माझं चॉकलेट आणि येथे कविता लिहून मिळतील

आमच्या कॉलेजचा ‘चॉकलेट डे’ उद्यावर आला होता, संध्याकाळचे ५ वाजून गेले तरी आम्ही सगळे कॉलेजमध्येच उद्याची प्लानिंग करत बसलेलो. तेव्हा ‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रहातल्या १०-१२ कविताच लिहून झाल्या होत्या. कवितासंग्रह प्रकाशित होईल कि नाही, त्याचं नक्की नाव काय असेल, काहीच फिक्स नव्हतं. ‘माझं चॉकलेट’ हि त्यातलीच एक अचानक लिहिलेली कविता.

हे थोड फिल्मीच आहे खरंतर, कारण अगदी ‘चॉकलेट डे’च्या आदल्यादिवशी संध्याकाळी मी मित्राच्या सांगण्यावरून हि कविता लिहिली. आणि मग ‘लेट्स ट्राय इट विथ गिटार’ बोलत मी ती तासाभरात कंपोज करून सेट सुद्धा केली. भविष्यात हि कविता मला इतकी प्रसिद्धी देईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.

आता मी जिथे कुठेही जातो तिथे ‘माझं चॉकलेट’ कवितेची गोडी चाखलेले श्रोते असले तर पहिली रिक्वेस्ट ह्याच कवितेची होते.

२ नोव्हेंबर २०१४ ला मी माझा हा ‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रह प्रकाशित केला. त्यानंतर माझा मित्र नितीन वारंगच्या मदतीने त्याचं Android app ‘प्ले स्टोर’वर अपलोड केलं. वर्चूअल जगतात पदार्पण केल्याचा मला खूप फायदा झाला, मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कविता लिहून देण्याच्या रिक्वेस्ट्स आल्या. यवतमाळ, बुलढाणा, सातारा, आमची मुंबई आणि एवढच नाही तर एक रिक्वेस्ट मध्यप्रदेशहून सुद्धा आली. या निरनिराळ्या जागेवरून अनोळखी लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या गोष्टी शेयर केल्या, याचा मला फार अभिमान वाटतो. माझा हा प्रवास अजूनही चालूच आहे.

yklm-book-cover-foto

‘येथे कविता लिहून मिळतील’ हा बाकीच्यांसाठी जरी एक कवितासंग्रह असला, तरी माझ्यासाठी त्या कविता माझ्या मित्रांची, माझ्या सहवासात आलेल्या मंडळींची जीवन कथा आहेत. कवितासंग्रहातील ‘येथे कविता लिहून मिळतील’ ह्या मुख्य कवितेत सांगितल्याप्रमाणे मी कवितेतील काही पात्रांची नावं जाहीररित्या सांगितली, काहींची गुप्त ठेवली.

प्रकाशित होण्याआधीपासूनच हा संग्रह सर्वांच्या आवडीस पात्र ठरला याचं श्रेय माझ्या त्या सर्व मित्र- मैत्रिणींना जातं ज्यांनी माझ्या कविता वाचल्या, अनुभवल्या.. आणि त्यांच्यासाठी माझ्याकडून लिहून घेतल्या. त्यामुळे बऱ्याच जणांची ब्रेकअप्स होता होता वाचली, काहींनी यातल्या कविता स्वतःच्या नावावर चिकटवून घेतल्या. (मीच त्यांना तसं करायला सागितलं खरं तर.. 🙂 ) कारण येथे कविता लिहून देण्यामागचा मूळ उद्देश जो आहे तो त्याने सफल झाला. ‘तिचं नी त्याचं यशवंत नातं या भागात ‘तिला’ आणि ‘त्याला’ जवळ आणण्यासाठी मी अजून एक निराळाच प्रयत्न केला आहे, लेट्स होप तुमचं नातं आमच्या लिखाणामुळे अजून घट्ट होईल.

मी ‘येथे कविता लिहून मिळतील’ मध्यल्या इतर कविता देखील कंपोज करून ठेवल्या आहेत, बऱ्याच ‘under process’ आहेत, लवकरात लवकर त्या तुमच्यासाठी घेऊन येईन. तुम्हाला देखील येथे कविता लिहून हव्या असतील तर नक्की कळवा.

Related Posts

Leave a Reply