महिलादिनाच्या शुभेच्छा happy woman's day

१०  आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!

आत्मचरित्र हा माझा आवडता साहित्यप्रकार. एखाद्या उत्तम आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी, एखाद्या कृतीमागची प्रेरणा, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे किंवा महत्वाचे प्रसंग, घडामोडी, त्यामागची कारणे आणि यातून त्यांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा होतो. त्यांच्या जडणघडणीत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्वही त्यातून उलगडत असते. अनेक घटनांमधून काळाची, मनाची, स्वभावाची तसेच सामाजिक, राजकीय स्थित्यंतरं देखील समजतात आणि आपल्याही नकळत  या सगळ्या प्रवासातून या व्यक्तीमत्वांचे अनेक नवीन पैलू नव्याने समजल्याने त्यातून आपल्याला प्रेरणा, बोध, मार्गदर्शन आणि कधी कधी आयुष्याला दिशाही मिळते.

मराठी लेखिकांच्या आत्मचरित्रांचे साहित्यात आगळे-वेगळे स्थान आहे. लक्ष्मीबाई टिळकांचे ‘स्मृतीचित्रे’ हे तर स्त्री साहित्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्यातील आत्मचरित्रांचा मापदंड म्हणून आजही ओळखले जाते. रमाबाई रानडेंच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या पहिल्या स्त्री आत्मचरित्रापासून ते आत्ताच्या काळातील स्त्रियांच्या आत्मचरित्रांमधून स्त्री- मनाचा, इतिहासाचा आणि बदलत्या समाजस्थितीचा प्रवास उलगडत जातो. या आत्मचरित्रांतून स्त्रियांचा स्वतःकडे पाहण्याचा आणि समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील स्पष्ट होतो.

यावेळेसच्या जागतिक महिला दिनानिमित्त मी वाचलेल्या आणि मला भावलेल्या १० स्त्री आत्मचरित्रांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या वाचनाच्या आणि अभ्यासाच्या परिघाबाहेर असलेली इतर अनेक उत्कृष्ट आत्मचरित्र आहेत. अशा आत्मचरित्रांबद्दल आणि तुमच्या आवडत्या मराठी लेखिकांबद्दल कमेंट्समध्ये नक्कीच लिहा.

 

१. स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक 

‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र इतके अविस्मरणीय आणि मराठी साहित्यात त्याला इतके मोलाचे स्थान का आहे याचा प्रत्यय पुस्तक वाचताना सुरुवातीपासूनच येतो. त्या काळातील स्त्रियांचे जीवन, सामाजिक स्थान, चालीरीती, धर्माबद्दलची मतं  याबद्दल लक्ष्मीबाईंनी इतक्या ओघवत्या भाषाशैलीत वर्णन केले आहे की, प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. हे आत्मचरित्र फक्त व्यक्तिगत इतिहास नाही तर यातून १८६० ते १९२० या काळातील समाजाचे चित्रणही दिसते. जे आहे, जसे घडले, जसे भावले, तसे सांगितले, असा पारदर्शक भाव लेखनात आहे. मला सर्वात जास्त आवडलेल्या या पुस्तकातील गोष्टी म्हणजे लक्ष्मीबाईंचे व्यक्तिमत्त्व, भाषा आणि त्यांचा एखाद्या गोष्टीवर संयमितपणे व्यक्त होण्याचा स्वभाव. एखाद्या व्यक्तीचे त्रासदायक वागणेही त्यांचा दोष न समजता स्वभावविशेष म्हणून पाहणे त्यांना कसे जमायचे काय माहीत. एखाद्या व्यक्तीचे गुणदोष कसलाही कटू भाव न ठेवता कसे व्यक्त करावेत हे या पुस्तकातून समजते.

रे. नारायण टिळक यांच्या स्वभावदोषमुळे लक्ष्मीबाईंची झालेली फरफट, ना. वा. टिळकांच्या कविता, ख्रिस्ती धर्म, धर्मांतर, बालकवी ठोंबऱ्यांच्या आठवणी, लक्ष्मीबाईंनी स्वतः लिहिलेल्या कविता अशा अनेक आठवणी या पुस्तकात आहेत. त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे, की ‘माझ्या मनाची ठेवणच अशी आहे, की सर्व निराशामय अंधकारातून चाचपडत धडपडत का होईना, पण आपला मार्ग आक्रमायचा.’

२. आहे मनोहर तरी – सुनीता देशपांडे

हे माझे वैयक्तीक आवडते पुस्तक. खरंतर सुनीताबाईंनी सुरुवातीलाच सांगितलंय की, ‘हे आत्मचरित्र नाही. आठवणीच्या प्रदेशातील ही स्वैर भटकंती.’ इतक्या प्रांजळ आणि परखडपणे आपण स्वतःच स्वतःच्या मनाचा, विचारांचा वेध घेऊ शकतो का, हा प्रश्न मला हे पुस्तक वाचताना सारखा पडतो. त्यांचे बालपण, कुटुंब, चळवळीतील सहभाग, पुलंसोबतचा संसार, त्यांचे कार्य, कलागुण,त्याचे किस्से, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, अशा अनेक विषयांवर त्यांनी मनमोकळेपणाने लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रत्येक पानावर मनाचा ठाव घेणाऱ्या आठवणी, गोष्टी आहेत आणि या गोष्टींमधून कितीतरी विषय त्यांनी सखोलपणे उलगडून दाखवले आहेत. पुस्तक वाचल्यानंतर भाईंवर प्रेम करणाऱ्या लोकांनी सुनीताबाईंना दिलेली वागणूक, त्यांच्याबद्दल पसरवलेले गैरसमज, त्यांना अनुल्लेखाने मारल्याचे प्रसंग वाचून वाईट वाटते.

भाईंच्या एका स्नेहयाने त्यांना ‘पी.एल.च्या दारातलं कुत्र’ म्हंटलं. त्यावरही त्या लिहितात की, ‘ते उदगार मला सार्थ वाटतात. कुत्रे आल्यागेल्यावर भूकंते, प्रसंगी चावायला जाते पण मालकाच्या घराचे ते सरंक्षण करत असते. लोकांना त्याचा ताप वाटत असेल पण जसे माझे आल्यागेल्यावर भुंकणे, चावे घेणे दिसले, तशी स्वतःच्याच गळ्यात घालून घेतलेली, त्या घराला जखडून ठेवणारी अदृश्य साखळीही दिसली असेल का?’

त्या एके ठिकाणी लिहितात, की ‘माझी मते घट्ट असतात. त्यांत कुठेतरी माझे आतडे गुंतलेले असते. माणसे तुटली तरी हरकत नाही पण मी ठाम राहणे हेच मला माझ्या जिवंतपणाचे लक्षण वाटते.’ हे आत्मचरित्र नाही पण तरीही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील इतका ठामपणा, सडेतोडपणा आणि जिवंतपणा मला इतर कुठेही दिसत नाही.

३. नाच गं घुमा – माधवी देसाई

या पुस्तकानं इतिहास निर्माण केला. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी कोणीतरी सगळी आवृत्ती विकत घेतली. कदाचित लोकांनी हे पुस्तक वाचू नये हा प्रयत्न त्यामागे असेल. पण आठच दिवसात पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाहेर पडली. ८-८-८८ ते २०१३ पर्यंत तेरा आवृत्त्या निघाल्या. लेखिका माधवी देसाई यांनी आपल्या आणि साहित्यिक रणजित देसाई यांच्या वैवाहिक जीवनासह आपल्या साऱ्या पूर्वायुष्यावर टाकलेला हा प्रकाशझोत. हे आत्मकथन फार खळबळजनक ठरले. एका संस्कारक्षम हिंदुत्वनिष्ठ कुटुंबात वाढलेल्या स्त्रीच्या जीवनात वैधव्य, पुनर्विवाह आणि घटस्फोट हे सारे स्फोटक अनुभव येतात. ती स्त्री गेल्या चाळीस वर्षांतील भारतीय स्त्रीजीवनाची गाथा लिहू लागते, त्यातून हे आत्मकथन लिहिलं जातं. पण हा प्रयत्न प्रामाणिक आहे. जोवर स्त्रीला तिचं नेमकं रूप समजत नाही, तोवर संस्कार, रूढी, परंपरा, समाज नात्यांची बंधनं, संस्कृती या सर्वांनी घेरून जाऊन ती नाचत राहणार. इतरांच्या तालावर! ज्या दिवशी तिचा ताल तिला सापडेल, तोपर्यंत हे असंच चालणार! म्हणून पुस्तकाचे नाव ‘नाच गं घुमा’.

४. सांगत्ये ऐका – हंसा वाडकर

घरातील आर्थिक परिस्थितीमुळे हंसा वाडकर यांना अगदी लहान वयात चित्रपटसृष्टीची वाट धरावी लागली. खरंतर त्यांना त्याची अजिबात आवड नव्हती. लग्न करून सामान्यांप्रमाणे सुखाचा संसार करावा, मुलं सांभाळावी ही त्यांची स्वप्न. ज्या भावाच्या शिक्षणासाठी त्यांनी ही वाट धरली त्यानेच ‘तू आता सिनेमात चाललीस, आपलं आडनाव लावू नकोस. मला काय वाटेल’ असं सांगितलं. म्हणून त्यांनी त्यांच्या आत्यासारखं वाडकर आडनाव लावलं. त्यांचं खरं नाव रतन साळगावकर. सर्वजण त्यांना बेबी म्हणत. पण रतन किंवा बेबी आवडलं नाही म्हणून आणि त्या हसतमुख असायच्या, सारख्या हसायच्या म्हणून मामा वरेरकरांनी त्यांचं नाव ठेवलं हंसा. हसरी हंसा. खरं तर हे ६५ पानांचं छोटेसं आत्मचरित्र काहीसं अपूर्ण वाटतं पण तरीही मनाला विलक्षण चटका लावून जातं. हंसाबाईंनी खूप सोसलं, अनुभवलं, त्यांना माणसांचा आलेला अनुभव हा चांगल्यापेक्षा वाईटच अधिक आहे पण तरीही त्यांच्यात कायम असलेली निरागसता मनाला भावते.

कोणी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले की रागात ते आरोप खरे करण्यासाठी, जगावर सूड घेण्यासाठी त्या खरोखर त्या कृती करायच्या व शेवटी त्या लिहितात, ‘तो मार्ग चुकीचा होता हे आता पटतंय. माझ्या कृतीने उलट मीच अधिक खोलात गेले. जगाला काहीही झालं नाही.’

लोकं त्यांच्याशी स्वार्थी, विक्षिप्तपणे वागून देखील आपल्या आयुष्यातील सर्व घटनांकडे हंसाबाई उदार समजूतदारपणाने पाहताना दिसतात. पण या समजूतदारपणाला सर्वत्र दुःखाची किनार आहे. यशाचा अभिमान नाही. भोगल्याचं दुःख नाही; अशा निःसंग निरामयतेमुळेच काळजाला भिडणारं हंसा वाडकरांचं हे आत्मकथन.

५. जगले जशी – लालन सारंग

‘कलावंतांना कोणकोणत्या प्रसंगाना तोंड द्यावं लागतं? यात आम्ही कलेचं समाधान किती घेतो? प्रेक्षकांना पुरेपूर नाटक बघितल्याचं समाधान मिळतं काय? या कलात्मक प्रश्नांना उत्तर एकच- आम्ही प्रसंग निभावून नेतो!’ -इति लालन सारंग.

व्यवसाय म्हणून नाट्य-व्यवसायाचे चांगले आणि वाईट चित्रही या आत्मकथनाच्या निमित्ताने आपल्यासमोर उभे राहते. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताघेताच लालन सारंग यांनी टायपिस्टची सरकारी नोकरी पत्करली होती. पण अचानक अगदी नशिबात लिहिल्याप्रमाणे आणि ओघाओघाने त्या नाट्यक्षेत्रात आल्या. नाट्य-माध्यमात अभिनेत्री म्हणून हौसेने प्रवेश केल्यावर आणि कळत नकळत हौसेचा व्यवसाय झाल्यावर आणि तो व्यवसाय मर्यादित वेळेतले काम किंवा कौशल्य न ठेवल्याने काय उलथापालथ घडते याचे हे चित्रण.

लालन सारंग यांच्या सर्व भूमिकांचा प्रवास, त्यामागील कष्ट आणि त्यांच्यात मुळातच असलेलं सजग आणि स्वतःकडे अभ्यासूपणे पाहू शकणारे मन, कौशल्य, नाटकाच्या ठिकाणी आणि इतर वेळीही अडचणींवर मात करण्याची त्यांची कला, काही भूमिकांचा त्यांच्यावर खोलवर झालेला परिणाम, विविध ठिकाणच्या प्रेक्षकांकडून त्यांना मिळालेले कडू-गोड अनुभव, नाटक सुरू राहावं म्हणून वेळोवेळी घेतलेले निर्णय हे सगळं वाचताना एखादं सुंदर नाटक पाहिल्याचाच अनुभव येत असतो. लालन सारंग यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचा चांगला व वाईट गुण एकच आहे, तो म्हणजे स्पष्टवक्तेपणा. याच स्पष्टवक्तेपणाचा पुस्तक वाचताना आपल्याला वारंवार अनुभव येत राहतो. विजय तेंडुलकरांनी प्रस्तावनेत म्हंटलंय तसं, ‘कोणाच्या बोलण्यात गुंतावे तसे आपण या पुस्तकात गुंततो. एका वेगळ्याच जगात पोचतो. हे जग एका मनाचे जग आहे. आणि हे मन एका प्रौढसमजुतीने, निकोपपणे, स्थिरपणे आणि शांतपणे आपल्या गतायुष्याकडे पाहते आहे.’

६. माज्या जलमाची चित्तरकथा – शांताबाई कांबळे

हे आत्मचरित्र म्हणजे स्त्री-मुक्तीचा एक वस्तूपाठच आहे. हलाखीच्या परिस्थितीतही शांताबाईंच्या आईने त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. आपल्या आई-वडिलांना हे पुस्तक समर्पित करताना, ‘ज्यांनी मला शिक्षण दिले आणि अंधारातून उजेडात आणले त्या आई-आप्पांना’ असं शांताबाईंनी लिहिलंय ते किती सार्थ आहे हे पुस्तकभर जाणवत राहतं. ज्या काळात मुलींना शाळेत घातलं तर माणसं नावं ठेवत होती, त्याकाळात मुलीला शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या आई-वडिलांचे कौतुकच वाटतं. शांताबाईं त्यांच्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका होत्या आणि पुढे जाऊन त्यांचं शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत पोहोचणंही उल्लेखनीय आहे.  शांताबाईंनीही सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धुऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेड़े असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करून घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवऱ्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचं व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ शिक्षिका होऊन शिक्षणक्षेत्रात अधिकारी पदावर पोहचून निवृत्त झाली हे आजच्या काळातही प्रेरणादायी वाटण्यासारखंच आहे. त्यांचं योगदान एवढ्यावरच न थांबता त्यांनी मुलांना शिकवून दलित समाजाला एक पुढारी, चित्रकलेच्या क्षेत्रातील एक चांगले चित्रकार आणि शिक्षणक्षेत्रात मुलीला प्राध्यापिका करून खऱ्या अर्थाने त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला.

७. जिणं आमुचं – बेबी कांबळे

हे आत्मकथन म्हणजे बेबीताईंनी आपल्या समाजाच्या दडपलेल्या भावभावनांची, व्यथा-वेदनांची, जाणिवा-नेणिवांची मांडलेली कुंडली आणि उर्वरित समाजाच्या मानसिकतेचा केलेला पंचनामाच होय. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका खेडेगावातल्या महार समाजाच्या रितिरिवाजांचे चित्र हा पुस्तकाचा खरा गाभा आहे. पुस्तकातून बेबीताई स्वतःच्या ‘बालमृत्यू आणि पुनर्जन्मा’पासून आंबेडकरी चळवळीनं क्रांतिकारक बदल घडवल्यानंतर महार समाजात जो मूठभर ‘उच्चभ्रू’ वर्ग तयार झाला, तोच कसा आंबेडकरी विचारांचा घात करत आहे, दलित चळवळीत काही तुकड्यांसाठी फूट पाडत आहे याचं चिंतन, अशी निरीक्षकापासून चिंतकापर्यंतची भूमिका पार पाडतात. ह्या पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यावेळच्या महार स्त्रीजीवनाचे चित्र, पाच-सहा वर्षांच्या मुलींची लग्नं, त्याचा सासरी होणारा छळ, वयात आलेले सून आणि मुलगा ह्याच्यात दुरावा व्हावा म्हणून सासूबाई करीत असलेले अनन्वित प्रकार, पळून गेलेल्या सुनेला परत आणून तिच्या पायात खोडा घालण्यात येणं आणि काही वेळा तिचं नाकही कापण्याची क्रूर प्रथा ह्या गोष्टींचं बेबीबाईंनी केलेलं तपशीलवार वर्णन भारतातील जीवन आणि भारतीय समाजमन ह्यावर विदारक प्रकाश टाकणारं आहे. बेबीताईंनी आपल्या प्रवासात जे काही पाहिलं, अनुभवलं ते त्यांनी ह्या पुस्तकात तपशीलासह बारीक लिहून ठेवल्यामुळे एरव्ही पहायला मिळालं नसतं असं जग आपल्याला पहायला मिळतं.

 

८. आयदान – उर्मिला पवार

एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले.

आयदान म्हणजे बांबूपासून बनवल्या गेलेल्या परड्या, करंडे, सूप अशा वस्तूंचं सामान्यरूप. लेखिकेचे वडील शिक्षक होते पण ते वारल्यावर त्यांची आई आयदानं करायची. ‘आईच्या हातातील अखंड फिरणारं आयदान आणि मी करत असलेलं लेखन यांची वीण, एका अर्थानं, मला सारखी दिसते आणि आमच्यामधला वेदनेचा धागा एक आहे हेही जाणवतं.’ असं उर्मिला पवार सुरुवातीला सांगतात.

या पुस्तकातून एका विचारी, सखोल निरीक्षण करणाऱ्या आणि आपली मतं ठामपणे मांडणाऱ्या स्त्रीचं आयुष्य उलगडतंच; पण त्याचसोबत बौद्ध धर्माविषयक अनेक प्रश्नांची उकल करणारं आणि त्याकाळातील इतिहास, सामाजिक स्थितीचंही विस्तृत वर्णन दिसतं. या पुस्तकाचं इतर भाषांमध्ये भाषांतरही झालं आहे आणि त्यावर ‘आयदान’ नावाचं नाटकही रंगभूमीवर आलं. दलित स्त्रीला समतेच्या हक्कासाठी उच्चवर्णीयांसोबतच घरातल्यांसोबतही समतेच्या हक्कासाठी लढावं लागलं. उर्मिला पवारांच्या ‘आयदान’ मधून दलित स्त्रीचा हा दुहेरी संघर्ष समोर आला. ‘आयदान’मध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अथक लढय़ाचा हा लेखाजोखा कुठल्याही कटुतेशिवाय, काहीशा तटस्थतेनं, परंतु मिश्कील शैलीत मांडलेला आहे. आपल्या कृती आणि वर्तनाचीही झाडाझडती त्यांनी घेतली आहे. किंबहुना, ‘माणूस’पणापर्यंतचा आपला हा प्रवास त्यांनी अतिशय सजगतेनं व प्रगल्भपणे केलेला आहे. त्यामुळेच ‘आयदान’ हे मराठीतील एक महत्त्वाचं आत्मकथन ठरतं.

९. मी वनवासी – सिंधुताई सपकाळ

‘वनवासी हा शब्द दुहेरी अर्थाने लागू पडतो. एक तर वनात वात्सव्य करतो, त्याला वनवासी म्हणतात किंवा ज्याला जगाच्या पाठीवर कुणीही नाही अशी व्यक्ती वनवासी समजली जाते. मला दोन्हीही शब्द लागू पडतात म्हणून मी वनवासी’, असं म्हणणाऱ्या सिंधुताई सपकाळ हजारोंच्या आई झाल्या.

अतोनात दुःख, त्रास, शारीरिक-मानसिक यातना सोसूनही संकटांना धैर्याने सामोरं जात अवहेलनेचा, उपेक्षेचा, मानहानीचा, अपमानाचा कडवट घोट गिळून हसायचं आहे; कर्तव्यदक्ष दिसायचं आहे; असं सांगणारं त्यांचं  ‘मी वनवासी’ हे आत्मचरित्र प्रचंड प्रेरणादायी ठरलं.

या पुस्तकातून अशिक्षित, सासुरवासामुळे पिचलेल्या स्त्रियांचं; तसेच स्वतःचे मूलभूत हक्कही न मिळणाऱ्या आदिवासींचं विश्व तीव्रपणे उभं राहतं. कुठेही सत्य परिस्थिती न लपवता,आयुष्यात घडलेल्या गोष्टी आणि मिळालेले अनुभव माईंनी जसेच्या तसे मांडलेले आहेत. त्रास दिलेल्या व्यक्तींचे योग्य तिथे नाव आणि माहिती वाचताना त्यांच्यातील निर्भीडपणाही दिसून येतो.   गावकऱ्यांसाठी दिलेल्या पहिल्या लढ्यातील यशामुळे सिंधुताई घराबाहेर पडल्या आणि त्यानंतर रोज नवीन लढा आणि त्यासाठीचा त्यांचा संघर्ष यातून त्यांची वाटचाल चालूच राहिली. माईंचं आत्मचरित्र हे प्रत्येक निराश झालेल्या मनांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा जागवतं.

साहित्यबद्दल बोलताना, ‘या साहित्यरूपी शेवाळ्याने मला रक्तबंबाळ केलं’ असं म्हणणाऱ्या माई, बहिणाबाई, सुरेश भट, ए. के. शेख यांच्या कवितांचं, गझलांचं ऋण मान्य करतात. कवितेनं माईंना जगवलं म्हणून कवितांमुळेच मी माझ्या वेदना विसरू शकले असं त्या नेहमी सांगतात.

१०. समिधा – साधना आमटे

या पुस्तकातून बाबा आमटेंच्या कार्याला वाहिलेली अर्धांगिनी यापलीकडे असलेली साधना आमटे यांची ओळख व्हायला मदत होते. कुष्ठरोग्यांची सेवा करताना, आनंदवन घडवताना आणि बाबांच्या समाजकार्यात खंबीरपणे त्यांच्या सोबत उभ्या असलेल्या साधनाताईंचे मृदू, तरल, काव्यात्मक आणि निर्गवी मन आकर्षित करत आपलंसं करतं. एका कर्मठ ब्राह्मण घरात जन्मलेल्या साधनाताईंनी समाजाच्या विरोधात जाऊन बाबांना साथ दिली. ताईंच्या मूळच्या कणव व दया या गुणांना बाबांच्या साहसाची जोड लाभली. दोघांच्या जीवनसाथी, सुख, वैवाहिक जीवन याबद्दलच्या व्याख्या आणि कल्पना लौकिकापेक्षा वेगळ्या होत्या. पुस्तकातील या दोघांच्या सेवामयी सहजीवनाचे वर्णन देखील फार प्रेरणादायी आणि आदर्श ठेवावा असं आहे. साधनाताई बाबांना सर्जन, तर स्वतःला अॅनेस्थेटिस्ट म्हणायच्या. बाबांची कडवी तत्वनिष्ठा, संकटे अंगावर घेण्याची हौस, त्यांच्या स्वभावदोषांमुळे होणारी फरफट याला सक्षमपणे सामोरं जात साधनाताईंनी बाबांच्या सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि त्यांच्या सेवेरूपी यज्ञात आपल्या आयुष्याच्या समिधा टाकल्या. पुस्तकात बाबांच्या कार्याची सुरुवात, आनंदवन व हेमलकसा उभारतानाच्या अडचणी, अनुभव, आनंदवनाचे, कुष्ठरोग्यांचे, आदिवासींचे अंतरंग, त्यांच्या मुलांच्या बालपणापासून समाजकार्यात सहभागी होण्याचा प्रवास, दरदिवशी येणाऱ्या नवीन अडचणी आणि त्यावर शोधलेली उत्तरं, आमटे कुटुंबातील सदस्य, सहकारी, प्राणी या सगळ्याबद्दल मनापासुन आणि प्रामाणिकपणे लिहिलं आहे. साधनाताईंचे सहकारी सीताकांत प्रभू यांनी या पुस्तकाचं लेखांकन केलं आहे.

याचसोबत विजया मेहता यांचं ‘झिम्मा-आठवणींचा गोफ’, रमाबाई रानडे यांचं ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’, स्नेहप्रभा प्रधान यांचं ‘स्नेहांकीता’, यशोदा पाडगावकरांचं ‘कुणास्तव कुणीतरी’, नसीमा हुरजूक यांचं ‘चाकाची खुर्ची’, मेहरुणीसा दलवाई यांचं ‘मी भरून पावले’, संगीता धायगुडे यांचं ‘हुमान’, प्रा. स्नेहल पाठक यांचं ‘स्पंदन’, ‘तुमची जोत्स्ना भोळे’, ‘मी दुर्गा खोटे’, डॉ. सुनंदा एडके यांचं सुनंदायन, कुंदा महादेवकर यांचं फापट पसारा, जोत्स्ना कदम यांचं ‘सर आणि मी’, मुक्ता सर्वगोड यांचे ‘मिटलेली कवाडे’, कुमुद पावडे यांचे ‘अंत:स्फोट’, यशोधरा गायकवाड यांचे ‘माझी मी’, जनाबाई गिऱ्हे यांचे ‘मरणकळा’, विमल मोरे यांचे ‘पालातील माणसं’, मल्लिका अमर शेख यांचे ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’, उज्वला सहाणे यांचं ‘प्रेरणा-द साउंड ऑफ सायलेन्स’ अशी खूप सारी आत्मचरित्रं विविध काळातील, वयातील आणि परिस्थितीतील स्त्रियांचं भावविश्व आपल्यासमोर उलगडतात आणि प्रेरणा देतात.

ही आत्मचरित्रं वाचताना आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवताना माझं स्वतःचं वाचन किती एकांगी आहे, याची जाणीव मला झालीच पण आजही स्त्री साहित्याबद्दल वाचकांमध्ये तसेच साहित्यक्षेत्रातही किती उदासिनता आहे, हे देखील जाणवलं. या उदासीनतेमागे इतर अनेक पैलूही असू शकतात पण स्त्री-साहित्यावर अधिकाधिक चर्चा आणि लिखाण होणं आवश्यक वाटतं.

आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी आणि अनुभव कुठलाही आडपडदा न ठेवता मांडणाऱ्या या लेखिकांचं मला कौतुक वाटतंच पण त्याचवेळी स्वतःच्या चुका मोकळेपणाने स्वीकारणारी आणि दुःखाचा दोष इतरांना न देणारी त्यांची संयमी लेखणी मनाला स्पर्शून जाते.

तुमच्या जवळच्या महिलांना हे नक्की शेयर करा. त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा १००% पोहचतील!

©अश्विनी सुर्वे. 

 


Tags:

Comments

One response to “१०  आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!”

  1. […] माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  मी वनवासी – सिंधुताई सपकाळ ‘वनवासी हा शब्द दुहेरी अर्थाने लागू […]

Leave a Reply to श्यामची आई |मॅक्झिम गोर्कि-आई | सिंधुताई सपकाळ| लंडनची आजीबाई | प्रेरणादायी आईंची कहाणी | एकदातरी व Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *