले खारट पाण्याचे थेंब, ह्या सगळ्यांना जवळून बघुयात. आणि मग माहितीय का ह्यातून आपल्याला काय मिळेल?

आपल्याला अजून असे क्षण, अशा आठवणी मिळतील, ज्या आपल्याला अजून जवळून अभ्यासता येतील. ‘अभ्यासण’ ह्या शब्दाला ‘कंटाळवाण्या’ नजरेने बघू नका. आपण ह्या सगळ्याकडे एका चांगल्या दृष्टीकोनातून बघायला सुरुवात करू.

मग त्यात अशाच गोष्टी निवडायच्या आहेत ज्या तुम्हाला हव्या होत्या. अशीच कामं करा जी ‘तुम्हाला’ करायचीयत.

आपण चुकू, त्या चुकांना पण आपलंसं करा, त्यातून शिका! आणि पुढे सरका!

अपराधी असल्याची किंवा एखादी चूक केल्याची भावना माणसाला मरण्याआधीच मारते. चूक केलीत.. ठीक आहे.. पान पलटा.. कारण तुमच्या आयुष्याचं पुस्तक तुम्हीच लिहिताय!

Related Posts

Leave a Reply